पर्यावरणस्नेही इंदिराजी…

 

इंदिरा गांधी, भारताचे जागतिक पातळीवर नावाजलेलं कणखर नेतृत्व! आज 31 ऑक्टोबर, इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे जसे भारताला हितकारक ठरले, तशाच काही निर्णयांमुळे त्यांच्यावर आजही टिका होताना दिसते. पण इंदिराजींचा एक गुण कायमच काहिसा दुर्लक्षित राहिला, तो म्हणजे निसर्गाप्रती, पर्यावरणाप्रती त्यांचे असलेले प्रेम.

इंदिराजींनी पर्यावरण खात्याच्या मंत्री असताना पहिले तीन सचिव स्वत निवडले होते. एम. जी. के. मेनन (पदार्थविज्ञान), एस.झेड. कासीम (समुद्री जीवशास्त्र) आणि टी. एन. खोशू (वनस्पतीशास्त्र) असे ते तीनही सचिव शाखज्ञ होते. त्यावरुन ‘पर्यावरण’ या विषयाबद्दलची त्यांची कळकळ स्पष्ट होते.
राजस्थानातील भरतपूर येथील केवलादेव घना पक्षी अभयारण्यातील शिकारीच्या तक्रारी अभियंते आणि पक्षीप्रेमी हेरॉल्ड विल्यम्स यांनी इंदिराजींना भेटून केल्या होत्या. तेथील राजघराण्याला शिकारीचे काही अधिकार बहाल करण्यात आले होते. त्या वेळी केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले के. नटवर सिंग हे पतियाळाच्या राजघराण्याचे जावई होते. त्यांचा इंदिराजींनी खुबीने वापर करून घेत भरतपूरच्या राजघराण्याचे शिकारीचे अधिकार काढून घेत पक्षी, प्राण्यांना अभय दिले. वन्यजीव संरक्षण कायदा, बने संरक्षण कायदा, जलप्रदूषण कायदा आणि वायूप्रदूषण कायदा हे चारही कायदे इंदिरा गांधी यांचेच देणे आहे.
तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मुंबईतील बोरिवलीच्या नॅशनल पार्पमधून महामार्ग बांधण्याचा घाट घातला होता. त्यासाठी त्या उद्यानातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येणार होती. या प्रश्नाकडे इंदिराजींचे लक्ष पक्षीतज्ञ सलीम अली यांनी वेधले होते. त्यानंतर ‘महामार्गा’चे काम थांबवावे आणि पर्यायी रस्त्याची आखणी करावी, असे आदेश इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले. त्याचे पालन झाल्यामुळे नॅशनल पार्पवरील महामार्गांचे गंडांतर टळले.
इंदिराजींनी भारताला दिलेली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे व्याघ्र प्रकल्प! इंदिराजी पंतप्रधान होत्या त्यावेळी एका शाळकरी मुलीने तिच्या पिगी बॉक्समध्ये साठलेले पैसे आणि एक पत्र दिल्लीला इंदिराजींना पाठवलं. ते पत्र वाचून इंदिराजी हादरून गेल्या. एका शाळकरी मुलीला वाघांच्या घटत्या संख्येबद्दल काळजी वाटावी, ती आपल्याला का वाटू नये, याचं वैषम्य त्यांना वाटलं, आणि त्यावेळी जन्माला आला भारतीय व्याघ्र प्रकल्प 1 एप्रिल 1973 रोजी देशात व्याघ्र प्रकल्प ही नवीन संकल्पना जन्माला आली. आज या संकल्पनेचा जो विस्तार झाला आहे, त्याद्वारेच केवळ भारतात नाही तर जगभरात वाघांचे संवर्धन होण्यात अतुलनीय असे काम झाले आहे..
निसर्गप्रेमी इंदिरा गांधी राजकारणाच्या भोवऱयात आकंठ बुडालेल्या असल्या तरी त्या खऱया निसर्गप्रेमी होत्या. त्यांनी पर्वतांवर प्रेम केले, वन्यप्राण्यांची मनापासून काळजी घेतली, पक्षी, दगड, झाडे आणि जंगले यांची त्यांना आवड होती आणि शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाचे पर्यावरणीय परिणामांबद्दल त्या चिंतेत होत्या. निसर्गप्रेमाचा वारसा इंदिरा गांधी यांना त्यांचे वडील जवाहरलाल नेहरु यांच्याकडून मिळाला आणि परस्परांना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडते. आपले निसर्गप्रेम ते मित्र-मैत्रिणींना पत्र लिहूनही व्यक्त करत. अमेरिकन छायाचित्रकार डोरोथी नॉर्मन या मैत्रिणीला पाठवलेल्या पत्रात त्यांनी सगळ्या व्यापातून दूर डोंगरावर, निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य जगायची इच्छा व्यक्त केली होती. 5 ते 15 जून 1972 दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यावर सखोल चर्चा केली. त्यात मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान आणि त्याचा मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम यावर सखोल चर्चा होऊन काहीतरी गंभीर पावले उचलली पाहिजे यावर एकमत झाले.
याच संमेलनात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘पर्यावरणाची बिघडती जागतिक परिस्थिती आणि त्याचा जगाच्या भविष्यावर होणारा प्रभाव’ या विषयावर प्रभावी भाषण दिले आणि समतोल पर्यावरणाचे महत्त्व विशद केले. तेव्हापासून पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृतीसाठी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होऊ लागला. आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक स्तरावर हे भारताचे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. इंदिराजींनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे आज बांदीपूर, मुदुमलाई आणि सायलेंट व्हॅली ही राष्ट्रीय उद्याने आज शाबूत आहेत.
इंदिराजींची राजकीय कारकिर्द वादग्रस्त होती यात शंका नाही. परंतु मूळ इंदिरा गांधी या निसर्ग संवर्धनाशी पूर्णत बांधील होत्या. त्यांनी देशाच्या वैविध्यपूर्ण समृद्ध नैसर्गिक वारशाचे जतन करणे हाच आर्थिक गतिशीलतेचा मूलभूत आधार मानला होता. वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्यासाठी विकास हा अल्पकाळाचा आणि संरक्षणाअभावी क्षणभंगुर होता, अविकसित संवर्धन अस्वीकार्य होते. त्यांच्यासाठी संवर्धनाचा उद्देश, जैविक विविधतेचा आदर आणि पर्यावरण संतुलन इत्यादी गोष्टी आपल्या सांस्कृतिक स्वभावातून निर्माण झाल्या आहेत.
‘निसर्गाचा आदर करा आणि त्याच्याशी सुसंगत रहा’ ही आपल्या संतांनी दिलेली मूळ शिकवण इंदिराजींनी अखेरपर्यंत जपली. भारताच्या पर्यावरणीय वारशाचे संवर्धन करणे, हीच पर्यावरणस्नेही इंदिराजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment