… ही मुले तिरंग्याने पोट भरतात!

२६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे राष्ट्रीय सण जवळ आले की शहरातील सर्व प्रमुख चौक, ट्रॅफिक सिग्नल, रस्त्यांवर तिरंगा ध्वज विकणारी मुलं दिसतात. या मुलांना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन म्हणजे काय, या दिवसाचे महत्त्व माहित नसतं. त्यांना एवढंच कळतं की आई-बाबांनी होलसेल मार्केटमधून तिरंगी झेंडे आणले की, विकायला उभं राहायचं. गाड्यांमधून फिरणारे, पायी जाणारे लोक ते झेंडे विकत घेतात आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचं पोट त्या दिवसासाठी तरी भरतं. आई – बापाच्या मागे उन्हातान्हात वणवण फिरायचं, हाताला काही काम मिळालं तर करायचं नाही तर भिक मागून रोजची भाकरी मिळवायची, हेच यांचं स्वातंत्र्य आणि हाच यांचा प्रजासत्ताक !

सिग्नलवर तिरंगा विकणाऱ्या मुलीला, आपण विकत असलेला ध्वज हे महात्मा गांधींचे प्रतीक आहे, असं बापाकडून कळलेलं असतं. स्टेशन बाहेर झेंडे विकणारा १० वर्षांचा ‘सीतारा’ हा मुलगा एरवी भीक मागून कुटुंबाला हातभार लावत असतो. बाजारात तिरंगे विक्रीला आले की तो आणि त्याचे कुटुंब खुश असतात. कारण विकत घेणारे गिऱ्हाईक यात काहीच घासाघीस न करता, १० – २० रुपये सहज हातावर टेकवतात. त्यामुळे या तीन-चार दिवसात तो
त्याची आईसक्रीम खायची हौस आईच्या मागे लागून भागवून घेतो. त्याची लहान बहिण, काका, आई – बाबा सगळेच स्टेशनबाहेर जवळपासच्या अंतरावर झेंडे विकतात.
,
या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या तारखा कळत नाहीत. प्रजासत्ताक दिन – स्वातंत्र्यदिन याचा अर्थ, महत्त्व माहीत नाही. पण त्यांना हे माहीत आहे की, या निमित्ताने झेंडे विकून त्यांना खायला पैसे मिळतात. या कुटुंबांसाठी देशभक्ती हा टीव्हीवरील चर्चेचा विषय नसून उपजीविका आहे. यामुळेच ही झेंडे विकणारी मुलं तिरंग्याची काळजी घेतात. राष्ट्रीय सणांच्या दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर पडलेल्या झेंड्यांची योग्य ती विल्हेवाट लावतात. कधी झेंडे विकताना पाऊस आलाच तर स्वत:पेक्षा ते झेंड्यांची काळजी घेतात. यात देशभक्ती वगैरेचा विचार येण्याआधी, झेंड भिजले तर आपल्याला भाकर कशी मिळेल, ही भिती त्यांना असते.

स्वातंत्र्यानंतरच्या साडेसात दशकांच्या कालखंडात भारताने काय मिळवले, काय गमावले याचा विचार ही मुले करत नाहीत. तर हे दोन दिवस कधी येतात आणि आपल्याला झेंडे, टोप्या, तिरंग्याच्या तीन रंगातल्या तत्सम वस्तू विकून जास्त नफा कसा मिळेल, यासाठीच ही मुले ‘तिरंग्या’ ची वाट पाहात असतात. या राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने रस्त्यावर भिक मागून जगणाऱ्या मुलांना स्वाभिमानाची भाकरी मिळते, याचा आनंद मानायचा की, गरीबी आणि गरिबीचे शोषण करणारी राजकीय प्रवृत्ती आपण साडेसात दशकांनंतरही हद्दपार करू शकलो नाही याचा खेद मानायचा? की ‘ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है’ हे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव स्विकारत पुढल्या वर्षीच्या २६ जानेवारी – १५ ऑगस्टची वाट पाहायची?

: मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?