सन 2006… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच आपली नाराजी जाहीरपणे प्रकट करत राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन सेनेची स्थापना त्यांनी केली. बाळासाहेबांचा खरा राजकीय वारसदार हा मुखवटा राज यांच्याबरोबर होताच. त्यामुळे ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या लाखो जनसमुदायाच्या सभा व्हायच्या त्याच शिवाजी पार्कने राज ठाकरे यांचीही लाखोंची गर्दी असलेली सभा पाहिली आणि एक नवा नेता लाभला याचे सौख्य राज्याला लाभले.
पक्षस्थापने नंतर एकाच वर्षात मनसे महापालिका निवडणुकांना सामोरी गेली आणि अविश्वनीय असे मतदान महाराष्ट्रवायीसांनी मनसेला केले. मनसेचे मुंबई महापालिकेत 28, कल्याण डोंबिवली महापालिकेत 27 तर नाशिकमध्ये 40 नगरसेवक निवडून आले. नंतर आल्या विधानसभा. यातही मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. पण आज पक्षीय ताकद शून्य आहे.
कधी बिनशर्त पाठिंबा तर कधी सशर्त पाठिंबा, कधी बाहेरून पाठिंबा तर कधी आतून तर कधी एकतर्फी पाठिंबा; असे पाठिंब्याचे नाना प्रकार राबविण्याच्या वृत्तीमुळेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दारुण पराभवाचे सावट पसरले आहे. हे सावट इतके गहिरे आहे कि त्यांच्या पक्षाची मान्यताच रद्द होऊ शकते. राज यांच्या याच धरसोड वृत्तीमुळे थांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह ठाण्यातील लोकप्रिय उमेदवार, जे 24 x 7 जनतेसाठी तत्पर असतात त्या अविनाश जाधव यांनाही दारुण पराभव पाहावा लागला.
पक्षाच्या या मानहानीकारक परिस्थितीचे कारण राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासात दडले आहे. विकासाची ‘ब्लू प्रीन्ट’ घेऊन निघालेल्या राज ठाकरे यांना जनतेनेच नाकारले होते. मुळात जेव्हा राजकीय पक्ष काढला जातो तेव्हा त्या नेत्याला राज्यातील प्रत्येक निवडणुकीत रस असावा लागतो. मात्र, राज ठाकरे यांच्या राजकारणात याविषयी सातत्यपूर्ण अभाव दिसून आला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या पातळीवरच्या निवडणुका न लढवता राज यांनी थेट आमदार-खासदार निवडणुकीत रस घेतला.
राज यांच्या वारंवार बदलणाऱया ‘राज’कीय भूमिकांमुळे मनसेचा कार्यकर्ता तुटत गेला. पक्षबांधणीत राज ठाकरे कमकुवत ठरले. पक्षबांधणीसाठी येणाऱया प्रत्येक निवडणुकीत सहभागी होणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. त्यांनी काही वेळा उमेदवार उभे केले नाही, काही वेळा ठराविक नेत्यांच्या विरोधातच उमेदवार दिले. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. स्वतचा पक्ष असताना निवडणूक न लढता असा पाठिंबा देण्यामुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता कमी होत गेली आणि आज पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे.
ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर, उद्धव सेनेचे राजन विचारे आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्यात प्रामुख्याने तिरंगी लढत झाली. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार केला होता. ठाणे स्थानकात फलक हातात घेऊन त्यांनी प्रचार केला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याप्रमाणेच ‘एकदा संधी देऊ पाहा’ म्हणून मतदारांना आवाहन केले. राज ठाकरे यांच्या दोन जंगी जाहीर सभा झाल्या. शर्मिला ठाकरे यांनी चौक सभा घेतल्या होत्या. एकूणच प्रचारातील वातावरण निर्मितीमुळे मनसेची प्रचारात हवा दिसून येत होती. परंतु जे व्हायचे तेच झाले. त्यांच्या सभांना दिसणारी तुडुंब गर्दी मतात परिवर्तित करण्यात त्यांना पुन्हा एकदा अपयश आले. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांनी महायुतीबाबत दाखवलेला सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी मनसेसाठी आशेचा किरण ठरेल आणि राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार कमबॅक करतील अशी आशा मनसेसह त्यांच्या समर्थकांना होती. त्यांना अमित ठाकरेंच्या विजयासह कमीत कमी 5 तरी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता. पण तसं काही झालंच नाही. मनसेने 125 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकही ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या खलबतानंतर राज ठाकरेंनी आपण लोकसभेला नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. एव्हाना त्यांनी युतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेतल्या आणि एकंदरीत भाजप, शिवसेना या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी वाढती जवळीक यामुळे ते महायुतीशी जुळवून घेतील अशी आशा मनसेच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही होती. पण तसं काही झालंच नाही.
उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाण्यासह पुणे, नाशिक या महत्वाच्या शहरांत शह देण्यासाठी महायुतीला सोबत घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेही अनुकूल होते. पण एकीकडे महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच तिकडे राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभांमधून स्वबळाचा नारा देत एकापाठोपाठ उमेदवारांची घोषणाही करण्यास सुरुवात केली. तिथेच राज ठाकरेंची मोठी चूक झाल्याचं बोललं जात आहे.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी असलेला कनेक्ट पाहता त्यांनी राज ठाकरेंना नक्कीच काही आमदारांना निवडून आणण्याची शाश्वती दिली असती.तसेच महायुतीसोबत राज ठाकरेंच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेला नेता आल्याचा फायदा ओळखून तसेच त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे महायुतीच्या प्रचाराला आणखीनच धार चढण्याची शक्यता होती. ही बाब दिल्लीतील चाणाक्ष भाजप नेत्यांनी नक्कीच हेरून राज ठाकरेंसाठी पायघड्या घातल्या असत्या. जर राज ठाकरेंनी आपली ताठर भूमिका सोडून महायुतीशी सूत जुळवून घेतलं असतं तर आज नक्कीच मनसेच्या खात्यात कमीत कमी शून्य नसता. म्हणूनच शून्यातून नवनिर्माण करायचं असेल तर त्यांच्या पक्षाची आणि पक्षचिन्हाची मान्यता रद्द होणं, यातच मनसेच्या कार्यकर्त्यांचं भलं आहे. कारण या पक्षात त्यांना आता राजकीय भवितव्य नाही.
: मनीष चंद्रशेखर वाघ