उद्धव सेनेचे मनसुबे आणि मविआतील नवी समीकरणे

एकीकडे भाजप-शिंदे सेना आणि राष्टवादी या महायुतीमधील धुसफूस वाढली असून तिन्ही पक्ष स्वबळाची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे उद्धवसेना – राष्टवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या राजकारणातही तणावाचे सावट दाटले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद उफाळून येण्यामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामील करण्याचा उबाठाचा मनसुबा हे मुख्य कारण ठरले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला घेऊन महत्त्वाची राजकीय ताकद उभी करावी आणि तिच्या जोरावर सत्ता काबीज करावी, अशी उबाठाची रणनीती होती. परंतु काँग्रेसने या रणनीतीवर पाणी फिरवले आहे.

मुंबई काँग्रेसने सुरुवातीपासूनच स्वबळाचा नारा दिला होता. याउलट, उबाठाने मनसेसोबत हातमिळवणी करून काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला ‘झुकवता’ येईल, असा अतिआत्मविश्वास बाळगला. त्यांच्या अंदाजानुसार केंद्रीय पातळीवरील नेते विशेषतः राहुल गांधीशी बोलून काँग्रेसच्या मुंबईतील भूमिकेत बदल घडवून आणता येईल, अशी त्यांची कल्पना होती. बिहार विधानसभा निवडणुकीच्या ताणामुळे काँग्रेस सध्या कठोर भूमिकेत आहे, असा समज उबाठाच्या नेत्यांनी बांधला होता; परंतु बिहारनंतरही काँग्रेसमध्ये कोणताच बदल दिसला नाही.

याउलट, काँग्रेसच्या राज्य प्रभारींनीच मुंबईत पक्ष स्वबळावर रणकंदन करणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर उबाठाची नाराजी अधिकच समोर आली. त्यातच बिहारमधील काँग्रेसच्या पराभवावर केलेले भाष्य उबाठाच्या प्रवक्त्यांकडून जाणीवपूर्वक झाले. “पराभवातून धडा घेऊन आता तरी काँग्रेसने शहाणपणाचा मार्ग स्वीकारावा,” अशा शब्दांत काँग्रेसचा अवमान करण्यात आला. यामुळे काँग्रेसचा आत्मसन्मान दुखावला.

काँग्रेसनेही या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली “स्थानिक निवडणुकीत आघाडीची गरज नाही.” त्या वेळी पक्षाला एकट्याने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास होता. यावर काँग्रेसचा सवाल स्पष्ट होता, तेव्हा हे ‘शहाणपणाचे सल्ले’ स्वतःसाठी का लागू केले गेले नाहीत?

जुलै महिन्यात उद्धव – राज या ठाकरे बंधूंच्या एकीच्या चर्चांनी वातावरण वेगळंच भारलेलं होतं. उबाठाला त्या काळात कुणाच्याही मदतीची गरज भासत नव्हती. मनसेसोबत हातमिळवणी होण्याच्या आशेने उबाठाचे नेते अतिउत्साही बनले होते. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर आघाडीतल्या इतर पक्षांनी त्यांच्या अटी पाळाव्यात, असा त्यांचा भाव दिसत होता. परंतु काळ बदलला. मिठी नदीतून वाहून गेलेल्या पाण्यासोबत उरलीसुरली धुंदीही वाहून गेली. बिहारचे निकाल लागल्यानंतर वास्तवाचे भान अधिकच गडद झाले.

आज उबाठाला पुन्हा काँग्रेसची गरज जाणवू लागली आहे; परंतु काँग्रेस मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे कालपर्यंतच्या मित्राला दूषणे देणे, अवमानकारक टीका करणे हा उबाठाचा नवा चेहरा बनला आहे. राजकीय अस्थिरतेच्या अशा खेळामुळे महाआघाडीतली एकात्मता अधिकच ढासळत चालली आहे.

ताज्या बातमीनुसार महायुतीमधील धुसफूस निवडणुकीपुरती थांबवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि काँग्रेसमधील परस्परांवरील चिडचिड आणि राजकीय अहंकार महागात पडू शकतो. आघाडीतल्या पक्षांची भूमिका जर अशीच विस्कळीत राहिली, तर भाजपला थेट लाभ होणार हेही वास्तव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर आजची सर्वात मोठी गरज ही परस्परांचा आदर राखून, तडजोडीचा मार्ग स्वीकारण्याची आहे. अन्यथा आगामी निवडणुकांच्या पराभवाला उद्धवसेनेचे मनसुबेच कारणीभूत ठरवले जातील.

: मनीष चंद्रशेखर वाघ

 

Leave a Comment