भारताची वाटचाल : बचतीकडून कर्जाकडे

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत संयमी होती. ऋषी आणि तत्त्वज्ञ काटकसरीला जीवनाचे सार मानत आणि विलासासाठी कर्ज घेणे हे अनुचित मानत. भारतीय समाजाने “थोडं आहे, पण पुरेसं आहे” या विचारावर जगण्याची पद्धत स्वीकारली होती. म्हणूनच, २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळातही भारत स्थिर राहिला. कारण भारतीयांच्या लहान बचतींनी देशाला बळ दिले. मात्र, आजचा भारत त्या तत्त्वज्ञानापासून दूर जात आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात कर्ज घेण्याची प्रवृत्ती झपाट्याने वाढली आहे. नवीन पिढीला साधेपणा मागासलेपण वाटू लागले आहे. “दिसणं हेच असणं” या भावनेने प्रेरित होऊन ती विलास आणि दिखाव्याच्या मागे धावत आहे. दक्षिण कोरियातील गंगनमसारखी परिस्थिती भारतात निर्माण होत आहे — जिथे लोक प्रतिष्ठेसाठी कर्जाच्या ओझ्याखाली जगतात. “आता खरेदी करा, नंतर पैसे द्या” हे तत्वज्ञान भारतीय तरुणांच्या जीवनाचा भाग बनले आहे. आयफोनपासून परदेश दौऱ्यांपर्यंत आणि लग्नसोहळ्यांपासून वैद्यकीय उपचारांपर्यंत सर्व काही हप्त्यांवर चालत आहे.

अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये सामाजिक सुरक्षा योजना आहेत, बेरोजगारी लाभ आहेत, पण भारतात ती सोय नाही. तरीही लोक कर्ज घेत आहेत — तेही अनेकदा अनधिकृत मार्गांनी. हजारो अॅप-आधारित कंपन्या तारणाशिवाय त्वरित कर्ज देतात, पण व्याजदर १८ ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचतात. परतफेड न झाल्यास, या कंपन्यांकडून धमक्या, सोशल मीडियावर बदनामी किंवा गुंडगिरी अशा प्रकारचे प्रकार घडतात. अशा दबावामुळे अनेकांनी आत्महत्याही केली आहे.

२०२५ च्या आकडेवारीनुसार, चारपैकी एक भारतीय वैयक्तिक कर्ज घेत आहे. ही कर्जे वैद्यकीय खर्च, सुट्ट्या, घरसजावट किंवा फॅशनवर खर्च केली जात आहेत. नवविवाहितांपैकी तब्बल २६ टक्के जोडपी लग्नाचे खर्च भागवण्यासाठी कर्ज घेत असल्याचे दिसते. २०१४ मध्ये भारताचे घरगुती कर्ज जीडीपीच्या २६ टक्के होते, ते आता जवळपास ४२ टक्क्यांवर गेले आहे — म्हणजे दहा वर्षांत तब्बल १६ टक्क्यांनी वाढ. बँकांच्या आकडेवारीनुसार, असुरक्षित कर्जे तीन ते चार लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत.

ही परिस्थिती केवळ आर्थिक नाही, तर मानसिकदृष्ट्याही धोकादायक आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या लक्झरी जीवनशैलीचा मोह आणि ‘फोमो ‘ म्हणजे काहीतरी चुकवण्याची भीती  तरुणांना अधिक खर्च करायला प्रवृत्त करत आहे. महागड्या वस्तू, सुट्ट्या, आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन यांच्या मागे धावताना ते कर्जाच्या दलदलीत अडकत आहेत. नोकरीतील अनिश्चितता, वाढता कामाचा ताण, आणि परतफेडीची चिंता यांच्या संगमातून नैराश्य, चिंतेचे झटके, आणि मानसिक थकवा वाढतो आहे.

भारतीय समाज ज्याने बचत, संयम आणि स्थैर्याच्या मूल्यांवर शतकानुशतके भर दिला, त्याच समाजात आज “उधारीवरचं आयुष्य” एक नविन समस्या बनली आहे. हा बदल केवळ आर्थिक नाही, तर सांस्कृतिक मूल्यांवर झालेला खोल परिणाम आहे. जर वेळेवर या प्रवृत्तीवर नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात भारताला “कर्जग्रस्त विकासशक्ती” होण्याचा धोका टाळता येणार नाही.

: मेहेर नगरकर

Leave a Comment