मोदींनाच ‘अबकी बार चार सौ पार ‘ ची गॅरंटी नाही
बेरोजगारी, शेतकरी हे दुर्लक्षित केलेले किंवा झालेले मुद्दे, भारतीयांच्या खात्यात १५ लाख आणि इतर भरकटलेले मुद्दे या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये मतदान कमी झाले. यामध्येही जे मतदान झाले त्यामध्ये अँटी मोदी मतांची भर यामुळे भाजपची ‘अब की बार 400 पार’ ही घोषणा मागे पडल्याचे दिसून आले. गुप्तचर खात्याच्या सर्वेक्षणानुसार भाजप 300 चा आकडा ही पार करू शकणार नाही. यामुळे मोदींची ‘अबकी बार चार सौ पार ‘ ची गॅरंटी संपत चालली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
——-_———————————————–
मोदींनाच ‘चारशे पार’ची ‘गॅरंटी’ राहिली नाही
लोकसभा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला आणि आतापर्यंत ‘अब की बार चारसो पार’च्या घोषणा घसा फोडून देणाऱया मोदींची चारशे जागांची बोलतीच बंद झाली. गुप्तचर विभागाच्या सर्व्हे नुसार ‘एनडीए’चे हॅटट्रीकचे स्वप्न ‘इंडिया’ धुळीत मिळवेल आणि देशात त्रिशंकु लोकसभेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप 300 चा आकडा नक्कीच पार करणार नाही, असा अंदाज या सर्व्हेक्षणातून बांधण्यात आला असून केवळ भाजपलाच 230 – 235 जागांवर समाधान मानावे लागेल.
साधारण चार-पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच पाच राज्यांच्या विधानसभांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच बळावला होता. पुढच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोठे यश प्राप्त करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत होते आणि त्याला अनुसरूनच भाजप श्रेष्ठींनी ‘अब की बार चार सौ पार’चा नारा दिला. विधानसभा निवडणुकीत मोदींची ‘गॅरंटी’ भलतीच प्रभावी ठरली होती. त्यामुळे मोदींनाही आपण भाजपला लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवून देऊ असे वाटत होते.
दुसरीकडे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत कमालीचे मतभेद दिसून येत होते. नीतीशकुमार सारखे नेते आघाडीतून दुरावले होते तर ममता बॅनर्जीनी वेगळा रस्ता निवडला होता. एकूण काय तर भाजप आघाडीसाठी मैदान तसे साफ दिसत होते. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत गेली. मोदी सरकारच्या विरोधात जनमत जागृत करण्यात विरोधकांना बन्यापैकी यश मिळत गेले. भाजप आघाडीच्या विरोधात ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रभावी उमेदवार असेल त्या मतदारसंघात त्या उमेदवाराचा पक्ष न बघता मतदान करण्याचा कल वाढू लागला. विरोधी आघाडी कदाचित सत्तेत येणार नाही, परंतु मोदींच्या उमेदवाराला धडा शिकविण्याची उर्मी बळावत चालली.
पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर ही उर्मी प्रभावी ठरल्याची जाणीव झाल्यानेच आधी अतिआत्मविश्वासात वावरणाऱया भाजपने सावध पवित्रा स्वीकारला. सुरूवातीला मोदींच्या भाषणात वक्तव्यात एकप्रकारचा आत्मविश्वास जाणवत होता, आता त्याची जागा काळजीने घेतल्याचे स्पष्टच दिसत आहे. मोदींच्या भाषणांचा नूर आता पालटत आहे. मोदी आणि भाजप नेते आता पुन्हा एकदा ध्रुवीकरणाच्या जुन्याच नीतीला अधिक महत्त्व देऊ पाहत आहेत. या जुन्या वाटेकडे त्यांचे वळणेच त्यांचा आत्मविश्वास ढासळत असल्याचे निदर्शक आहे. सॅम पित्रोदाच्या एका वक्तव्याचा आधार घेत मोदींनी बहुसंख्यकांची संपत्ती ज्यांची मोठी कुटुंबे असतात अशा अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना वाटून टाकण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप केला. काँग्रेसने हा आरोप तातडीने आणि सज्जडपणे फेटाळून लावला असला तरी, भाजपच्या ध्रुवीकरणाच्या नीतीला पुढे कसे तोंड द्यायचे हा प्रश्न काँग्रेस आघाडी समोर आहेच. अर्थात अजूनही भाजप आघाडी आपली सत्ता टिकवून ठेवेल अशीच परिस्थिती दिसत असली तरी राजकीय तज्ञांच्या मते यावेळी भाजप आघाडीला तिनशेचा आकडा ओलांडणेही कष्टाचे जाणार आहे.
कदाचित विरोधकांनी थोड़े अधिक प्रयत्न केले, योग्य सामंजस्य दाखविले, प्रचाराचा रोख मोदी सरकारच्या कामगिरीवरच कायम राखला, बेरोजगारी आणि शेतकयांच्या समस्यांवर सातत्याने जोर दिला तर होऊ शकते भाजप आघाडीला साध्या बहुमतासाठीही झगडावे लागेल. विशेष म्हणजे यावेळी कोणतीही लाट वगैरे दिसून येत नाही. पहिल्या दोन टप्प्यात मतदारांनीही फारसा उत्साह दाखविला नाही, परंतु जे मतदार मतदानासाठी बाहेर पडले ते परिवर्तन आणण्याच्या बाजूचे होते, असा ढोबळ अंदाज आहे. त्याचा फटका भाजपला नक्कीच बसू शकतो, परंतु तो किती असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
भाजपची स्वतची अशी एक मतपेढी आहे आणि ती कायमच भाजपसोबत असते, परंतु ही मतपेढी भाजपचा उमेदवार निवडून आणण्याइतपत मोठी नाही. तसेच विकसित भारत, सुवर्ण भारत, राम मंदिर, ज्यावर भाजपची निवडणूक प्रचाराची रणनीती आधारित होती, असे मुद्दे बाजूलाच पडले. भाजप किंवा मोदी केवळ विकसित भारताच्या घोषणेऐवजी मुस्लिम, जास्त मुले असणारे लोक, घुसखोर, देशद्रोही यावरच बोलताना दिसले. त्यामुळे भाजपची हक्काची मते काहिसे दुरावल्याची संभावना आहे. म्हणूनच भाजपची सगळी मदार आता विरोधकांच्या मतांची विभागणी होण्यावरच राहील.
एकूण सात पैकी केवळ दोन टप्प्यांचे मतदान आतापर्यंत पार पडले आहे. अजून पुढचे पाच टप्पे बाकी आहेत आणि या पाच टप्प्यांमध्येच खरी लढाई आहे. भाजपची ताकद हिंदी पट्ट्यात आहे. आता यापुढे मोदी स्वतच्या भात्यातील प्रत्येक शस्त्र आजमावून पाहणार आहेत. रोज काही तरी नवा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपला 273 जागांचे बहुमत हवे असेल तर 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी ‘भगव्या राज्यां’तून म्हणजेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, या 11 राज्यांतील त्यांच्या आलेल्या जागा जिंकणे आवश्यक आहे. महाराष्ट्रही यावेळेस वेगळीच करामत दाखेवल, यात शंका नाही. कारण उद्धव ठाकरे हेही ‘भगवी मशाल’ घेऊन मैदानात आहेत. ते भाजपला जबरदस्त आव्हान देत आहेत .
गुप्तचर खात्याच्या या सगळ्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर कदाचित मोदींच्या प्रयत्नांना यश येईलही, ते विजयी होतीलही. परंतु त्यांच्या या अस्वस्थतेतून त्यांचा आत्मविश्वास ढासळत चालल्याचेच दिसते. सध्याचे एकूण चित्र पाहता चार सौ पार तर दूरची गोष्ट राहिली भाजप आघाडीने तिनशेचा आकडा गाठला तरी तो मोठा अश्चर्यकारक विजय ठरेल.
: मनीष वाघ