वाचता वाचता वेचलेले

*सुगंध मातीचा-मृदगंध

तप्त उन्हाळा,तापलेली भेगाळलेली जमीन हे ग्रामीण भागातील निसर्गचित्र मान्सूनच्या पहिल्या पावसाने पूर्ण बदलून वातावरण सुगंधी होऊन जाते.अशावेळी मनात कुतूहल निर्माण होते,काय आहे हा गंध? तो पहिल्याच पावसाच्या शिडकाव्यात का? हा निसर्गाचा चमत्कार म्हणायचा की विज्ञान?
उत्तर प्रदेशमधील कनोज शहरात मातीपासून अत्तर तयार करण्यात येत असे.यामध्ये मातीच्या गोल चकत्यांना एप्रिल,मे च्या कडक उन्हाळ्यात वाळवून ते पहिल्या पावसात भिजवले जाई.त्यानंतर त्यामधील गंध उर्ध्वपातन पद्धतीने जमा करून तो चंदन तेलात मिसळत.हेच ते मातीचे अत्तर. कृषी शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की,या सुवासामागे मातीमधील स्ट्रेप्टोमायसिस या तंतूमय जिवाणूंचे मोठे कार्य आहे.उन्हाळ्यात जमीन तापते तेव्हा ते तंतू वाळून जातात, पण ते नष्ट होण्यापूर्वी लाखो बीजाणू तयार करून जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत राहतात.जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस या कोरड्या मातीवर तडतडत पडतो तेव्हा त्याला प्रतिसाद देत हे हजारो बीजाणू (टरपीन)गंधासह हवेत उधळले जातात आणि परिसरात मंद सुवास पसरतो.मातीच्या या गंधास जिओस्पिन असेही म्हणतात.निसर्ग आणि विज्ञान यांच्या मैत्रीचा हा सुगंध अत्तराच्या फायाला मागे टाकणारा नाही का!

वेचक: मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?