ठाणे : आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने सायकल आणि शिक्षणाशी जोडणाऱ्या सायक्लोएज्यु या उपक्रमाचे दुसरे पर्व रविवारी संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका आणि इतर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शाळांतील इयत्ता दहावीत चांगले गुण मिळवलेल्या ३५ मुलांना सायकल आणि १२० हून अधिक मुलांना शैक्षणिक किट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
आई वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि दिव्यांग असतानाही या परिस्थीतवर मात करत परिक्षेत सुवर्ण यश मिळवलेल्या राहील सिंग याला पुढील शिक्षणासाठी ११,००० रुपयांचा धनादेश आणि शैक्षणिक किट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांनी सायकलिंगच्या आपल्या बालपणीच्या आठवणी जागवल्या. आम्ही ज्यावेळी सायकलिंग करत होतो त्यावेळी भरपूर झाडी होती, सायकलिंगचे स्वातंत्र्य होते, वाहतूकीची कोंडी नव्हती. सायकल चालवण्याची मजाच काही और होती. पण आता अपघातांची संख्या वाढत आहे आणि त्याला कारण म्हणजे निष्काळजीपणा. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन अशा उपक्रमाच्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन देतात त्यामुळे त्यांचे खरोखरच कौतुक. शहरीकरणामुळे वाहनांची संख्या वाढली आहे त्यामुळे महापालिका आणि पोलीस यांनी सायकलस्वारांना संरक्षण देणे गरजेचे आहे. परदेशात सायकलसाठी रस्ते आहेत तसे रस्ते महानगरांत आखले गेले पाहिजे.
ठाणे जिल्हा ॲथलॅटिक संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुळकर्णी म्हणाले की, सायकल चालण्याचा आनंद आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनमुळे सायकलप्रेमींना लुटता येतो. सामाजिक बांधिलकी म्हणून राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक आहे. ग्रामीण भागात सायकल हेच माध्यम आहे आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने गेल्यावर्षी मुरबाड सारख्या भागात हे माध्यम पुरवण्याचे काम केले आहे.
माजी पोलीस अधिकारी राजू पाटील म्हणाले की, जुलै महिना उलटला तरी शहरांत समाधानकारक पाऊस नाही. याला कारण म्हणजे सध्या वाढत असलेले ग्लोबल वॉर्मिंग. यामुळे सायकल चालवून पर्यावरणाची सायकल नीट राखावी. सायकलमध्ये जी मजा आहे ती मोटारसायकलमध्ये नाही. शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव दीपेश दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.