वही बारिश, हाथ मे वही `रम’
धुवाधार बुंदे और बहेता हुआ `गम’
असाच असतो पहिला पाऊस
प्रत्येक सर, प्रत्येक थेंब
तुझ्या आठवणींचा…
`पहिला पाऊस’… लिहायला सुरुवात केली अन् यंदाचा पाऊस धो धो कोसळू लागला; तुझ्या ओथंबलेल्या आठवणींसह…
हे दरवर्षीचंच ठरलेलं… पावसाला सुरुवात होते आणि मन तुझ्या आठवणीत चिंब भिजत राहतं…
`पहिल्या पावसा’च्या आठवणीही खूप. `तो’ दरवर्षी येणार माहित असतं. तरीही प्रत्येक वर्षीचा `तो’ वेगळा भासतो; अगदी तुझ्या स्पर्शासारखा… कित्येकदा अनुभवूनही, प्रत्येक वेळी नवा भासणारा, हवाहवासा…
`पहिला पाऊस’ येताच तुझा पावसातला स्पर्शगंध श्वासातून तना-मनात घोळत राहतो. त्या धुंदीतच मी घराबाहेर पडतो; अगदी ठरवूनच, छत्री न घेताच! कारण मनसोक्त भिजायचं असतं अन् पहिल्या पावसाच्या धारा अंगावर झेलायच्या असतात, तुझ्या आठवणींसह…
`पहिल्या पावसा’ची आणि या छत्रीचीही एक गम्मतच आहे न तुझ्या-माझ्यात… कधी `तू’ अगदी ठरवून घेत नव्हतीस छत्री. कधी मी मुद्दाम विसरायचो छत्री; एकाच छत्रीत भिजत ओला स्पर्श मिळावा म्हणूनच… कित्येकदा तर दोघंही विसरायचो छत्री मनसोक्त भिजण्यासाठी…
रस्त्यावरचा मिट्ट काळोख एव्हाना पावसाने धुवून काढला असतो. या मस्त वातावरणात मी चालू लागतो. तुझ्या आठवणी सोबत असतातच. पण आता छत्री आवर्जून, न विसरता घेतो. कारण आता पावसात डोकं झाकायला तुझी ओढणी नसते…
पाऊस कोसळतच असतो. मीही तो मनसोक्त अंगावर झेलत चालत राहतो. पाय आपोआपच आपल्या ठरलेल्या वाटेकडे वळतात त्या वाटा आता भलेही सिमेंटच्या झाल्या असल्या, तरी अनेक खोदकामांनी यावरही खड्डे आहेत… अन् पुन्हा आठवतेस तू… त्या जुन्या वाटेवरच्या खड्ड्यांमधल्या पाण्यात मुद्दामच पाय आपटणारी.. खड्ड्यातलं पाऊसपाणी माझ्यावर उडवणारी… आता तू नाहीस, पण त्या वाटेवरच्या खड्ड्यातल्या पाण्यात तुझं प्रतिबिंब मात्र दिसतं…
हा `पहिला पाऊस’ झेलत मी चालत असतो रस्ता.. अचानक पहिल्यांदाच लक्ष जातं आकाशात भिजणाऱया चंद्राकडे. आज पहिल्यांदाच त्याला मी भिजताना पाहिलं पावसात. इतकी वर्षे तू असल्याने त्याच्याकडे लक्षच नव्हतं गेलं. आज त्याच्यात मला तुझा चेहरा दिसला… डोळे भरून भिजताना..
: मनीष