ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात एकूण 40 गाव, पाडे टँकरमुक्त करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी मिळावे यासाठी संपुर्ण जिल्ह्यात जल जीवन मिशनची 720 एकूण काम हाती घेण्यात आले असून ही काम लवकर पुर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विशेष प्रयत्न करत आहे.
कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती मुरबाड गट विकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या सहकार्याने, जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात एकूण 40 गाव/ पाडे टँकरमुक्त करण्यात आले आहेत. यासाठी उप अभियंता जगदिश बनकरी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
पाच वर्षात 86 टंचाईग्रस्त गाव, पाडे होते, यावर्षी जल जीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकूण 40 गाव पाडे कायमस्वरुपी टँकरमुक्त करण्यात आले आहेत. प्रगतीपथावरील 46 कामाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
जल जीवन मिशन अंतर्गत मुरबाड तालुक्यात एकूण 206 कामे असून शाश्वत जल स्त्रोतामार्फत 48 इतक्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील जल जीवन मिशनची 158 काम प्रगतीपथावर आहेत ही कमीत कमी वेळेत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुरबाड तालुक्यातील खेवारे, मांडवत, मेर्दी, लोट्याचीवाडी, वाघवाडी, दुर्गापूर, मोखवाडी, दांडवाडी, वाघवाडी (दुर्गापुर), भावर्थेपाडा, धानिवली, ब्राम्हणगाव, टेमगाव, रामपुर, महाज, न्हावे, बांगरवाडी (करचोंडे), बांगरवाडी (कडूशेत), पैशाखरे, प्रधानपाडा, गोड्याचापाडा, खडकपाडा, उमरोली खुर्द, फांगणे, पेजवाडी, निरगुडपाडा (फागूळगव्हण), चासोळे (बु), तळवली, कोरावळे, तळ्याचीवाडी, सोगांळवाडी (रामपुर), मेंगाळवाडी (रामपुर), शिंदीपाडा, नांदेणी, सासणे, चिल्हरवाडी, खापरी, शेलगाव, जानपाटलाचापाडा ही 40 गाव/ पाडे शाश्वत जल स्त्रोताच्या मदतीने कायमसाठी टँकरमुक्त करण्यात यश मिळाले आहे. जिल्ह्यातील गाव/पाडे टँकरमुक्त करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.