आनंदाची वाट चालूया वारीत …

सुख आणि दु:ख ही माणसाच्या आयुष्यात चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. या दोन्हीकडे एकाच दृष्टीने पाहणे म्हणजे समत्व आणि याच समत्वाचा उत्सव म्हणजे वारी!

सुखाचा शोध कोणाला लागला? सुखाच्या शोधात माणसाची संपूर्ण हयात खर्च होऊन जाते. प्रापंचिक जबाबदाऱ्या, अपेक्षांचे ओझे वाहत असताना मनुष्याचा कोलूला जुंपलेला बैल होऊन बसतो. मग, सुख कशात शोधावे? तर, सुख समाधानात शोधावे. समाधान कशाने प्राप्त होते? तर, समाधान आनंद मानण्याने प्राप्त होते. मग, आनंद कसा प्राप्त करायचा, तर तो ‘समत्व’ बुद्धीने प्राप्त करायचा. समत्व म्हणजे काय? याचे उत्तर भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिले आहे. ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ या वचनात सर्व सार आलेले आहे. सुख आणि दु:ख ही माणसाच्या आयुष्यात चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. या दोन्हीकडे एकाच दृष्टीने पाहणे म्हणजे समत्व आणि याच समत्वाचा उत्सव म्हणजे वारी!

मनुष्याला आसक्तीमुक्त करून चिरंतन आनंदाचे वरदान देणारी ‘वारी’ची परंपरा महाराष्ट्रातील संतांनी सुरू केली. साडेसातशे वर्षांनंतरही ही परंपरा अखंड सुरू आहे. हाती टाळ-मृदंग घेऊन शेकडो मैल वर्षानुवर्षं आमचे वारकरी पंढरीच्या विठ्ठलाच्या ओढीने चालत असतात. प्रत्येक आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. ही ‘वारी’ म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे, तर ती मानवी जीवनातील एक गूढ आध्यात्मिक यात्रा आहे. वारी ही देवदर्शनासाठीचा प्रवास असला, तरी त्यामागे आहे आत्मदर्शनाचा, संयमाचा आणि समत्वाचा संदेश.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव, सोपान-मुक्ताबाई-निवृत्तीनाथ यांच्या पालख्या घेऊन निघणारे हे वारकरी आपल्याला भक्ती, निस्सीम श्रद्धा आणि सामाजिक समतेची शिकवण देतात. वारीचा मुख्य संदेश असा की, खरा आनंद हा बाहेर नव्हे, तर अंतकरणात शोधा. ‘विठ्ठल’ हा केवळ एका मूर्तीत सीमित नसून, प्रत्येक माणसात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक भावनेत तो प्रकट होतो. वारीच्या वाटेवर कोणाचाही भेदभाव होत नाही. श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, स्त्री-पुरुष सगळे एकत्र चालतात. इथे जात, धर्म, वर्ग या भिंती गळून पडतात. हेच वारीचे मानवी मूल्य आहे. समतेचा, बंधुभावाचा आणि सहजीवनाचा आदर्श.

मनुष्याची जगण्याची धावपळ शेवटच्या श्वासापर्यंत थांबत नाही. बालपण सरून तारुण्य येते. तारुण्य सरते आणि वार्धक्य येते. शरीर जर्जर होते. शाश्वत काहीही राहत नाही. एकच गोष्ट शाश्वत राहते…ती म्हणजे ‘आनंद.’ वारीचा हा सोहळा चिरंतन आनंदाचा सोहळा आहे. माणसाचे जीवन हे फक्त शरीरधारणेत अडकलेले नसते, तर त्यामध्ये एक व्यापक मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक प्रवास दडलेला असतो. या प्रवासात सर्वांत मोठे आव्हान असते स्वतला अंतर्बाह्य विकसित करणे. समाजातील गोंधळलेल्या मतप्रवाहांपेक्षा सत्य शोधण्याची धडपड ही स्वतच्या विचारांवर काम करण्याचे प्राथमिक लक्षण आहे.

बहुतेक वेळा स्वार्थ आणि परमार्थ हे परस्परविरोधी मानले जातात. परंतु, योग्य दृष्टिकोन ठेवला, तर हे दोघे परस्परपूरक ठरतात. आपली ऊर्जा, वेळ, ज्ञान किंवा साधने योग्य कारणांसाठी वापरली तर आनंदाची वाट दूर नाही. तथागत गौतम बुद्धदेखील म्हणतात, ‘आनंदाकडे जाणारा दुसरा मार्ग नाही. आनंद हाच मार्ग आहे.’ चला, यंदाच्या वारीत आपण आनंदाची वाट चालू या..!

: मेहेर नगरकर

Leave a Comment