नव्या वर्षात एक ‘साम्राज्य’ नक्कीच संपणार

‘हिंदुहृदयसम्राट’ या बहुमानाचा मुकुट आता हळूहळू तलवारीच्या म्यानात बदलताना दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे त्या म्यानात एकत्र बसण्याचे दिवस आता संपले आहेत. 2025 मध्ये, जेव्हा आमचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील, तेव्हा दोघांपैकी एकाच्या साम्राज्याला निरोप देण्याची वेळ येईल. तसे पाहायला गेले तर नरेंद्रभाईंनी सप्टेंबर 2015 च्या पहिल्या आठवड्यापासूनच ‘भागवत पुराणा’चे उद्यापन करायला घेतले होते. त्यानंतर त्या दोघांचे एकमेकांना ‘राम राम’ करण्याचे, म्हणण्याचे फक्त नाटक होते.

मंदिर-मशीद वाद रोज उठवणाऱयांवर भागवतजी ज्यावेळी समजावत होते, त्यानंतर हिंदू धर्मातील लोकमान्य, अर्धमान्य आणि स्वयंघोषित संत-महात्मे ज्या प्रकारे भागवतजींवर तुटून पडले ही खरोखर चिंतेची बाब आहे. प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याच्या प्रवृत्तीवर संघप्रमुखांनी हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मग यावेळी त्यांच्या उपदेशाच्या शालीला इतके कलंकित करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत? त्यामुळेच पुढील वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यांत भारतीय राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

आठ महिन्यांनंतर या महाभारताच्या अठराव्या दिवसाचे युद्ध सुरू होईल आणि मग विविध गटांच्या गदारोळात संघ भाजपच्या पितामहची भूमिका बजावत राहणार की आपल्याच अपत्याच्या मजबुरीवर आयुष्य कंठत राहील, हे बघावं लागेल. अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस जितेंद्रनंद सरस्वतींपासून रामभद्राचार्यांपर्यंत आणि चक्रपाणींपासून देवकीनंदन ठाकूर यांच्यापर्यंत मोहन भागवतांच्या बोलण्याविरोधात उभं राहीलं तर समजू शकतं. पण अविमुत्तेश्वरानंद यांच्यासारख्या चैतन्य ऋषींनीही या भागवत विरोधी दलात सामिल व्हावं, ही खरोखर आश्चर्याची बाब आहे.

गेल्या चार-पाच वर्षांपासून भागवत यांची सरसंघचालकपदावरून हकालपट्टी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी नरेंद्रभाईंच्या सांगण्यावरून भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ‘आता भाजप स्वयं सक्षम आहे आणि त्यांना संघाच्या पाठिंब्याची गरज नाही’ असे सांगून संघाचा दर्जा खालावण्याचा गुन्हा केला. तेव्हा भागवतांनी धम्म पुराण असे उलट वाचले, की नरेंद्रभाईंचे ‘चारसौ पार’चे स्वप्न धुळीत मिळाले. संघाच्या पाठिंब्याशिवाय रामलल्लाचे भव्य आणि दिव्य मंदिर अयोध्येतही भाजपला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. संत समाजाच्या विधानांनी भावनिक लाटा उठवल्या, पण त्या लाटेचे भाजपच्या मतांमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी संघ स्वयंसेवकांनी नाकारली तर काय होते, हे नरेंद्रभाईंनी पाहिले आहे.

भागवतजी आणि नरेंद्रभाई यांच्यातील हा तणाव आणखी वाढणार आहे. कारण फेब्रुवारीमध्ये भाजपला नवा अध्यक्ष मिळणार आहे. हे नियोजन करताना नरेंद्रभाईंना माहित आहे की संघाच्या संमतीशिवाय ते आपल्या एकाही अनुयायाला राष्ट्रपती बनवू शकणार नाहीत आणि कोणाच्याही वैयक्तिक अनुयायाला ते भाजपचे अध्यक्ष बनवू देणार नाहीत असा भागवतजींचा निर्धार आहे. जो कोणी एक होईल, त्याची निष्ठा कोणा एका व्यक्तीप्रती नसून संस्थेवर असली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. दहा वर्षांपासून व्यक्तिनिष्ठेच्या वातावरणात गुदमरलेल्या भाजपला बाहेर काढून पुन्हा संघटनात्मक वातावरणाकडे न्यायचे काम भागवतजींना करायचे आहे. तर नरेंद्रभाई किमान गेल्या पाच वर्षांपासून  संघ ताब्यात घेण्याच्या तयारीत गुंतले आहेत. त्यामुळे भागवत आणि नरेंद्रभाई यांच्यातील चेकमेटचा हा खेळ अधिक कडवट होणार आहे.

नवीन मंदिर-मशीद वाद निर्माण न करण्याच्या भागवतांच्या वैयक्तिक मताशी एक संघटना म्हणून संघ सहमत आहे की असहमत आहे, अशा चर्चा करून कोणाला काय मिळवायचे आहे, हे सांगायला कोणा पंडिताची गरज नाही. मंदिर-मशिदीच्या धार्मिक समस्यांतून मार्ग काढण्यासाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशा अफवाही पसरवल्या जात आहेत. संघाच्या कार्यकर्त्यांना गोंधळात टाकण्याच्या या कारस्थानामागे कोणाचा चेहरा असेल? या कृष्णकृत्यामागे काय हेतू आहे असावा? यावरूनच 2025 संपता संपता भागवतजी किंवा नरेंद्रभाई या दोघांपैकी एकाची सत्ता संपणार, हे निश्चित.

: मनीष वाघ

 

Leave a Comment

× How can I help you?