भाजपात विलीन होणे हाच अंतिम पर्याय

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या भूकंपाने जरी सुरुवातीला त्यांच्या ताकदीचा अंदाज आला असला तरी तरी आजच्या परिस्थितीत तो अंदाज म्हणजे केवळ आभास असल्याचे दिसून येते. चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडणे, ठाकरे सरकार पाडणे, भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवणे हा प्रवास जितका धडाडीचा, तितकाच राजकीय जोखमीने भरलेला होता. त्या जोखमीचा अंतिम टप्पा आता समोर येऊ लागला आहे. कारण आज शिंदे गटात केव्हाही फूट पडू शकते. आणि उरलेल्या साथीदारांना घेऊन शिंदे गट भाजपात विलीन होतील.

शिंदे यांच्या बंडाच्या वेळी त्यांनी आपल्या आमदारांना दिलेली आश्वासने, महाशक्तीचा उल्लेख आणि भाजपकडून मिळालेले सर्व प्रकारचे राजकीय संरक्षण हे सर्व त्या काळापुरते अनुकूल होते. त्या वेळी भाजपला महाविकास आघाडीचे सरकार पाडायचे होते, शिवसेना कमकुवत करायची होती आणि महाराष्ट्रातील सत्ता परत मिळवायची होती. त्या तीनही उद्दिष्टांसाठी शिंदे हे उपयोगी शस्त्र ठरले. परंतु कोणतेही शस्त्र उपयोग संपल्यावर पुन्हा पूजले जात नाही.

विधानसभा निवडणुकीनंतरचे गणित हेच वास्तव उघडे करते. भाजपला इतके मोठे यश मिळाले की शिंदे गटाची गरज जवळपास नगण्य झाली. भाजपला सत्ता टिकवण्याकरता आता ना शिंदेंची अडचण कमी करावी लागत आहे, ना त्यांचे मत सांभाळावे लागत आहे. अमित शाहांनी आधीच स्पष्ट केले होते की पुढील काळात भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापेल. हा संदेश राजकीय संकेत नव्हता; ती एक दिशा होती. त्या दिशेत शिंदे आणि अजित पवार हे दोघेही फक्त वापरले जाणारे घटक होते.

भाजपचे राजकारण हा भावनांचा खेळ नाही. ते उद्योगाप्रमाणे चालते, जिथे नफा असेल तिथे गुंतवणूक वाढते आणि जिथे खर्च जास्त व फायदा कमी असेल तिथे प्रकल्प बंद होतो. शिंदे गट भाजपसाठी आता नफा देणारा प्रकल्प नाही. शिवाय त्यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली या गडातच भाजपने थेट हस्तक्षेप करून आपली ताकद दाखवली. संदेश स्पष्ट आहे, आम्हाला तुमची भीती नाही, आणि गरजही नाही.

शिंदे यांची खरी अडचण ही आहे की त्यांनी परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद केले आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या गटात परतू शकत नाहीत; त्यांची राजकीय प्रतिमा अशा स्तरावर पोहोचली आहे तिथे परतण्याचा प्रयत्न म्हणजे आत्मघात ठरेल. त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मात्र दारं उघडी आहेत. भाजप कधीच उपयोगी नेत्यांना अडवत नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार वेळ येताच भाजपात जाण्यास तयार होतील, हे स्पष्ट आहे. तो प्रवाह थांबवण्याची ताकद आता शिंदे यांच्यात नाही.

भाजप भविष्यात शिंदेंना जास्त दिवस सहन करेल, अशी अपेक्षा करणेही अवास्तव आहे. सध्या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून ते सौम्य भूमिका घेत असल्याचे दिसते. पण एकदा या निवडणुका पार पडल्या की भाजप शिंदे गटाला पूर्णपणे राजकीयदृष्ट्या ‘संपवण्याच्या’ दिशेने निघेल, याबद्दल संशय नाही. म्हणून शिंदे गटाचा पुढील प्रवास स्वतंत्र पक्ष म्हणून शक्य नाही, हे आजचे जकीय वास्तव आहे. शिंदे गटात एक तर फूट पडेल किंवा उरलेसुरले नेतृत्व घेऊन शिंदेंनाच भाजपात विलीन व्हावे लागेल. हेच त्यांच्या राजकीय कथेचे अपरिहार्य, आणि कदाचित अंतिम, पान ठरणार आहे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment