स्वबळ आवडे सर्वांना

 

भारतीय राजकारणात युती आणि आघाड्या या गेल्या अडीच दशकांत अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत कोणतीही निवडणूक लढवताना एकत्र येण्याची गरज, सामाजिक – राजकीय समीकरणे आणि सत्तेचे गणित हे घटक पक्षांना परस्परावलंबी बनवतात. तरीदेखील प्रत्येक पक्षाच्या मनात स्वबळावर लढण्याची गुप्त आकांक्षा असते कारण स्वबळ म्हणजे स्वतंत्र ओळख, स्वायत्त निर्णयप्रक्रिया आणि सत्ता आल्यास निर्विवाद वर्चस्व. त्यामुळेच निवडणुका जाहीर होताच जवळपास सर्व पक्षांचा पहिला घोषणा वाक्य असतो “आम्ही स्वबळावर लढणार!”

पण ही घोषणा जितकी जोशात केली जाते, तितकीच वास्तवात ती कमकुवत ठरते. कारण निवडणुका म्हणजे फक्त विचारसरणींची लढाई नसते; ती आहे कॅडर, पैसा, समीकरणे, स्थानिक हितसंबंध आणि मतदारांची गुंतागुंत यांची चाचणी. निवडणूक समीकरणे जशी समोर येतात, तशी पक्षांच्या पायाखालची जमीन हलू लागते. स्वतंत्रपणे बहुमत मिळण्याची शक्यता कमी वाटू लागते. मग ‘स्वबळा’चा जयघोष शांत होत जातो आणि ‘महायुती’, ‘आघाडी’, ‘समन्वय’, ‘जुळवाजुळव’, ‘सामंजस्य’ अशा शब्दांची रेघ सुरू होते.

एकीकडे, नेता स्वबळाचा मोठमोठ्याने गजर करत असतो, तर दुसरीकडे पक्षातील रणनीतीकार मतांच्या अंकगणितात आकडे जुळवताना दिसतात. स्वबळाची आकांक्षा आणि वास्तवातील मर्यादा यामधील ताळमेळ जमवण्यासाठी अखेरीस तडजोडी केल्या जातात. बहुसंख्य पक्षांसाठी ‘स्वबळ’ ही केवळ निवडणुकीपूर्व राजकीय उर्मी असते; प्रत्यक्षात जिंकण्यासाठी ‘युती’ या हत्याराची गरज भासतेच.

पक्ष स्वबळावर उतरला आणि बहुमत मिळाले तर त्यांचा आत्मविश्वास उंचावतो. मग ते म्हणतात, “पहा, लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला!” परंतु बहुमत न मिळाल्यास कथा बदलते. त्याच पक्षांना मग दोन हात पुढे करून म्हणावे लागते “जाणत्या मतदारांनी युतीला कौल द्यावा अशी अपेक्षा आहे.” म्हणजेच स्वबळाचा जयघोष मतांच्या ओघावर अवलंबून असणारा एक ‘शर्तीचा मुद्दा’ ठरतो.

मतदारांनाही हे राजकीय नाट्य आता चांगलेच ओळखीचे झाले आहे. स्वबळाची ढोलताशांची घोषणा ऐकून तेही थोडेसे हसतात. कारण त्यांना ठाऊक असते की निकालानंतर पहिला प्रयोग अपयशी ठरला, की ज्या पक्षाने स्वबळाचे ध्वज फडकवले, तोच पक्ष युतीसाठी आतुर होतो. अशा तऱ्हेने युती आणि स्वबळाची ही खेळी भारतीय लोकशाहीतील एक चिरंतन विनोद बनली आहे.

एकूणातच भारतीय राजकारणात स्वबळ हे एक आकर्षण, एक महत्त्वाकांक्षा आणि एक आदर्श आहे; परंतु व्यवहारात युती हेच सार्वत्रिक वास्तव आहे. त्यामुळेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकच वाक्य खरे ठरते, “स्वबळ आवडे सर्वांना… पण युतीच करावी लागते बहुतेकांना!”

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment