तुम्हाला माहिती आहे का, काही गोष्टी अशा असतात ज्या पुरुष कधीही स्त्रियांना सांगत नाहीत, पण त्या जाणून घेणं स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं असतं? पुरुष आणि स्त्रिया वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि भावना व्यक्त करतात, त्यामुळे अनेकदा पुरुष काही गोष्टी उघडपणे बोलत नाहीत. त्यांना कधी कधी शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होणं सोयीचं वाटतं, पण त्यातून स्त्रियांना त्यांचा अर्थ समजतोच असं नाही.
पुरुष कधीही सहजपणे कबूल करत नाहीत की, त्यांनाही भावनिक आधाराची गरज असते. समाजाने त्यांना लहानपणापासून शिकवलं असतं की, ते “मजबूत” असले पाहिजेत, रडायला किंवा कमकुवत वाटायला परवानगी नाही. पण खरं पाहायला गेलं, तर त्यांनाही कधी कधी धीराची गरज असते. फक्त ते तेवढं सहज व्यक्त करत नाहीत. जर त्यांच्या जोडीदाराने त्यांना समजून घेतलं, त्यांच्या भावनांना जागा दिली, तर ते अधिक सुरक्षित आणि प्रेमळ वाटू शकतात.
अनेक पुरुष आपल्या समस्या, चिंता किंवा संघर्ष स्त्रियांना सांगत नाहीत, कारण त्यांना वाटतं की, त्यामुळे त्यांना कमकुवत समजलं जाईल. त्यांना असं वाटतं की, जर त्यांनी त्यांच्या अडचणी मोकळेपणाने शेअर केल्या, तर त्यांच्या जोडीदाराला वाटेल की ते परिस्थिती हाताळू शकत नाहीत. म्हणूनच, ते बऱ्याचदा शांत राहणं पसंत करतात आणि स्वतःच मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.
पुरुष नात्यात असले तरी त्यांना थोडं स्पेस हवंच असतं. याचा अर्थ असा नाही की, ते जोडीदारापासून दूर जायला बघत आहेत, पण त्यांना स्वतःसाठी काही वेळ हवा असतो. कधी कधी त्यांना फक्त शांतपणे बसायचं असतं, त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असतो किंवा स्वतःच्या विचारांमध्ये रमायचं असतं. जर स्त्रियांना हे समजलं आणि त्यांनी त्यांना ही स्पेस दिली, तर त्यांचं नातं अधिक सुंदर आणि सुदृढ होऊ शकतं.
शेवटी, पुरुषांना असं वाटतं की, स्त्रिया त्यांचे मन वाचू शकतात, पण सत्य हे असतं की, ते स्वतःही अनेकदा आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत. म्हणूनच, जर कधी ते काही सांगायचं टाळत असतील किंवा गोंधळलेले वाटत असतील, तर ते त्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष म्हणून घेतलं जाऊ नये. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांना त्यांची जागा देणं आणि संवादाच्या वेगाची जबरदस्ती न करणं हे नात्यासाठी अधिक फायद्याचं ठरतं.
: समीक्षा एसबी.