
हिमालयाच्या कुशीत, जिथे श्वासातही बर्फ मिसळलेला असतो, तिथून एक संकप्ल्ना साकारली ‘आइस स्तूपा’! ही फक्त बर्फाची रचना नव्हती तर ती होती निसर्गाशी संवाद साधणारी पर्यावरण क्रांती. आणि या क्रांतीचे शिल्पकार म्हणजे पर्यावरण तत्त्वज्ञ, शिक्षक आणि अभियंता सोनम वांगचुक!
‘टाईम’ मासिकाने नुकतेच २०२५ मधील जगातील १०० प्रभावी जलवायू नेत्यांच्या यादीत त्यांना स्थान दिले. जगाने त्यांचा गौरव केला; पण त्यांच्या स्वतःच्या देशातील सत्तेने मात्र त्यांना कैद केले. हा विरोधाभास म्हणजे आपल्या काळाचे गोठलेले कटू सत्यकथा.
१९६६ मध्ये लडाखच्या उलेतो कपो या खेड्यात जन्मलेले वांगचुक हिमालयाच्या निसर्गात वाढले. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि हिवाळ्यात गोठलेल्या नद्यांची वेदना त्यांनी बालपणात अनुभवली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्यांनी १९८८ मध्ये शिक्षण, विज्ञान आणि पर्यावरणाचा संगम घडवणारी.‘स्टूडेंट्स एजुकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख’ ही संस्था स्थापन केली.
२०१३ मध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांनी पहिला तिबेटी स्तूपाच्या आकाराचा ‘आइस स्तूप’ उभारला, जो उन्हाळ्यात हळूहळू वितळत शेतांना तीन महिने पाणी पुरवतो. एका स्तूपात साठणारे तीन लाख लिटर पाणी लडाखसाठी जीवनाचा झरा ठरले.
२०१६ मध्ये रोलॅक्स पुरस्कार, २०१८ मध्ये मॅगसेसे सन्मान, आणि आता जागतिक प्रतिष्ठा. पण जेव्हा त्यांनी लडाखच्या पर्यावरणीय हक्कांसाठी आणि स्वायत्ततेसाठी आवाज उठविला, तेव्हा देशातील सत्तेला तो आवाज असह्य झाला. २०२५ मध्ये त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली. आज ते राजस्थानच्या जोधपूर कारागृहात आहेत; पण त्यांच्या कल्पना हिमालयापासून नेपाळ, पाकिस्तान, चिली, इथिओपिया पर्यंत पोहोचल्या आहेत.
वांगचुक म्हणतात, ” आपण पृथ्वीचे मालक नाही, आपण तिचे विश्वस्त आहोत.” आज जग त्यांना हिरो म्हणतंय आणि आपला देश खलनायक ठरवत आहे.
प्रत्येक ‘आइस स्तूप’ आता शांतपणे सांगतो, “पाणी म्हणजे जीवन, पण विचार म्हणजे दिशा.” देशात जेव्हा पर्यावरण रक्षणही देशद्रोह ठरते, तेव्हा हे फक्त विचारांचे दमन नसते तर ती लोकशाहीची गोठण प्रक्रिया असते. जग वांगचुकांना हिरो म्हणतंय, आणि आपली सत्ता त्यांना गुन्हेगार ठरवते.आता प्रश्न फक्त इतकाच, ‘हिमालय वितळेल की आपणच आधी वितळणार?’
: मनीष चंद्रशेखर वाघ


