जिल्हा रुग्णालयांची अग्निसुरक्षा रामभरोसे

राज्याच्या जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याने येथील अग्निसुरक्षा रामभरोसे असल्याचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या  म्हणजेच ‘कॅग’च्या अहवालातून उघड झाले आहे. मागील काही वर्षात राज्यातील रुग्णालयांना आग लागल्याच्या काही दुर्घटना घडून रुग्णबळीही गेले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने रुग्णालयांमधील अग्निशमन व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले होते. मात्र कॅगने 50 सरकारी रुग्णालयांची चाचणी तपासणी केली असता यापैकी 36 रुग्णालये अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते. 22 रुग्णालयांनी धूर-शोधक यंत्र बसविले नव्हते, 20 रुग्णालयांनी आगीची सूचना देणारी यंत्रणाच बसविली नव्हती. 21 रुग्णालयांत आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचा मार्गच दाखविण्यात आलेला नव्हता. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड या जिह्ययातील बहुतांश रुग्णालयांनी विभागाच्या शिफारसींची पूर्तताच केलेली नसल्याचा धक्कादायक अहवाल ‘कॅग’ने प्रकाशित केला आहे.

राज्यातील अनेक ग्रामीण रुग्णालयांची आगीच्या तडाख्यापासून बचाव करणारी यंत्रणा रामभरोसे आहे.  राज्यात झालेल्या अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. या नंतर या रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अनेक नर्सिंग होम आणि सर्वसाधारण रुग्णालयांना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देखील नसल्याचे दिसून येत आहे. काहींमध्ये ही यंत्रणा असली तरी त्याची मुदत संपल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याने एखादी दुर्घटना झाल्यास मोठी हानी होऊ शकते. शासकीय सर्वसाधारण रुग्णालयांची अवस्थाही वाईट आहे. या रुग्णालयांमध्ये अडगळीच्या ठिकाणी भंगाराचे सामान ठेवले जाते. सतत वर्दळ असलेल्या या रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम असायला हवी. मात्र, अग्निसुरक्षेबाबत या रुग्णालयात हेळसांड होताना दिसते. त्यामुळे शेकडो रुग्णांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो.

दररोज हजारो रुग्णांची ये-जा असलेल्या आणि शंभरहून अधिक आंतररुग्ण असलेल्या रुग्णालयांत रुग्णांबरोबरच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा महत्त्वाची असल्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणाच बसवण्यात आली नसून या रुग्णालयांत ही यंत्रणा अत्यावश्यक असल्याचा अहवाल अग्निशमन विभागाकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

Leave a Comment

× How can I help you?