निळजे गावाजवळील रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांचे जनआंदोलन

डोंबिवली  :  निळजे गावाजवळून नवी दिल्ली ते जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्ग (डेडिकेटेड फ्रेड काॅरिडाॅर) जात आहे. या कामासाठी निळजे रेल्वे मार्गाजवळील अतिक्रमणे यापूर्वी तोडण्यात आली आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचा सर्व व्यवहार रेल्वे फाटकातून पलीकडील बाजारात आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी या रेल्वे फाटक भागात पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग बांधून देण्यात यावा. मगच रेल्वे फाटक बंद करावे, अशी मागणी निळजे ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत.

निळजे गावातील शाळकरी मुले या रेल्वे फाटकातून पलीकडील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी जातात. पलीकडील भागात बाजारपेठ आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार रेल्वे फाटकातील मार्गातून होत आहेत. हे फाटक बंद केले तर चार किलोमीटरचा वळसा घेऊन एका गैरसोयीच्या पुलाखालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागेल. हा भुयारी मार्ग ग्रामस्थांना विश्वासात न घेता फक्त विकासकांच्या सोयीने रेल्वेने बांधला आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचलेले असते. शाळेच्या लहान बस, दुचाकी वाहने या भुयारी मार्गातून जाऊ शकत नाही. मुसळधार पाऊस असला की या ठिकाणी तीन फूट पाणी असते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

निळजे गावाजवळून मुख्य रस्त्याला जाण्यासाठी पर्यायी रस्ते मार्ग प्रस्तावित आहेत. त्याची अंमलबजावणी व्हायची आहे. रेल्वे फाटक आता तोडून ग्रामस्थांची विशेषता शाळकरी मुलांची गैरसोय रेल्वेकडून केली जात आहे. रेल्वेने प्रथम रेल्वे फाटकाजवळ पादचारी उड्डाण पूल बांधावा, मगच रेल्वे फाटक बंद करावे आणि सुरक्षा चौकी तोडावी अशी आग्रही मागणी निळजे ग्रामस्थांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. रेल्वे अधिकारी या भागात पादचारी पूल प्रस्तावित असल्याचे ग्रामस्थांना सांगत आहेत. पण पहिले पादचारी पूल रेल्वे फाटकाजवळ उभारा मगच रेल्वे फाटक बंद करा, या विषयावर ग्रामस्थ अडून आहेत. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

Leave a Comment

× How can I help you?