‘साहेबां’ची सभा, जनतेचे प्रश्न आणि ‘समोसे’

प्रचारसभांचा शेवटचा रविवार. इतर ठिकाणच्या सभा आटोपून नेहेमीप्रमाणेच साहेब उशीरा सभेला पोहोचले. स्टेजवर चढून गर्दीकडे एक कटाक्ष टाकला. आज गर्दी जास्त होती. कारण भाषण संपल्यावर ‘समोसे’ वाटले जाणार होते. साहेबांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, ‘बंधू आणि भगिनींनो, सध्या देश कठीण परिस्थितीतून जात आहे.’साहेबांचे हे वाक्य कानावर पडताच ज्येष्ठ नागरिकांचा एक घोळका एका सुरात खोकला आणि म्हणाला, ‘आम्ही खूप दिवसांपासून कठीण काळात आहोत. तुम्हाला आता कळले?’

साहेबांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले. भाषण पुढे नेत ते म्हणाले, ‘आम्ही तुमच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. रस्ते बांधले जात आहेत, रुग्णालये सुरू होत आहेत, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.’
तेव्हा एका तरुणांच्या एका घोळक्याने प्रश्न विचारला, ‘रस्ते कुठे बनवले जात आहेत? आमच्यापैकी अनेकजण रस्त्यांवरच्या खड्ड्यात पडून अपघात झालेत!’

गर्दीत गोंधळ झाला. पण साहेबांना काही देणेघेणे नव्हते. ते लिहिलेले भाषण वाचत होते, ‘आमच्या सरकारने प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते आणि आज ते पूर्ण होत आहे.’
तेव्हा एक सभेतील महिला तावातावाने म्हणाल्या, ‘पाणी आहे, पण नळात नाही. साहेब, पाणी तर आमच्या डोळ्यांत आहे!’

महिलांच्या पाण्याविषयाच्या प्रश्नातले गांभीर्य सोडून जनतेच्या डोळ्यांत हसून हसून पाणी आले. पण साहेब त्याच्याच तोऱ्यात होता. पुढे त्यांने वचन दिले, ‘येत्या काळात आम्ही तुम्हाला वीज देऊ जी कधीही जाणार नाही.’
यावर गर्दी एकसुरात ओरडली, ‘हो, कारण ती येणारच नाही तर जाईल तरी कशी?’

आता साहेब थोडेसे अस्वस्थ झाले. तरीही त्यांनी आपले सर्वात शक्तिशाली वचन दिले, ‘आम्ही प्रत्येक व्यक्तीला रोजगार देऊ!’
यावेळी एक बेरोजगार तरुणाचा एक घोळका उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘साहेब, तुम्हाला रोजगार देण्याची एवढी आवड असेल तर आम्हाला तुमचे भाषण लिहिण्याचे काम द्या. निदान सत्याचा थोडा मसाला त्यात भरला जाईल! तुमच्या चार-पाच बंगल्यांवर आम्हाला काम द्या. ‘

गर्दीत एकच हशा पिकला. भाषणाचा काहीही परिणाम होत नाही हे साहेबांना एव्हाना समजले होते. त्यांनी शेवटी घोषणा केली, तुम्ही मला आणि आमच्या उमेदवारांना निवडून द्या. तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवू. पण तुम्हाला असेच घरी सोडणार नाही. समोसे खा आणि मगच घरी जा.’

साहेबांच्या या घोषणेचा चांगलाच परिणाम झाला. सभेतली तापलेली हवा काहीशी थंडावू लागली. साहेबांनी सभेचा रंग ओळखला आणि सभेतून काढता पाय घेतला.

साहेबांनी गाडीत बसताना पाहिले, काहिसे हसले. कारण जनता त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या विसरून समोसे खाण्यात गुंग होती… प्रत्येकाच्या हातातील समोश्यात साहेबाला मतांची बेरीज दिसत होती…

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?