देवदर्शन, जेवणावळी आणि सोयीचा निवडणूक धर्म

निवडणुका जवळ आल्या की भारतात देवदर्शन आणि जेवणावळी या दोन गोष्टी अचानक वाढतात बाकी वर्षभर देव आणि मतदार दोघेही निवांत असतात; पण निवडणुकीच्या मौसमात उमेदवारांचा भक्तीभाव आणि दानशूरता असे फुलतात की जणू काही स्वर्गाचे दरवाजेच उघडतात.

या दिवसांत गावागावात, शहरांमध्ये एकच धावपळ, इच्छुकांची पायपीट आणि मतदारांची पोटपीट. मोफत मोतीबिंदू शिबिरे, चष्मे वाटप, आरोग्य तपासणी हे सगळं अचानक. का? तर म्हणे मतदारांची काळजी वाटते. खरी गोष्ट अशी की मतदारांची दृष्टी सुधारली तरच ते उमेदवाराचा चेहरा नीट पाहू शकतात. त्यामुळे ‘डोळे तपासणी’ फार महत्त्वाची!

यात्रांचा तर सोहळाच सुरु असतो. महिलांसाठी देवदर्शन, ज्येष्ठांसाठी पर्यटन, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा. निवडणूक लागली की उमेदवार अचानक ‘सेवा’मध्ये रस दाखवतात. बाकी वर्षभर जनतेने त्यांना शोधत राहायचे आणि निवडणुकीच्या दिवसांत त्यांनीच जनतेला बसमध्ये बसवून ट्रिपवर पाठवायचे. एवढी सेवा कोण नाकारेल?

बहुसदस्य प्रभाग, आरक्षण, प्रभागरचना हे सगळं निवडणूक आयोगाला समजत असेल, पण उमेदवारांना एकच स्पष्ट दिसतं: “मतदार खुश, म्हणजे भविष्य सुरक्षित.” त्यामुळे देवदर्शनाच्या दरम्यान मतदारांना दोन मिनिटांत दर्शन देणारे देव आणि पाच वर्षांनी एकदा दर्शन देणारे नेते, दोघांचाही ‘क्यू मॅनेजमेंट’ बिघडतो.

मतदारही या खेळात कमी नाहीत. एखादा उमेदवार विचारतो, “काय सेवा करू?” तर मतदार शांतपणे म्हणतो, “तुमची सेवा नको, टिफिनची सेवा द्या.” काहीजण तर निवडणूक काळात दहा जेवणावळ्या एन्जॉय करतात आणि निवडणुकीनंतर कोणीही विचार करत नाही की या ताटातून विकास किती येईल.

पण खरी गंमत तेव्हा होते जेव्हा निवडणुकीच्या आधी देवदर्शन टूर असते आणि निवडणुकीनंतर मतदारांना स्वतःच प्रशासनाच्या दारात दर्शन द्यावं लागतं. निवडणूकपूर्वीची दानशूरता बघता एकदा तरी वाटतं, जर हे उमेदवार वर्षभरही इतकेच ‘धार्मिक’ आणि ‘दानशूर’ असते तर देशाचा चेहराच बदलला असता!

विनोद वेगळा आणि वास्तव वेगळं. निवडणुकीच्या तोंडावर सुरु होणाऱ्या या धडाकेबाज सेवांमुळे लोकशाहीचा नाद थोडा बेसूर होऊ लागतो. मतदारांना जेवणावळ्या नकोत; वर्षभर काम करणारे प्रतिनिधी हवेत. देवदर्शन नको, तर आपल्या हक्कांच्या समस्या प्रत्यक्ष दिसाव्यात इतपत प्रशासन हवं.

निवडणुका उत्सव आहेत, बरोबर. पण उत्सवात देवदर्शन आणि ताट वाढणे ठीक, फक्त निवडणुकीनंतर मतदारांचे ‘दर्शन’ उमेदवारांना मिळत राहिले पाहिजे नाहीतर एक दिवस मतदारही म्हणतील: ‘देव तरी वर्षभर दिसतो; नेता फक्त निवडणुकीत!’

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment