अनेक राजकीय रुसव्याफुगव्यांनंतर अखेर महाराष्ट्राचे मंत्री घोषित झाले आणि मंत्र्यांना खातेवाटपही करण्यात आले. यात ओवळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना परिवहन खाते मिळाले. परिवहन मंत्री होताच प्रताप सरनाईक यांनी लागलीच ठाण्याचे खोपट एसटी स्थानक गाठले. कदाचित एसटी स्थानकावर कशाप्रकारे गलनाथ कारभार असतो, याची जाणीव मंत्रीमहोदयांना नसावी म्हणून त्यांनी खोपट स्थानक भेटीनंतर संताप व्यक्त केला. स्थानक अधिकाऱयांना अनेक सूचना केल्या आणि कारभार सुधारण्याचे आदेश दिले.
सरनाईक यांच्या आधीही अनेक परिवहन मंत्री आले-गेले. प्रत्येकाने अनेक स्थानकांना भेटी दिल्या, अनेक स्थानकांच्या पहाण्या केल्या. तरी राज्यातील एसटी स्थानकांची परिस्थिती जैसे थे राहिली. सरनाईक या खात्याचे मंत्री झाले आणि कोणाला नसेल इतके हायसे या स्थानकांना वाटले असेल. कारण ‘हाती घेतलेले काम पूर्ण करणारा नेता’ अशीच त्यांची ख्याती आहे. त्यामुळे एसटी आणि एसटी स्थानके यांना अच्छे दिन येऊन एसटीला गती मिळेल असा विश्वास राज्यातील नागरीक व्यक्त करत आहेत.
राज्यातील बस स्थानकांच्या स्वच्छतेचा आढावा घेतला तर सर्व बस स्थानके निकृष्ट असल्याचे दिसेल. खुद्द एसटीच्या मुख्यालय असलेले मुंबई सेंट्रल बस स्थानकही निकृष्ट असल्याचे दिसते. मात्र त्यानंतरही काही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. अनेत स्थानकांवरील सुलभ शौचालये बंद असतात. तर काहीची अवस्था म्हणजे तिथे जाणेच नकोसे वाटते. बस स्थानकांवरील आसनव्यवस्था तुटलेल्या अवस्थेत असते. कचरा तर जिथे तिथे ओसंडून वाहत असतो. मात्र त्याकडे वर्षोन् वर्षे दुर्लक्ष होत आले आहे. अनेक स्थानकांवरील भिंती पिचकाऱयांनी रंगलेल्या असतात.
अनेक बसस्थानकांवरील रस्ते उखडलेले आहेत. अनेक स्थानके तर गर्दुल्यांचे आगार झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लांब पल्ल्यावर प्रवास करणारे प्रवासी रात्रीला प्रवास करणे पसंत करतात; मात्र स्थानकांवर पुरेशा सुरक्षा आणि सुविधा नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. संध्याकाळ झाली की प्रवाशांना आपली एसटी कुठे लागली याची माहिती देणारे इंडिकेटरही अनेक ठिकाणी नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम होत असल्याचे दिसून येत आहे. याविषयी तक्रार करण्यासाठी स्थानक प्रमुखाला भेटावे तर ते जागेवर नसतात. कधी येतील, कुठे गेलेत कोणालाच काही माहित नसते किंवा कोणी नीट उत्तर देत नाही. अशा परिवहन विभागाचे मंत्रीपद प्रताप सरनाईक यांनी मिळाल्याने ‘काम तडीस नेणारा’ हा मंत्री तरी एसटी विभागाचा कारभार स्वच्छ करतो ते आता पाहायचे.