मराठी भाषा व्यावहारिक व्हायला हवी – सचिन परब

अभिजात मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी याचा प्रचार करण्यासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईने संकल्प केला आहे, अभिजात बरोबर ती अधिकाधिक व्यवहारी कशी होईल यासाठी प्रयत्न झाला तरच हे शक्य आहे. याचबरोबर एआय व्यवहारात मराठी अधिक उपयोगासाठी आणण्यासाठी त्याप्रमाणे मजकूर संगणकात लिहायला हवा असे विचार ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कवी एकनाथ आव्हाड, कामगारनेते दिवाकर दळवी, संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, चितळे उद्योगसमूहाचे राहुल जोगळेकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे सेकेटरी यतीन कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकांचा विविध पुरस्कार देऊन सचिन परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी भाषा व्यवहाराविषयी बोलताना ते पुढे असेही म्हणाले की, आज याठिकाणी भानुदास साटम सरांनी एआय तंत्रज्ञान मराठी भाषेसाठी किती उपयुक्त यावर व्याख्यान दिले. परंतु काही विषय या तंत्रज्ञानाला मांडतानाच येणार नाहीत. एखादी प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन केलेले रिपोर्ताज एआय कसे तयार करणार. संत तुकारामांच्या विषयी जगभरातील जवळ जवळ सर्व भाषांमधून लिहिले गेले आहे त्यामुळे त्यांची ओळख सर्वत्र झाली आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी भाषेची ओळख अथवा माहिती जगभर व्हावी असे वाटत असेल तर त्यासंबंधीचा मजकूर ऑनलाईन जायला हवा.

आज व्यक्त होण्याची अनेक साधने निर्माण झाली आहेत. यापुढे आवश्यक तो इतर भाषेतून मराठीतून संवाद साधला तरच आपण काय म्हणतो आहोत हे इतरांना कळेल. म्हणजेच आपल्याला यापुढे मुलांच्या भाषेत बोलावे लागणार आहे. पूर्वीपासून आजपर्यंत कोणत्याही दैनिकातील संपादकीय पानावरील एक कोपरा व्यक्त होण्यासाठी सर्वसामान्यांसाठी हक्काचा आहे. त्या मंडळींची ही संस्था आहे, या संस्थेत आजपर्यंत अनेक दिग्गज मान्यवर येऊन गेले आहेत. मी सुद्धा स्वतला भाग्यवान समजतो.
यावेळी बालसाहित्यिक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक एकनाथ आव्हाड, ज्येष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांनीही आपली मनोगते सादर केली तर रवींद्र मालुसरे यांनी अभिजात मराठी भाषा उपक्रमाचे स्वरूप आणि संस्थेच्या कार्याची ओळख प्रास्ताविक केले.

उपस्थितीचे स्वागत प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, सूत्रसंचालन कार्यवाह नितीन कदम, राजन देसाई, तर आभार प्रदर्शन दिगंबर चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष विजय ना कदम, मनोहर साळवी, सुनील कुवरे, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, आबास आतार यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Comment

× How can I help you?