महाराष्ट्रात नेहमीच काहीना काही डावपेच सुरु असतात. विरोधी पक्षाचे डाव सत्ताधारी हणून पडायचे तर कधी सत्ताधारी एखादा राजकीय डाव टाकून विरोधकांना गप्प बसवायचे. पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे भक्कम आणि मजबूत सरकार सत्तेत आले. त्यामुळे विरोध करायलाही विरोधी पक्ष उरला नाही. मग २४ बाय ७ राजकारणाची सवय जडलेल्या आमच्या नेत्यांना झोप लागणार तरी कशी? मग त्यांनी आपापसातच म्हणजे महायुतीयच राजकारण खेळायचे ठरवले आणि ‘दरबारी’ राजकारणाचे डावपेच टाकायला सुरवात झाली. याला निमित्त ठरल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका.
विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि अजितदादांनी आपापल्या ताकदीचा अंदाज घेतलाच होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळ आजमावून पाहावे म्हणून हळूच स्वबळाची नारे दिले गेले. सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या गडातूनच म्हणजे ठाण्यातून झाली. शिंदे यांना शह देण्यासाठी गणेशदादा नाईक यांना पुढे करण्यात आले. पालघरचे पालकमंत्री असलेल्या दादांनी ठाण्यात जनता दरबार घेतलेला जनता दरबार शिंदेसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. या दरबाराविरोधात शिंदेसेनेच्या शिलेदारांनी थोडी कुरबुर चालू केली. पण प्रकरण थोडे शांतच होते. या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात येऊन “ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे” अशी घोषणा केली आणि इथेच शिंदेसेना चवताळली. त्यांनीही दरबारी राजकारणाचे डाव टाकायला सुरुवात केली. नाईकदादांच्या नवी मुंबईत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या संपर्क कार्यालयाचे तात्काळ उदघाटन केले. दुसरीकडे दुसरे शिलेदार परिवहन मंत्री यांनीही नवी मुंबईत जनता दरबार घेण्याचे सूतोवाच केले.
अशाच काही घटनांमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामुळे विस्थापित झालेले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील दरी हळूहळू वाढत आहे. मुळात शिंदे आता भाजपाला म्हणजेच देवभाऊंना नकोसे झालेत कारण सत्ता आता मिळाली आहे. सत्तेसाठी लागणारे बहुमतही अजितदादांच्या रूपाने जाळ्यात आहे. मग शिंदेंना नामोहरम करण्यासाठी देवभाऊ एकेक डाव टाकू लागले. कुठे पालकमंत्रिपद देताना आडकाठी तर कुठे पालकमंत्र्यांसमोर भाजपचा संपर्कमंत्री नियुक्त करा. कुठे शिंदे गटाच्या ठेकेदारांचे ठेके रद्द करा तर कुठे शिंदे यांनी आणलेल्या योजना बंद करा; असे एकेक प्रकार शिंदेंचे खच्चीकरण करत होते. या महायुतीत सगळ्यात धूर्त निघाले अजितदादा पवार. मुख्यमंत्रीपद आपल्याला या जन्मात तरी मिळू शकत नाही याची त्यांची आता पक्की खात्री झाली आहे. त्यामुळे कोणतीच राजकीय इच्छा नुरलेलया अजितदादांकडून कोणताही धोका फडणवीसांना नाही,
यातच आता देवभाऊंनी शिंदेसेनेच्या मंत्र्यांचे पीए, ओएसडी यांच्या नियुक्त्या थांबवल्या आहेत. त्यामुळे शिंदे – देवभाऊंमधली ठिणगी कुठल्याही क्षणी वणव्यात रूपांतरित होईल. पण या वणव्यात होरपळली जाईल ती मुकी जनता. कारण या जनतेशी दिल्लीतल्या “नरेशा”ला काही पडलेले नाही आणि राज्यातल्या “देवेंद्र”लाही काही देणेघेणे नाही. एकूणच शिंदेसेना आणि ठाणे यांचे भावनिक नाते लक्षात घेता भाजपने ठाण्यातून सुरु केलेलया दरबारी डावावर शिंदे आता कोणता नवा डाव टाकतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. परंतु महायुतीच्या या ‘दरबारी’ डावांवर पडदा पडेल की राजकारण अधिक गढूळ होईल याचे उत्तर येणाऱ्या काळाकडे तरी असेल का हे सांगणे महाकठीण.
: मनीष वाघ