मोदी, एक बार तो आना तुम…

21 जानेवारी 1972… मणिपूर राज्याचा स्थापना दिवस; या वर्षी 21 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीहून ‘शुभेच्छा संदेश’ पाठवला. पंतप्रधानांच्या शुभेच्छा ही खरोखर शुभ गोष्ट आहे. पण मोदींनी तसे केले नसते तरी तिथल्या लोकांना काही फरक पडला नसता. कारण गेली सात-आठ महिने मणिपूरच्या बाबतीत ‘मोदीनिती’ ते पाहात आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या संदेशाची साधी दखलही घेतली नाही. कारण गेल्या सहा वर्षांत पंतप्रधानांनी एकदाही मणिपूरला भेट देण्याची तसदी घेतली नाही. कुणास ठाऊक, त्यांनी त्यांच्या राजकीय दृष्टीने ते बरंही केलं असावं!

तसे आपले पंतप्रधान रोज बातम्यांमध्ये राहण्यासाठी पायाला चक्र बांधून इकडून तिकडे, देश-विदेशात फिरत असतात. देशातील जनतेचे करोडो रुपये रोज उधळत असतात. पण मणिपूर जळत असताना ते एकदाही मणिपूरला आले नाहीत. कदाचित मणिपूर हा भारताचा शत्रू देश नसून ते भारताचेच एक राज्य आहे, याचा त्यांना विसर पडला असावा. भारताच्या पंतप्रधानांनाही या राज्याची काळजी आहे असे खोटे बोलण्यासाठी का होईना, मोदी, तुम्ही मणिपूरला जायला हवे होते.

मोदीजी, तुमच्या राज्यकाळात मणिपूरमध्ये विकास झाला हे तुम्ही मान्य करता. त्यामुळे तो विकास, तिथल्या सुधारणा दाखवायला जायला तरी तुम्ही तिथे जायला हवे होते. त्या निमित्ताने आम्हालाही या आयुष्यात एकदा तरी तुमची ‘मन की बात’ ऐकण्याची सुवर्णसंधी मिळाली असती. पण तुम्ही आमचा तो आनंद हिरावून घेत आहात. तुम्ही 87 वेळा 73 देशांना भेटी दिल्यात. तुमचे हे भेटपुराण अजूनही सुरूच राहणार आहे. तरीही मोदीजी, मणिपूर हा पंचाहत्तरवा देश मानून तुम्ही तिथे गेला असतात तर…? पण तुम्ही तेही केले नाही!

आपली छाती किती इंच आहे याची कल्पना नसलेले राहुल गांधी (देव करो ती कधी 56 इंच असू नये) मधल्या काळात दोनदा तिथे गेले आहेत. मोदीजी, तुम्ही त्यांच्याशी असलेल्या राजकीय विरोधामुळे का होईना, तुम्ही तिथे जाऊ शकला असता. पण तुम्ही तीही संधी गमावलीत. आणि म्हणे तुम्ही देशाचे पंतप्रधान!

भारतीयांच्या पैशावर तुम्ही इकडे तिकडे फिरत राहिलात. जवळपास संपूर्ण पृथ्वीच तुडवलीत. तुम्ही अमेरिका आणि चीन इत्यादींना किती वेळा पायदळी तुडवले आहे याचा तर आम्ही भारतीयांनी विचारच केला नाही. पण मणिपूर अमेरिकेइतके दूर नाही; इंग्लंड, जर्मनी, फान्स इतकेही दूर नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो देशाचा अविभाज्य भाग आहे, हे विसरू नका.

तुम्ही आसाम, त्रिपुरा, अरुणाचल येथे गेलात. मणिपूर तर मिझोरामला लागून आहे. तरीही तिथे गेलो नाहीत. तिथेही भाजपाचेच सरकार आहे. तरीही तुम्ही गेला नाही! तिथे मुख्यमंत्र्यांना विचारले जाते की, पंतप्रधान मणिपूरला का येत नाहीत? त्या माणसाकडे याचे उत्तर नाही. त्याची दया येऊन तिकडे गेला असता, पण नाही गेलात. त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो क्लिक केला असता, तो फोटो तुमच्या आयटी खात्यातर्फे ग्लाबल व्हायरल केला असता. पण तुम्ही नाही गेलात. विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्यायला तरी तिथे गेले असता

मोदी, जर तुम्हाला खूप भीती वाटली असती तर तुम्ही मणिपूरमध्ये कर्फ्यू लावला असता, तिथे भेट दिली असती आणि निघून गेला असता! भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या सर्व सैनिकांना काही तास तिथे तैनात केले असते आणि नंतर निघून गेला असता! तिथे कोणत्याही नागरीकाला भेटू नका. विमानतळावर मणिपूरच्या पवित्र भूमीला स्पर्श करा. हवेत हात हलवा, फोटो काढा, व्हिडीओ बनवा आणि परत विमानात बसून परत या… पर्वत आणि ढगांना भेटायला या. त्यांच्यासोबत सेल्फी काढा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2023 नंतरही मणिपूरला भेट दिल्याची नोंद रेकॉर्डमध्ये झाली असती!

मोदी, तुम्हाला न बोलावता तुम्ही पाकिस्तानात गेला होता, आठवतंय का? मणिपूर तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावते आहे. तुम्ही जायला हवे होते! तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या कर्तृत्वाचा ढोल वाजवता, तिथेही तुमचा ढोल वाजवा! तुम्हाला कोण अडवते? तिथेही टाळ्यांचा कडकडाट व्हायला अशी तयारी, याची खात्री दिल्लीतून केली गेली असती. दक्षिणेत तुम्ही केरळला जाऊन मुस्लिमांविरुद्ध हिंदू-ख्रिश्चन ऐक्याची मोहीम चालवता. इथे मणिपूरलाही हे विष पसरवण्यासाठी तुम्ही गेला असता, पण तुम्ही तसे केले नाहीत. तुम्हाला मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करायची नाही, हे या देशाला माहीत असूनही तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन अखंड भारताचे गुणगान गाता.
मणिपूरला जाऊन तुमचे काहीही गमावणार नाही! त्यांना काही खोटे आर्थिक पॅकेज दिले असते! मोदीजी, मणिपूर हे पॅलेस्टाईन नाही, गाझा पट्टी नाही. त्यामुळे इस्त्रायलच्या रागाचा धोका नव्हता. तुम्ही कोणतीही काळजी न करता तिथे जाऊ शकता. ट्रम्प तुमच्यावर रागावले आहेत, हे जगजाहीर आहे. पण तुम्ही मणिपूरला गेलात तर त्यांना जास्त राग येईल अशी भीतीही नव्हती. म्हणून तुम्ही मणिपूरला जायला हवे होते.
नुकतेच तुम्ही सांगितले होते की तुमच्याकडे खूप जोखीम घेण्याची क्षमता आहे. ती अद्याप योग्यरित्या वापरली गेली नाही, मणिपूरने त्याचा पुरेपूर वापर करायला हवा होता. तुम्हाला जगात गोंगाट करायला खूप आवडतं. तुम्ही तिथेही आवाज काढायला गेला असता! तुम्ही बिचाऱया अमित शहांना पाठवले, ते सुखरूप परत आले. तुम्ही स्वतही जाऊ शकला असता!
225 हून अधिक मणिपुरींना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. महिलांना विवस्त्र करून तिकडे परेड काढण्यात आली. त्यांच्या घरच्यांना शाब्दिक दिलासा द्यायला तरी तुम्ही तिकडे जायला हवे. होते. साठ हजारांहून अधिक मेईते आणि कुकी मृत्यूच्या भीतीने जखमी होऊन तंबूत पडून आहेत. त्यांच्याकडे एक नजर टाकली तरी त्यांचा मृत्यू दूर पळाला असता. तुम्हाला कोणी शिव्या घातल्या, कोणी नावं ठेवलीच, तर तुम्ही गपचूप ऐकून घेतल्या असत्या. तुम्ही आगी लावण्यात एक्सपर्ट आहात. मणिपूरमधली आग विझवायला तरी जायला हवे होते.
मोदीजी, तुम्हाला मणिपूरला वारंवार जायला कोणीच सांगत नाही. एकदाच तर जायचं होतं. एकदा गेला असता, थोडा वेळ तिथल्या नागरीकांशी फोटोपुरते बोलला असतात, थोडावेळ थांबला असता आणि परत दिल्लीला परत आला असता, तरी मणिपुरींना खूर बरं वाटलं असते. तुम्हाला इम्फाळला थांबायचा कोणी आग्रहही केला नसता. तिथे कुठल्याच तंबूमध्ये मुक्काम करायचा नव्हता.. दिल्लीला परतायचे होते. मोदीजी, तेही तुम्ही टाळलेत…

मोदी, एक बार तो मणिपूर जाना तुम…

– मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?