राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ हे नाव घेतल्यावर काहींच्या मनात ‘हिंदू संघटना’ म्हणून एक ठराविक प्रतिमा निर्माण होते. संघ म्हणजे धार्मिक आणि सांप्रदायिक विचारांचा गढ. पण वस्तुतः, संघ हे केवळ धार्मिक संघटन नाही; तर ती भारतीयत्वाच्या अखंड चेतनेची वाहक आहे. तिची मुळे “वसुधैव कुटुंबकम्” या प्राचीन भारतीय सूत्रात रुजलेली आहेत. हे सूत्र सांगते की संपूर्ण जग एक कुटुंब आहे आणि या भावनेचा प्रत्यक्ष प्रत्यय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या अलीकडील बंगळुरूमध्ये केलेल्या विधानातून आला. त्यांनी ठामपणे म्हटले की “ख्रिश्चन आणि मुस्लिम देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सामील होऊ शकतात.”
हे विधान केवळ धाडसी नाही, तर नवीन, समावेशक आणि संतुलित भारताचे स्वप्न उभे करणारे आहे. या विधानात संघाच्या विचारसरणीतील सार्वत्रिकता आणि भारतीय संस्कृतीतील सर्वसमावेशकतेचा स्पष्ट प्रत्यय येतो. भागवत यांनी दिलेला हा संदेश म्हणजे केवळ संघासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. या संदेशातून आपण एक राष्ट्र म्हणून किती समन्वयशील आहोत आणि विविधतेत एकता जपण्याची आपली तयारी किती आहे? हे प्रश्न उपस्थित होतात.
संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी म्हटले होते, “हिंदुत्व हा धर्म नाही; ती एक संस्कृती आहे.” ही संस्कृती कोणालाही वगळत नाही; ती सर्वांना सामावून घेते. म्हणूनच, संघासाठी “हिंदू” ही ओळख धार्मिक नसून सांस्कृतिक आहे. ती भारतीय जीवनाची समान ओळख आहे, ज्यात विविध पंथ आणि परंपरांचा सन्मान आहे. “एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति” सत्य एकच आहे, पण त्याची व्याख्या अनेकांनी अनेक प्रकारे केली आहे, हा वेदकालीन संदेशच संघाच्या हिंदुत्वाचा आधार आहे.
आजच्या राजकारणात धर्म, जात आणि भाषेच्या आधारावर समाजात विषारी फूट पाडली जाते. त्या विभाजनकारी वातावरणात भागवतांचे विधान म्हणजे एक शुद्धीकरण आहे. एक असा प्रयत्न जो सांगतो की राष्ट्राचा आत्मा कोणत्याही एका धर्मात नाही, तर सामायिक सांस्कृतिक जाणीवेत आहे. संघाचे तत्त्वज्ञान हे सांगते की “राष्ट्र हीच सर्वोच्च देवता आहे.” या भावनेतून संघाचा कार्यकर्ता प्रत्येक धर्माचा आदर राखून कार्य करतो.
भागवतांचा संदेश गांधीजींच्या विचारांशीही साधर्म्य राखतो “माझे हिंदुत्व सर्वांचा समावेश करणारे आहे, कोणालाही वगळणारे नाही.” गांधीजी आणि संघ या दोघांच्या दृष्टिकोनात “भारतीयता” हा समान सूत्र आहे. फरक फक्त व्याख्येचा आहे, हेतूचा नाही. जर संघ हिंदूंना संघटित करण्याचे काम करत असेल, तर त्यामागे उद्दिष्ट सर्व भारतीयांना एका संस्कृतीच्या बंधनात बांधण्याचे आहे.
संघाबाबत एक गैरसमज पहिल्यापासून पसरवला जातो की संघ फक्त हिंदू समाजासाठी कार्य करतो. हा गैरसमज दूर करणे आजच्या काळाची गरज आहे. भागवतांच्या या विधानाने हे स्पष्ट केले आहे की संघ कोणाच्याही विरोधात नाही, तर सर्वांसाठी आहे. त्यांच्या दृष्टीने “भारत माता” ही केवळ धार्मिक प्रतिमा नाही, तर राष्ट्राच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. मात्र, विडंबना अशी आहे की काहीजण राजकीय कारणांमुळे “भारत माता की जय” म्हणण्यासही कचरतात.
एकविसाव्या शतकातील भारताला आर्थिक महासत्ता बनायचे असेल, तर त्यासाठी मानसिक आणि सांस्कृतिक एकता अत्यावश्यक आहे. संघ या ऐक्याला बळकटी देण्याचे कार्य करीत आहे. भागवतांचा संदेश म्हणजे ‘सुसंवादी समाज’ घडविण्याचे आवाहन आहे. असा समाज, जिथे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी सर्वजण आपापल्या श्रद्धा पाळतात, पण राष्ट्राला आपली मातृभूमी मानतात.
बंगळुरूतील भाषणाने भागवत यांनी हिंदुत्वाला एक आधुनिक, सर्वसमावेशक परिभाषा दिली आहे. “संघाचे हिंदुत्व कोणाच्याही विरोधात नाही, तर सर्वांसाठी आहे.” ते विभाजनाचे सूत्र नाही, तर समन्वयाचे आहे. विविधतेत एकता, मतभेदात संवाद आणि सहअस्तित्व हेच त्याचे सार आहे. हेच खरे भारतीयत्व आहे, ज्यात भारताचा आत्मा श्वास घेतो.
जर हा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचला, तर “हिंदुत्व” हा शब्द वादाचा नव्हे, तर अभिमानाचा विषय बनेल आणि तेव्हाच भारत अखंडता, शांती आणि विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने मार्गक्रमण करेल.
: मनीष चंद्रशेखर वाघ


