संविधानाने भारताला ओळख दिली

 

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला सादर केले आणि या लोककल्याणकारी संविधानाची अंमलजावणी २६ जानेवारी १९५० पासून झाली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व संविधान सभेच्या दोन वर्ष अकरा महीने अठरा दिवसांच्या अथक प्रयत्नातून भारतीय संविधान निर्माण झाले. संविधानाने आपल्याला सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व दिले.सनातनी धर्मव्यवस्थेने कष्टकरी, स्त्रिया, श्रमकरी, शेतकरी वर्गाचे नाकारलेले अधिकार संविधानाने दिले.भारतीय संविधानाने समता दिली.
जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत, भाषा आणि जन्मस्थान यावरून कोणताही भेदभाव करता येणार नाही, याची हमी भारतीय संविधानाने कलम १४, १५ ,१६ ने दिलेली आहे.प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले.. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संशोधन, लेखन आणि प्रबोधन करणाया अनेक महापुरुषांचा छळ झाला, त्यांच्या हत्या झाल्या, त्यामुळे असंख्य सृजनशील पूर्वजांना व्यक्त होता आले नाही. व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान देते.

आपले विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने कलम 19 नुसार दिलेले आहे. म्हणून आज वंचित समाज मुक्तपणे बोलू लागला आहे लिहू लागला आहे. दृष्टिहीन असलेले कवी अनिल साबळे बाबासाहेबांच्या संविधानाबाबत ,‘म्हणून बाबांनी संविधान लिहिलं’ या शीर्षकाच्या कवितेतून व्यक्त होताना म्हणतात…

मी म्हटलं, ‘पाणी वाढ गं माय’
बाईने मला वरून पाणी वाढलं
वरून पाणी वाढणाऱ्या बाईला
आईचा पान्हा फुटावा म्हणून
बाबांनी संविधान लिहिलं.

रस्त्यात भेटलेल्या पाटलाला
मी वाकून जोहार केला
मला ताठ मानेने जयभीम!
म्हणता यावं म्हणून
बाबांनी संविधान लिहिलं.

गुरुजी एकलव्याची गोष्ट
शिकवत होते
माझ्या डोळ्यांतून अंगठा तुटलेल्या
एकलव्याचं रक्त वाहत होतं
गुरुजींनी द्रोणाचा अवतार घेऊ नये
माझाही एकलव्य होऊ नये म्हणून
बाबांनी संविधान लिहिलं.

बापाने मुलाच्या नावावर
जमिनजुमला केला
मुलीला बसायला
ओटाही नाही दिला
बापाच्या घरची ओसरी
मुलीलाही मिळावी म्हणून
बाबांनी संविधान लिहिलं.

निर्भीडपणे व्यक्त होण्याची ताकद संविधान देते. उपेक्षित वर्गाला राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे, याची तरतूद संविधानाने केलेली आहे, यालाच आपण आरक्षण म्हणतो. भारतीय संविधानातील कलम ३४०, ३४१, आणि ३४२ या कलमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांना भारतीय संविधानाने आरक्षण दिलेले आहे.संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा, नेता निवडण्याचा, नेतृत्व करण्याचा अधिकार दिला. एखाद्या उद्योगपतीचे, नेत्यांचे आणि झोपडपट्टीमध्ये राहणाया नागरिकाच्या मताचे मूल्य एकच आहे.ही समानतेची सुंदरता आपल्या संविधानात आहे. अनेक जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, भौगोलिक विविधता असणाऱया देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले आहे. याच संविधानाने भारताला जगात ओळख निर्माण करून दिली.

भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे जितके कर्तव्यकठोर आहे तितकेच लवचिक आहे. मूळ चौकटीत बदल न करता घटनादुरुस्ती करण्याची तरतूद संविधानात आहे. लोकोपयोगी अनेकवेळा घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. संविधानाचा आदर करणे, संविधानाचे संवर्धन करणे आणि संविधानाचे रक्षण करणे हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.

: मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?