अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांना निवडणूक जड जाणार
मनसेचे राजू पाटील देणार उबाठा गटाला मदतीचा हात
शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी चाळीस पेक्षा जास्त आमदारांची साथ मिळाली. यातील बहुतांश आमदारांना एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली. पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या बंडाला साथ देणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. किणीकर यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते. त्याला कारण होते स्थानिक नेत्यांचा त्यांना होत असलेला विरोध. हा विरोध काहीसा थंडावत असतानाच आता मनसेचे आमदार राजू पाटील हे बालाजी किणेकरांविरोधात उतरले आहेत. त्यांनी उद्धवसेनेचे राजेश वानखेडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपूत्र खा. श्रीकांत शिंदे यांना मदतीचा आणि मैत्रीचा हात देणारे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत मात्र उद्धव ठाकरे गटाचे राजेश वानखेडे यांना मदत जाहीर करताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. उमेदवार ठरविताना स्थानिक शिंदे गटाच्या नेत्यांनी कल्याण ग्रामीणचा उमेदवार ठरवताना मनसेला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे नुकत्याच मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करू असे सूतोवाच केले. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अंबरनाथ विधानसभेत चांगली मते मिळाली. कोणतीही संघटनात्मक बांधणी किंवा ताकद नसताना मिळालेली ही मते शिवसेना शिंदे गटासाठी धोक्याची घंटा होती.
राजेश वानखेडे आणि राजू पाटील हे मनसेचे कुणाल भोईर यांच्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी पाटील यांनी बोलताना वानखेडे हे आपले मित्र असून त्यांना मदत करूच, पक्ष काय निर्णय घेतो तेही पाहू असे वक्तव्य केले. त्यामुळे मनसे अंबरनाथ विधानसभेत ठाकरे गटाला मदत करणार असल्यास त्याचा फटका बालाजी किणीकर यांना बसण्याची शक्यता आहे.
वंचित गटातही पक्षांतर्गत मतभेद आहेत. वंचितच्या उमेदवाराबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे नाराजांचा हा गटही उबाठा गटाच्या वानखेडेंनाच मतदान करणार असून वानखेडे यांचा प्रचार करणार आहे. त्यामुळे एकीकडे पक्षांतर्गत नाराजी, दुसरीकडे मनसेची आणि नाराज वंचितची उबाठाला मदत यामुळे शिंदेगटाचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.एकूणच विजयाचे पारडे उबाठा गटाच्या राजेश वानखेडे यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आत्तातरी दिसत आहे.