महाराष्ट्रापुढचा पेच
‘चार सौ पार’चं स्वप्न सहजशक्य होणार नाही, याची भारतीय जनता पार्टीला खातरी होतीच. त्यासाठी त्यांनी देशभरातील सगळ्याच पक्षांमधून नेते आयातीचं धोरण राबवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले तपास यंत्रणांना हाताशी धरलं. इडी, इन्कमटॅक्सची भीती विरोधकांना दाखवत त्यांचे एक एक शिलेदार आपल्या कंपूत सामिल करून घेत सुटले. या आयातीत अनेक कलंकित चेहरे भाजपात प्रवेश करू लागले. त्या नेत्यांच्या मागचा कायदेशीर ससेमिरा मग आपोआपच कमी होत गेला.
या धामधुमीत सर्वाधिक खासदार पाठवणाऱयांमध्ये दुसऱया क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रावर भाजपाची वक्रदृष्टी न पडली तरच नवल होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रात एकलशाहीशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. शिवसेना हा राज्यातला मोठा पक्ष. त्यांच्याशी युती तुटलीच आहे, मग तो पक्ष का फोडू नये, असा विचार करतच शिवसेनेतल्या अनेक नामचिन नेत्यांच्या मागे इडी सोडली आणि भाजपाला हवे तसे परिणाम राज्यात दिसू लागले. शिवसेनेचे शिंदे आपल्या चाळीस शिलेदारांसह भाजपाच्या जाळ्यात अडकले. आता राज्य आपलेच अशा मस्तीत असलेल्या भाजपाचा मात्र काहीसा हिरमोड झाला. शिवसेना फुटल्याने आपला सहज फायदा होईल अशा भ्रमात असलेल्या नेत्यांना शिवसेनेच्या मतदारांमध्ये अजूनही ठाकरे परिवाराबद्दल आकर्षण आणि बदलत्या परिस्थितीमुळे ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती पाहून भाजपाची चिंता वाढू लागली.
हीच बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातही लागू होते. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट आज भाजपसोबत आला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचा कल अजूनही शरद पवारांच्या बाजूने दिसत आहे. दोन मोठे पक्ष फोडूनही भाजपला लोकसभेचे गणित जुळविताना बरेच कष्ट पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनीही यावेळी भाजप आघाडीला राज्यात किमान दहाते पंधरा जागांचे नुकसान सहन करावे लागेल असे निरीक्षण नोंदविले आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातूनही काही जागांचा, विशेषत ज्या जागांवर मित्र पक्ष लढत आहेत तिथे फटका बसू शकतो, असाच निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे मित्र पक्षांनी कमीतकमी जागा लढवाव्यात यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार बदलण्याचा भाजपचा आग्रह आहे. काही ठिकाणी भाजपचेच उमेदवार पक्षांतर्गत तसेच मित्र पक्षातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने अडचणीत आल्याचे दिसते. या सगळ्या पृष्ठभूमीवर मागच्या दोन निवडणुकातील कामगिरीची पुनरावृत्ती यावेळी भाजपला शक्य होणार नाही, असे चित्र समोर येत असल्याने केवळ भाजपच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पेचात सापडल्याचे दिसत आहे.
यावेळी चारशेचा आकडा गाठण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर महाराष्ट्रात किमान मागच्या वेळी मिळालेले यश कायम टिकविणे आवश्यक आहे; परंतु सध्या तरी कामगिरीची पुनरावृत्ती भाजप आघाडीसाठी अशक्य दिसते. त्यातून भाजपचा मित्रपक्षांवर दबाव वाढत आहे, त्यातही खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने धारेवर धरल्याचे दिसते. भाजपची चिंता शिंदे-पवार समजू शकतात; परंतु त्यांच्यासमोरही आपल्या पक्षाचे अस्तित्व आणि ताकद टिकवून ठेवण्याचे आव्हान आहेच. भाजपच्या सगळ्याच अटी मान्य केल्या तर त्यांच्या पक्षात अंतर्गत कलह वाढू शकतो. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एकमेव खासदार बाहेर पडला, त्यामुळे त्यांची सोय लावणे अजित पवारांना जड गेले नाही. काही अन्य जागांवर भाजपची ताकद मर्यादित असल्याने त्या जागादेखील अजित पवारांना मिळाल्या; परंतु एकनाथ शिंदेंची मात्र बरीच फरफट होताना दिसत आहे. सध्या शिंदेंनी त्यांच्या आठ उमेदवारांची घोषणा केली असली तरी उर्वरित पाच खासदारांवर टांगती तलवार आहे. ठाणे, नाशिक यापैकी एका जागेवर पाणी सोडावे लागेल असा अंदाज आहे. अर्थात यातून मार्ग नक्कीच निघेल; परंतु जागावाटप पार पाडणे आणिप्रत्यक्ष जागा निवडून येणे यात महदअंतर आहे.
जळगावमध्ये भाजपने विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आणि आता ते थेट ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. रावेरमध्ये रक्षा खडसेंच्या विरोधात भाजप पदाधिकायांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे सेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीच्या तयारीत आहेत. अमरावतीत नवनित राणांच्या विरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षीय कार्यकर्त्यांनीच मोर्चा उघडल्याचे दिसते. मागच्या वेळी भाजप आघाडीने उत्तर महाराष्ट्रात निर्भेळ यश मिळविले होते, आता तिथे किमान तीन जागांवर भाजप आघाडीला फटका बसू शकतो. विदर्भातही दोन-तीन जागा संकटात आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, माढा, सोलापूरसारख्या जागांवर भाजप आघाडीची कसोटी लागणार आहे. बारामती, शिरूरबद्दल काहीच सांगता येत नाही. मुंबईत एक-दोन जागांचा फटका बसू शकतो. एकंदरीत मागच्या तुलनेत यावेळी भाजप आघाडीला किमान दहा ते बारा जागा गमवाव्या लागतील, असे सध्याचे चित्र आहे आणि हीच भाजपची मोठी डोकेदुखी ठरली आहे. इतकी प्रचंड फोडाफोडी करूनही फार काही साध्य होताना तर दिसत नाहीच, उलट ही फोडाफोडी अंगलट येण्याचीच शक्यता अधिक दिसत आहे.
ही लोकसभा निवडणूक भाजप आघाडीसाठी जशी आव्हानात्मक आहे तशीच ती विरोधकांचीही सत्त्वपरीक्षा पाहणारी आहे. भाजपसमोर आव्हान सत्ता टिकविण्याचे आहे तर काही विरोधी पक्षांसमोर अस्तित्व टिकविणे हेच एक आव्हान आहे. विशेषत महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या गटापुढे हे आव्हान अधिक गंभीर दिसते. मागच्या निवडणुकीत भाजपसोबत आघाडी असलेल्या शिवसेनेने 23 जागा लढवित त्यापैकी 18 जागा जिंकल्या होत्या. आताही जवळपास तितक्याच जागा उद्धव ठाकरे गट लढवित आहे; परंतु विजयाची खात्री फार कमी जागांबाबत व्यक्त केली जात आहे. सर्वेक्षणांचा आधार घेतला तर यावेळी उद्धव ठाकरे गट फार तर पाच-सहा जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. हा आकडा उद्धव ठाकरेंसाठी धक्कादायक म्हणावा लागेल; परंतु त्याचवेळी शिंदे सेनेलाही मर्यादित आणि कदाचित उद्धव ठाकरेंपेक्षा कमी यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इथे उद्धव ठाकरेंची स्पर्धा भाजपसोबत नाही, त्यांची स्पर्धा शिंदेसोबत असेल. कसेही करून शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. तसे झाले तरच बाळासाहेब ठाकरेंचे आपणच अस्सल वारसदार आहोत, हे सिद्ध करण्याची संधी उद्धव ठाकरेंना मिळेल आणि त्या जोरावर विधानसभा निवडणुकीत अधिक जोमदार कामगिरी करण्याची आशा त्यांना बाळगता येईल. कदाचित तुलनेत अधिक यश मिळाल्यास पक्षातून बाहेर पडलेले अनेक नेते, आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतण्याची शक्यता असेल. या निवडणुकीत विरोधी आघाडीला साधारण अठरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यात उद्धव सेनेचा वाटा किती असेल हे सांगता येत नाही; परंतुउद्धव सेना पाच-सहा जागांवर थबकली तर पक्ष पुन्हा जोमाने उभा करण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप मेहनत घ्यावी लागेल. सगळ्याच बाबतीत शिवसेनेला बळ पुरविणाया मुंबईतील जागांचा कल कसा असेल, हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. मुंबईत भाजपने मुसंडी मारली तर उद्धव ठाकरेंसाठी पुढची वाटचाल खूपच आव्हानात्मक असणार आहे.
: मनीष
