ओ मारिया…

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड होणे हे आनंददायी आणि अनुकरणीय आहे. कारण आज आपण लोकशाही देशांमधले सत्ताधारी नेते, त्यांचे कारनामे अनुभवत आहोत. या पार्श्वभूमीवर मारिया यांच्या वैयक्तिक आणि राजकीय संघर्षांनी भरलेलया वाटचालीची नक्कीच दाखल घेतली गेली आहे.

2012 मध्ये, व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ यांच्या नऊ तासांच्या भाषणात व्यत्यय आणून त्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि न्यायाची मागणी केली तेव्हा त्यांनी जगाचे लक्ष वेधले. त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली. पण त्याचबरोबर त्या एक ‘लक्ष्य’ देखील ठरल्या. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या काळात, त्यांना छळ, धमक्या, निवडणुकीतून अपात्र ठरवणे आणि त्यांच्या चळवळीला शांत करण्याचे वारंवार प्रयत्न झाले. समर्थकांना अटक आणि सतत पाळत ठेवूनही, माचाडो यांनी व्हेनेझुएलामध्येच राहण्याचा निर्णय घेतला, स्वातंत्र्य आणि न्यायासाठीची मोहीम सुरू ठेवली. अढळ दृढनिश्चय आणि शांततापूर्ण प्रतिकाराद्वारे, मारिया कोरिना माचाडो व्हेनेझुएलाच्या लोकशाही आकांक्षांचा चेहरा बनल्या आहेत, ज्या जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत. त्यांचा नोबेल पुरस्कार सत्य आणि धैर्याने अत्याचाराशी लढणाऱ्या सर्वांना समर्पित आहे.

मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर होणे म्हणजे जगभरात शांतता आणि लोकशाहीचा सातत्याने पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांचा हा सन्मान आहे. आज जगभरातले बहुतेक सत्ताधारी नेते हुकूमशाही बनले आहेत अशा काळात, मारियासारखे काही नेते लोकशाहीचा झेंडा उंचावत आहेत. हा सन्मान व्हेनेझुएलाच्या संघर्षशील लोकशाहीचा दाखला आहे आणि यामुळे जगभरातील सर्व लोकशाही देशांनाही बळकटी मिळेल. यामुळे विशेषतः शांततेचा पुरस्कार करणाऱ्या महिलांचे मनोबल वाढेल.

दुसरीकडे, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना शांततेचा त्यांने आखलेली रणनीती आज आपण कोणत्या प्रकारचे नेते अनुभवत आहोत हे दर्शवते. गेल्या काही महिन्यांत जवळजवळ सात युद्धे संपवल्याचे वृत्त आहे,यासाठी ट्रम्प यांनी उघडपणे नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली. ट्रम्पच्या समर्थकांनी त्यांच्या नकारावर नाराजी व्यक्त केली आहे हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे. व्हाईट हाऊसने त्यांच्या अधिकृत प्रतिसादात असेही म्हटले आहे की नोबेल समितीने शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले. नोबेलच्या घोषणेपूर्वी, इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी आणि संभाव्य शांतता करारामुळे ट्रम्प नोबेल पुरस्कार जिंकू शकतात अशा अटकळाला बळकटी मिळाली. रशिया, इस्रायल, पाकिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया, थायलंड आणि कंबोडियासह अनेक देशांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. ट्रम्प स्वतः नोबेल पुरस्कार जिंकण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु नोबेल समितीच्या निर्णयाने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. कारण त्यांना माहित होते की, पाकिस्तानसारख्या दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष “शांतता दूत” असणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखे होते.

मारिया कोरिना मचाडो यांना मिळालेला सन्मान केवळ प्रतीकात्मक राहू नये. त्यांच्या देशातील लोकशाही बळकट करण्याचा त्यांचा प्रवास येथेच संपू नये. आपण भूतकाळात पाहिले आहे की अनेक आदरणीय व्यक्ती अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या आहेत. नोबेल पुरस्कार विजेती आंग सान सू की म्यानमारमधील रोहिंग्यांच्या नरसंहाराचे समर्थन करताना दिसल्या. मुहम्मद युनूस बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी उभे राहण्यात अपयशी ठरले. मलाला युसुफझाई तिच्याच देशात, पाकिस्तानमध्ये मुक्तपणे जगू शकत नाही आणि तिला परदेशात राहण्यास भाग पाडले जाते. नोबेल पुरस्कार खरोखरच सन्मानित केला जातो जेव्हा प्राप्तकर्ता खरोखरच त्यांच्या स्वतःच्या भूमीवर त्यांची योग्यता सिद्ध करतो. आपण मारिया यांची हुकूमशाहीविरुद्धची स्वप्ने साकार होतील आणि त्यांच्या यशाचा प्रकाश सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा केली पाहिजे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment