ठाण्यात ‘दादां’चे `भाईं’ना तगडे आव्हान

‘तेरी चाह में ही इस कदर रुसवा हुआ हूं मैं
था कभी बेशकीमती पर अब बिका हुआ हूं मैं’

महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या कलाटणी मिळाव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था काहीशी या दोन ओळींसारखीच झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला पाशवी बहुमत मिळाले आणि शिंदेसेनेची होती नव्हती तेवढी सगळी हवाच भाजपाने काढायला सुरुवात केली. त्यात राष्ट्रवादीचे अजित पवार यांची साथ भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मिळाली आणि शिंदे यांची प्रत्येक ठिकाणी खच्चीकरण होताना महाराष्ट्राने पाहिले.

एकनाथ शिंदे म्हणजेच भाई यांच्या प्रत्येक चालीवर तिरकी चाल करत देवेंद्रभाऊ मात देऊ पाहत आहेत. अशातच पालकमंत्री पदाचा तिढा उभा राहिला. ठाण्याचे पालकमंत्रीपद शिंदे यांनी मारून मुटकून आपल्या पदरात पाडून घेतले. पण रायगड, नाशिक सह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये शिंदेसेनेच्या पालकमंत्र्यांच्या कारभारावर भाजपच्या संपर्कमंत्र्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे.

दरम्यान महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवायचा निर्धारच भाजप हायकमांडने केला आणि त्या दिशेने फासे टाकायला सुरवात झाली. याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिह्याची सुत्रे पालघरचे पालकमंत्री आणि नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली.

ठाणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत आपले संपर्प कार्यालय थाटले आहे. यातून शिंदेसेना-भाजप यांच्यात म्हणजच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दरी वाढू लागली असून पुढील काळात हा संघर्ष आणखीनच वाढत जाईल.

एकसंध असलेल्या शिवसेनेने मागील दहा वर्षांत जिह्यात बहुतांशी महापालिकात यश मिळवले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. विशेष म्हणजे या निवडणुकीत तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत या निवडणुकीत लक्ष घातले होते. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखालील एकसंध शिवसेनेला चांगले यश मिळाले, तसेच अंबरनाथ बदलापूर, मुरबाड, शहापूर नगरपालिकेची निवडणूक, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही एकसंध शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर उभे ठाकले असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेने चांगले यश मिळवले होते.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे या हक्काच्या गडात भाजपचे बळ वाढले मात्र एकसंध शिवसेनेने पेक्षा जास्त जागा काही ते मिळवू शकले नाहीत. अशी परिस्थिती असताना ठाणे जिह्यात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी प्रभावी नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या संजय केळकर यांना ठाण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी भाजप कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.

दरम्यान गणेश नाईक यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले असून त्यांच्याकडे पालघरचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत तर ठाण्यात भाजपचे आमदार जास्त असतानाही पालकमंत्री पद एकनाथ शिंदे याना देण्यात आले आहे. आता नाईक यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या खारकर आळीत २४ फेब्रुवारी रोजी जनता दरबार जाहीर केला आहे. या माध्यमातून ठाणे महापालिकेची जबाबदारीही नाईक यांच्यावर भाजपने सोपवली असल्याने एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान गणेश नाईक देतात का याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

: मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?