तुला खूप दिवसांपासून सांगायच्याआहेत, अशा बऱ्याच गोष्टी माझ्या मनात आहेत.. खूप दिवसांपासून माझ्या वेदना तुझ्यासोबत शेअर करायच्या होत्या. म्हणूनच आज पर्वत दिनाचे निमित्त साधून तुझ्याशी पत्रसंवाद साधतोय. या धावपळीच्या जीवनात काहीतरी नवीन मिळवण्याच्या इच्छेने, अपेक्षेने तू मला विसरलास याचे मला वाईट वाटते आहे. पूर्वी मी तुझ्या प्रगतीवर खूश होतो. मला तुझा अभिमान वाटायचा. पण या प्रगतीमुळे झालेली आपली दुरवस्था बघून आता जगणंच नकोसं होतंय.
संपूर्ण देश राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीत गुंग होता. पण काँक्रीट आणि संगमरवरी बनवलेल्या धरण, रस्ते, पॉवर हाऊस आणि इमारतींच्या ग्लॅमरमध्ये आपण निसर्गाशी कसे वागत आहोत हेच मानवाच्या लक्षात आलेलं नाही. सुखसोयीतून विद्ध्वंसाच्या युगात आपण केव्हा प्रवेश करतो ते आपल्या लक्षात येत नाही. केदारनाथसारखा मोठा पूर किंवा जोशीमठसारखे मोठे भूस्खलन असो, सगळ्यात जास्त हादरा आपल्यालाच बसतो पण आपला आक्रोश कोणीच ऐकू शकत नाही., हेच आपलं दुर्दैवं आहे.
आज आपला प्रत्येक अवयव तुडवला जातोय. पावसाचे पाणी शोषून आपले दगड हिरवे झालेत. रोज अचानक सुरू होणाऱया पावसात स्वतःला सांभाळायची संधी हातातून निसटते. कधी कधी माणसांना आपल्याजवळ येताना पाहून आनंद व्हायचा. हिरव्यागार गवतावर त्याचे पाय धावले की गुदगुल्या झाल्यासारखे वाटायचे. जवळचे कोणीतरी आपल्याकडे येतंय असे वाटायचे, पण आता दूरच्या रस्त्यांवरच्या फूटपाथवर चारचाकी असलेला धातूचा राक्षस दिसला की भीती वाटू लागते. त्या गाडीत बसून आपल्याला तोडायला कोण येत असेल कुणास ठाऊक असा विचार करत. आपल्या वरची ही झाडे-वनस्पती हिरवाईने नटली होती. वसंत ऋतू ही त्यांची शोभा होती, हिवाळ्यातील सूर्य त्यांच्यावर पडला की त्यांचे चेहरे उजळत असत. पण जेव्हापासून मानवी लोभ आपल्यापर्यंत पोहोचला, तेव्हापासून या शोभेची चमक दिवसेंदिवस कमी होताना आपण बघत आहोत. कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही.
वर्षभर आपण वेगवेगळ्या ऋतूंसोबत नाचतो-गातो. पावसाळा तर आपला सृजनकर्ताच. पण आता वर्षभर कोसळणारा हा पाऊस बघून भीती वाटू लागते. या पावसात दरवर्षी आपल्यावर घडणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूची दृश्ये आणि विनाशाच्या कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आजवर असंख्य कुटुंबे हसत खेळत आली. पण आता अनेक कुटुंबांना वेगळे करायची पाप आपल्या माथी मारले जाते. काही प्रियकरांना त्याच्या जोडीदारापासून वेगळे केले, तर काही आयांनी आपला मुलगा गमावला. कोणाच्या तरी वडिलांचा खून आपल्या अंगावर होत असताना, कोणाच्या तरी पतीच्या मृत्यूसाठी आपल्यालाच जबाबदार धरले जातेय. पण तूच सांग, आपण खरंच गुन्हेगार आहोत का? आपण एकाच जागी थांबलो आहोत, हाच आपला दोष आहे का? ‘शांतता फक्त डोंगरातच मिळते’ असं म्हटलं जायचं तेव्हा खूप समाधान मिळायचं आपल्याला. पण माणसाचा स्पर्श आपल्याला झाला आणि सगळी शांतताच कुठेतरी हरवली.
आधुनिकतेच्या हव्यासाने माणसाला इतकं आंधळं करून टाकलंय की आपण रोज थोडं थोडं मरतोय हे आपल्याच लक्षात आलं नाही. आपल्याला कापून रस्ते बांधले गेले. आपल्याला फोडून बोगदे बांधले जाताहेत, कॅव्हिटी पार्किंग होतंय. डोंगराळ भागाच्या विकासासाठी आधुनिक प्रकल्प आवश्यक आहेत हे खरे आहे. पण ते विनाशाचे कारण ठरत असतील, तर या बाबींचा पुनर्विचार व्हायला नको का? आज आपला असंख्य बांधव धोक्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यत भयंकर निष्काळजीपणा दाखवणारी सरकारे आता काय पावले उचलणार, हाच प्रश्न आहे आणि भविष्यात कोणती आपत्ती आलीच, तर दोष आपल्यावर नको एवढीच अपेक्षा आजच्या पर्वत दिनानिमित्त व्यक्त करतो.
तुझाच मित्र डोंगर