पोलादपूर : महाराष्ट्र शासन शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवीत असून त्याचाच एक भाग म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना कामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अनेक सहशालेय उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आंबवडे सैनिक विकास मंडळ संचलित स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचिल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमांतर्गत दप्तराविना शाळा अनुभवताना विद्यार्थी व शिक्षकांनीही भात लावणीचा आनंद लुटला.
शेतातील आवन कसे काढावे, नांगरणी कशा पध्दतीने केली जाते, शेती मशागतीची पध्दत, भात लावण्यासाठी पावसाच्या पडणारे पाणी शेतात किती प्रमाणात आवश्यक असते, भात लावण्यासाठी किती प्रमाणात चिखल केला जातो आधुनिक पध्दतीने शेती कशी केली जाते याविषयी विद्यालयाचे शिक्षक प्रल्हाद चिविलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही भात लावणीचा आनंद घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जैतपाल, शिक्षक प्रल्हाद चिविलकर, महिपत कोकरे, ज्योती गीते आदी शिक्षकांनी ही विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होऊन भात लावणी च्या उपक्रमात सहभाग घेतला. शासनाच्या या सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांना कामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शासन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून शिक्षकांमार्फत विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे.