मॅक्रॉन यांची प्रभात फेरी आणि आम्ही भारतीय

“वो सुल्तानी हो कि जम्हूरी तमाशा हो,
जुदा हो दीन सियासत से तो रह जाती है चंगेज़ी।”

सत्ता लोकशाहीची असो वा राजेशाहीची; जर तिच्यात मूल्यांची, नैतिकतेची आणि जनविश्वासाची सांगड नसेल, तर ती केवळ ताकदीचा देखावा ठरते. अल्लामा इक़बाल यांचा हा शेर आठवायचे कारण म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मारिन ड्राईव्हची प्रभात फेरी.

ती सकाळ केवळ समुद्राच्या लाटांनी नव्हे, तर एका प्रश्नाने गाजत होती. तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले मॅक्रॉन अचानक सर्वसामान्य नागरिकांत जॉगिंग करताना दिसले. ना सायरन, ना बंदोबस्ताचा कोलाहल, ना गाड्यांचा ताफा. सत्ता एका क्षणासाठी तरी माणूस झाली होती.

त्या क्षणी मरिन ड्राईव्हवर धावणारी ती व्यक्ती केवळ फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष नव्हती; तर लोकशाहीच्या आत्म्याचे प्रतीक होती. काही वेळ कोणालाच ओळख पटली नाही. लोक धावत होते, समुद्राकडे पाहत थांबत होते, कुणी चहा घेत होते. आणि त्यांच्यातच एक नेता, आपल्या ओळखीचा बडेजाव न करता, सहजतेने मिसळला होता. ओळख पटताच मोबाईलचे कॅमेरे व झाले. कुजबुज वाढली; पण त्या दृश्याचे खरे महत्त्व मोबाईलच्या स्क्रीनपलीकडे होते. बघणार्यांना प्रश्न पडला, आपल्या भारतात असे शक्य आहे का?

आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा अभिमान बाळगतो; पण लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला तर ती कागदावरची रचना ठरते. लोकशाही रस्त्यावर दिसायला हवी. ती नेत्याच्या चालण्यात, त्याच्या वागण्यात, त्याच्या साधेपणात उमटायला हवी.

आपल्याकडे मात्र सत्तेचा अर्थ अंतर असा घेतला जातो. पद मिळताच माणसाभोवती सुरक्षेची भिंत उभी राहते. गाड्यांचे ताफे वाढतात, रस्ते बंद होतात, नागरिकांना थांबवले जाते. नेता जनतेचा प्रतिनिधी न राहता ‘व्हीआयपी’ बनतो. आणि हळूहळू तो जनतेपासून दूर जाऊ लागतो.

ही फक्त सुरक्षेची गरज नाही; ही मानसिकतेची समस्या आहे. आपण भारतीय नेत्यांना देव बनवतो. त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा वर्षाव करतो, पोस्टर लावतो, रस्ते सजवतो. आणि मग त्यांच्यात वेगळेपणाची भावना रुजते. लोकशाहीतील सेवक नकळत मालक होऊ लागतो.

मरिन ड्राईव्हवरील त्या जॉगिंगमध्ये एक शांत संदेश दडलेला होता “मी तुमच्यातलाच आहे.” सत्ता जर विश्वासावर उभी असेल, तर तिला भिंतींची गरज कमी भासते. पण जेव्हा सत्तेभोवती संशयाचे सावट असते, निर्णयांभोवती पारदर्शकतेचा अभाव असतो, तेव्हा कमांडोंची वर्तुळे घट्ट होत जातात. प्रत्येक नागरिक संभाव्य धोका वाटू लागतो.

कल्पना करा, एखादा भारतीय मुख्यमंत्री सकाळी समुद्रकिनारी जॉगिंगला निघाला, तर आधी परिसर सील होईल. स्नायपर बसतील, रस्ते रिकामे केले जातील आणि शेवटी सोशल मीडियावर ‘जनतेत मिसळलेला नेता’ अशी पोस्ट येईल. साधेपणा हा प्रचाराचा विषय नसतो; तो संस्काराचा भाग असतो.

मॅक्रॉन याची प्रभात फेरी आपल्याला आरसा दाखवून गेली. त्या आरशात आपण काय पाहतो? भीती की विश्वास? अहंकार की आत्मीयता? लोकशाही की अजूनही मनात दडलेली राजेशाही मानसिकता?

नेत्यांवर टीका करणे सोपे आहे; पण आपणही या संस्कृतीचे भागीदार आहोत. आपण प्रश्न विचारत नाही, आपण अंधश्रद्धेने जयजयकार करतो, आपण नेत्यांना उंच व्यासपीठावर बसवतो. मग ते वास्तवापासून दूर जातात.

लोकशाही मजबूत व्हायची असेल, तर नेत्यांना देव्हाऱ्यातून खाली आणून रस्त्यावर आणावे लागेल. नेता जितका सहज उपलब्ध, तितकी व्यवस्था उत्तरदायी. व्हीआयपी संस्कृतीपेक्षा ‘आपण सगळे एक आहोत’ची भावना रुजली पाहिजे.

मरिन ड्राईव्हवरच्या त्या सकाळी समुद्राच्या लाटांपेक्षा मोठा आवाज एका शांत पावलांनी केला. तो आवाज होता, साधेपणाचा. पण एक प्रश्न अजूनही हवेत आहे, आपणही कधी अशी सकाळ पाहू का, जिथे सत्ता ताफ्यांशिवाय चालेल आणि नेता खऱ्या अर्थाने जनतेत मिसळेल?

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment