जिसकी जितनी जरुरत थी, उतनाही पहचाना मुझे…

हर शनिवार एक शेर… 

 

अच्छे ने अच्छा और
बुरे ने बुरा जाना मुझे ~*
क्यों कि जिसकी जितनी जरुरत थी
उसने उतना ही पहचाना मुझे

“जशी दृष्टी तशी सृष्टी ” या वचनाचा अर्थ फार साधा आणि सोपा आहे.ज्या दृष्टीने आयुष्याकडे किंवा जगाकडे पाहावे तशा प्रकारचे जग दिसत राहते.जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कायम चांगल्या गोष्टींचे अनुभव येत राहतात. पण जर जगाकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले तर दुःख ,राग,भांडण, द्वेष ,असुया इ.बाबी वाट्याला येतात आणि जगणे किरकिरे होऊन जाते. मग आयुष्याचा आनंद उपभोगता येत नाही.हे झाले माणसाच्या दृष्टिकोनाबाबत, पण ज्यावेळी लोक मतलबी दृष्टीने इतरांबरोबर वागतात तेव्हा तो दृष्टिकोन सकारात्मकही नसतो व नकारात्मकही नसतो. तो त्या त्या माणसांचा आपमतलबी कोन असतो. मतलब साधणाऱ्यासाठी तो विचार सकारात्मक असेल तर ज्याच्याकडून मतलबाचे लोणी मिळवले त्याला ते नकारात्मक वाटेल. गरजेनुसार माणसे
एकमेकांना जवळ करतात आणि गरज संपली की दूर लोटतात. म्हणून तर‘गरज सरो व वैद्य मरो’ या म्हणीला सनातनी काळाचे वैभव लाभले आहे . लोकांच्या वागण्याचा तो अलिखित नियमच झाला आहे. एक संस्कृत सुभाषित आहे..ते म्हणते,

” कार्यार्थी भजते लोकं यावत्कार्य न सिद्धति ।
उत्तीर्णे च परे पारे नौकायां किं प्रयोजनम् ।।”
जोपर्यंत आपले काम होत नाही ,मतलब साधला जात नाही तोपर्यंत लोक तोंड भरून स्तुती करत राहतात आणि एकदा का काम झाले की त्या व्यक्तीला विसरून जातात.नदी पार केल्यानंतर होडीचा उपयोग राहात नाही.तसाच मनुष्य स्वभाव आहे.
” कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी ”
या लहाणपणी शिकलेल्या म्हणीचा अर्थ आपल्याला मोठे झाल्यावर कळायला लागतो. समाजात काय ,नात्यात काय अगदी घराघरात या म्हणीचा प्रत्यय येताना दिसतो. आजीआजोबा आणि आईवडिलांच्या कैफियती वर्तमानपत्रे,दूरदर्शन ,कथा, कादंबरी नाटकात आपण वाचत आणि पाहात असतो. नातवंडे तीन-चार वर्षाची असेपर्यंत ती आजोबा आजींच्या मागे मागे असतात. नंतर जसजसं त्याचं क्षितिज विस्तारत जातं, तसतसं आजीआजोबा त्यांना नकोसे वाटायला लागतात.स्वत:चा मुलगा देखील त्याच्या लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी आई वडिलांना प्रेमाने आश्रय देतो.एकदा का त्याची मुले मोठी झाली की आईवडिलांची गरज संपते आणि मग प्रेमाचा झरा लगेचच आटतो.अशी कितीतरी उदाहरणे नित्य पाहायला मिळतात. विशेषतः परदेशी राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत या गोष्टी मोठ्याप्रमाणात घडताना आढळतात. हीच परिस्थिती संस्था, राजकीय पक्ष,व नेते यांच्या बाबतीतही घडत असते. मतलब वा फायदा असेपर्यंत त्यांची प्रशंसा केली जाते,त्यांचा वापर केला जातो. एकदा का कार्यभार साधला की त्यांना वाऱ्यावर सोडले जाते.सगळीच माणसं चांगली नसतात आणि सगळीच माणसं वाईटही नसतात. भल्याबुऱ्या माणसांचा मिळून समाज झालेला असतो.जशी वेळेची गरज असेल त्याप्रमाणे माणसं एकमेकांविषयी वाईट बोलतात आणि चांगलंही बोलतात. माणसांचा दृष्टिकोन फार वेचक (Selective) असतो. ज्यावेळेला जशी गरज असेल त्याप्रमाणे माणसं प्रशंसा करतात आणि अपेक्षित झाले नाही की लाखोलीही वाहतात.वारा येईल तशी पाठ फिरवत राहतात. शेवटी काय तर सर्व दुनिया मतलबाचा आधार घेत चालू आहे.

मतलबी ही दुनिया सारी
सोय पाहुनी नाते जपते
कधी प्रशंसा कधी लाखोली
फत्ते होता पाठ दाखवते

©️®️ मोरेश्वर बागडे..

Leave a Comment

× How can I help you?