ठाणे : पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचे प्रदर्शन विष्णुनगर येथील शाळा क्र. 19 मध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेशमूर्ती बनविता याव्यात यासाठी आज महापालिकेच्या किसननगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन तास सुरू असलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.. आणि बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्यांने गणेशाची मूर्ती साकारली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हा ओसंडून वाहत होता. प्रत्येकजण आपण त्यांनी बनविलेल्या गणेशाची मूर्ती ही आपल्या शिक्षकांना दाखवत होते.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमके काय ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्त्यांमुळे होणारे जलप्रदुषण, पर्यावरणाची हानी याबाबत माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, शाळेतील शिक्षक व प्रदुषण विभागाचे कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तीचे कौतुक केले. तसेच ठाणे महापालिकेच्या विष्णुनगर येथील शाळा क्र. 19 मध्ये भरविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक प्रदर्शनास नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन करीत सदरचे प्रदर्शन 4 ऑगस्ट 2024 पर्यत सुरू असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी नमूद केले.