माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ॥२॥ ६१
माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, हाती पताका घेऊन पंढरपूरास जावे ही आस माझ्या मनी आहे. माझे मन त्या पंढरीरायाचे गुण वर्णन ऐकून रंगून गेले आहे. त्यामुळे माझ्या मनाला पंढरीरायाच्या भेटीचा ध्यास लागला आहे. हीच आस घेऊन शतकानुशतके वारकरी पंढरीला जात असतो. वाटेत अनेक ठिकाणी, ठिकठिकाणी होणाऱ्या रिंगणांच्या ठिकाणी हटकून निरनिराळे खेळ खेळत असतो. फुगडीचा खेळ खेळल्याशिवाय वारकऱ्यांच्या मनाची शांती होत नाही. माउली ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगातूनही फुगडीचे रुपक घेऊन मैत्रिणींच्या माध्यमातून नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित करत असताना, साक्षात हरीच्या समीप जाण्याचा सोपा मार्ग दाखवून दिला आहे.
फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू ।
निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥
हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥
सकळ पाहे हरी । तोचि चित्तीं धरी ॥५॥
नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥
वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥८॥ ३७३
बदलत्या काळानुरूप भाषा बदलत असते. भाषेतील शब्दांना नवीन आयाम प्राप्त होत असतात. काही शब्दांना नवीन अर्थ प्राप्त होतात. आणि याच कारणाने संतांनी त्यांच्या काळात केलेल्या रचना आपल्याला लक्षात यायला कठीण वाटतात. संतांनी जाणीवपूर्वक ही कूट रचली असावीत असा समज होऊन जातो. संतांनी भारुडे लिहिताना योजिलेली कूट भाषा ही जाणीवपूर्वक होती का? हा प्रश्न प्रत्येकाला पडणे साहजिक आहे.
सांप्रत काळी लोकांना समजेल अशा भाषेत ज्ञान देणे व समाज प्रबोधन करणे हा संतांचा हेतु होता. त्यामुळे त्याकाळी लोकांना सहजी समजणारी भाषा आज आपल्याला काहीशी अगम्य जाणवते आहे. आज आपण पाहत असलेला हा अभंग जर कूट अभंग नसला तरी त्यात वापरलेल्या फुगडी या रुपकाचा काळानुरूप संदर्भ बदलला आहे.
या अभंगात माऊलींनी योजलेल्या फुगडी या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. माऊलींच्या या अभंगात योजलेला फुगडी हा शब्द ‘फू-गडी’ या दोन शब्दांपासून बनला आहे. फू म्हणजे भांडण आणि गडी म्हणजे खेळातला आपला सवंगडी, खेळगडी. अशा या दोन शब्दांच्या संयोगाने फुगडी हा शब्द योजला असावा. खेळ खेळत असताना भांडण झाले तर ‘फुगडी’ म्हणून मित्रत्व काही काळासाठी सोडून देतात, असे मानून माऊलींनी फुगडीचे रुपक योजले असावे.
फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू । निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥
अशा या सखी संवादरूपी भारुडात सखीच्या मुखाने माउली सांगतात. ‘सखे चल आपण हा फुगडीचा खेळ खेळू या. हा जीवनाचा खेळ आहे यात ब्रह्मरूप झालेली स्त्री मैत्रिणीला सांगते. ‘सखे संसारात गुरफटून गेल्यामुळे तुझ्या जीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. खरतर तुझ्या शरीरात निजब्रह्म, परब्रह्म होता, पण प्रपंचाच्या कारणाने तू विषयासक्त झालीस आणि तू त्याला गमावले आहेस. अजूनही वेळ गेली नाही आहे. चल आपण पुनः सुरवात करू.
काही अभ्यासकर्ते इथे हा संवाद सद्गुरू आणि शिष्य यांच्यातला आहे असेही मानतात. शिष्य नेहमीच गुरुला, गुरुच्या ज्ञानाला वंदन करताना निजब्रह्म मानतात. तर सद्गुरू आपल्या शिष्यालाही उत्तम शिष्य मानतात. आपल्या शिष्याचे ठायी परब्रह्म आहे असे मानतात. त्यामुळे हा संवाद, गुरु-शिष्यातला संवाद आहे असे मानले जाते.
मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥
यासाठी तुला विशेष काही करावे लागणार नाही. संसारतल्या सगळ्या दु:खाचे कारण म्हणजे मानवाचे मन आणि त्या मनाला विषयांकडे ओढून नेणारे चित्त. तुझ्या या मनाला तू धू, म्हणजेच त्यामध्ये आलेली मलिनता काढून टाक. हे करण्याचा उपाय फारच सोपा आहे. मनात निर्माण होणाऱ्या विषयांना थू कर, म्हणजेच त्यापासून दूर जा. मनातल्या विषयांना तू बाजूला सार. यासाठी नामस्मरणाचा सहारा घेतला की आपसूकच मनातले विषय बाजूला सारले जातील. त्यामुळे तू पुन्हा एकदा त्या परब्रह्मस्वरूपाकडे जाशील. नामस्मरणाचा आसरा घे. मनातले इतर भाव काढून टाक. तुला हवे ते साध्य होईल.
हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥
सकळ पाहे हरी । तोचि चित्तीं धरी ॥५॥
नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥
सज्जनांचा संग झाला की तुझ्यापासून दूर गेलेले देवपण पुन्हा रंगात येईल. म्हणजेच तुला त्याची गोडी लागेल. हे साध्य करण्यासाठी तू केवळ नामस्मरणाचा सहारा घेतला तरी पुरे आहे. संतांच्या संगतीने तुझ्या हृदयात हरि वसेल. त्याच्या रंगात तू रंगून जाशील. जळी, काष्ठी, पाषाणी; सर्वत्र हरि भरून राहिला आहे. त्याचे अस्तित्व जाणवून घे आणि ते अस्तित्व कायम चित्ती ठेव. प्रारब्धाने चालणारा संसार विषय लोलुपतेकडे घेऊन जात असतो त्यामुळ त्यात मन रमवण्यापेक्षा हरिनाम जप. त्याच्या चरणी तुझे मन वहा.
वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥८॥
असे केल्याने त्या चर्तुभुज श्रीहरिला तुझ्याकडे पाहून फार आनंद होईल. आपल्या भक्तांच्या बाबतीत तो कधीही डावे-उजवे करत नाही, आनंदाने तो तुलाही आपल्या चारी भुजांनी आलिंगन देईल तुला ही हरीनामाची गोडी लागो आणि तुझ्या संसाराची फुगडी होऊन तु पुन्हा एकदा निजब्रह्म, परब्रह्म स्वरूपाला जा. मलाही त्या हरिनामाची गोडी लागल्यामुळे मी संसारासी फु, गडी करुन टाकली आहे. म्हणजेच संसारातल्या विषयांपासून दूर झाले आहे.
डॉ. नरेंद्र भिकाजी कदम. ९८६९०६१८८९