सत्य असत्याशी मन कैसे करावे ग्वाही?

बिक गया बाज़ार में
दोपहर तक एक एक झूठ
शामतक बैठे रहे हम
अपनी सच्चाई लिए

ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांनी अभंग छंदामधील एका कवितेमध्ये म्हटले आहे, “पाहतो गा नित्य ,सत्याचे मरण ,असत्य चरण पूजताना” तेव्हाही आणि आज सुद्धा सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.सध्या तर आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत. खोट्या गोष्टींचे दाम वाढायला हा तर आयता हंगाम मिळाला आहे.खोट्याची सुगी फक्त राजकीय वातावरणात आली आहे असे नाही ,तर सर्वच क्षेत्रात ही सुगी दिसत आहे. दिवसेंदिवस असत्याचा बोलबोला वाढत चालला आहे. सत्यावर असत्य विजयी होत असल्याची प्रचीती येत आहे. शिक्षण, वैद्यकीय,आरोग्य आर्थिक व सामाजिक या क्षेत्रात घडणाऱ्या खोट्या नाट्या गोष्टी तर रोजच्याच झाल्या आहेत. असत्याची पोल खोल व्हावी म्हणून रोजच्या रोज न्यायालयीन दरबारी अनेक दावे सादर होत आहेत.”रोज मढे ,तिथे कोण रडे” अशी अवस्था सामान्य जनतेची झाली आहे. देवाधर्माच्या नावाखाली अनेक भंपकपणाच्या गोष्टी रूढ होत आहेत. लोकांच्या मनावर या सर्वांचे गारूढ इतके झाले आहे की त्यांना तेच सत्य वाटायला लागले आहे..कोण औषधांच्या अस्सल पणाची खोटी हमी देतोय, तर कोण पैसे दामदुप्पट करण्याची हमी देतोय, तर कोण गरिबी दूर करण्याची,वीज मोफत देण्याची, तर कोण कर्ज माफीची..”हमी म्हणजे थापा आणि गप्पा यांची वचने नेहमी”. वचनपूर्तीची बांधिलकी कोणच घेत नाही.असत्याचा इतका सुळसुळाट झाला आहे की सर्वसाधारण जनता भ्रमीत झाली आहे.एकदा बोललेले खोटे उघड करणे सोपे असते, पण हजार वेळा बोललेले खोटे सत्यासारखे दिसू लागते. लोकांना तेच खरे वाटू लागते. ‘सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता ‘ अशा सुभाषितांच्या नावाखाली भूलथापा मारून खोट्यानाट्या गोष्टीं माथी मारल्या जात आहेत. घरभेदीपणा, विश्वासघात, चारित्र्यहनन, आर्थिक लूट या गोष्टी आज चरम सीमेवर जाऊन पोहोचल्या आहेत.परिणामी सत्य आणि प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. सत्याला वाली राहिलेला नाही, सत्याची पाठराखण करणारे व सत्यवानांच्या पाठी ठाम उभे राहणारे दुर्मिळ झाले आहेत. प्रसिद्ध इंग्लिश कवी शेनस्टोन म्हणतो,
” A liar begins with making falsehood appear like truth, and ends with making truth itself appear like falsehood.” – William Shenstone. खोटे पसरवणारा ,सुरूवातीला सत्याचा भास निर्माण करणारे असत्य रचतो आणि शेवटी सत्य असे उभे करतो की ते खोटे वाटावे..असेच आपल्या आजूबाजूला चालू असल्याचे ठळकपणे आढळत आहे. वर नमूद शेरायध्ये तो शायर हीच भावना व्यक्त करताना म्हणत आहे, ‘बाजारात दुपारपर्यंत एक एक खोटं विकले गेले ,मी रात्र होईपर्यंत सत्यासोबत बसून राहिलो पण कोणीच ते घ्यायला फिरकले नाही.’…

वटत गेले एक एक खोटे
दुपारच्या बाजारात
खरे तसेच तिष्ठत होते
रात्र होईपर्यंत अंधारात

©️®️ मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?