मुंबईत मराठी लोकांचे स्वागत नाही? : मराठी पाऊल पडते कुठे?? आणि भाजपचे कनेक्शन!

मुंबईतील नोकरीसाठीच्या एका जाहिरातीत एका गुजराती फ्री-लान्स एचआरने ‘मराठी लोकांचे इथे स्वागत नाही’ असा उल्लेख करून मराठी लोकांना त्यांची जागा, पक्षी, लायकी दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यावर सोशल मिडिया मध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा प्रकारे, मराठी बांधवांचे राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीत चक्क मराठी लोकच नकोत हे म्हणायची हिम्मत या लोकांमध्ये कशी आणि कुठून येते? मराठी माणूस सध्या नक्की काय करतो आहे? तो यावर कसा व्यक्त होईल? जे काही होतेय याला कोण जबाबदार?  या प्रश्नांची उत्तरे शोधाचा हा एक प्रयत्न.
‘मराठी लोकांचे इथे स्वागत नाही’ (The Marathi people are not welcome here) ही ग्राफिक डिजायनर या पदावर मुंबईत भरती करायच्या एका गुजराती एचआरने इन्स्टाग्राम वर दिलेल्या जाहिरातीतील पहिलीच अट/शर्त आहे. याचा अर्थ असा की या पदावर भरती होण्यासाठी मराठी लोकांनी अर्ज करू नये, या पासून दूरच राहावे. या जाहिरातीचा स्क्रीन शॉट समाज-माध्यमांमध्ये भरपूर व्हायरल होत असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातील सर्वसामान्य प्रतिक्रिया आहे, यांची असे लिहायची हिम्मतच कशी होते?
अशा प्रकारची अट/शर्त वाचून हल्ली आश्चर्य वाटत नाही. खरे तर ‘मराठी लोकांचे इथे स्वागत नाही’ असे न लिहिता सुद्धा ही जाहिरात प्रसारित करून मराठी लोकांना मुलाखतीतच गारद करायचा सरळसोट मार्ग अवलंबणे या एचआरला शक्य होते.  तरीही तिने का असे लिहले? तिची हे लिहायची प्राज्ञा कशी झाली? या प्रश्नांचा ऊहापोह करून उत्तर शोधणे आवश्यक आहे.  त्या आधी बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वर्षांपूर्वी मार्मिक मध्ये रेखाटलेल्या एका व्यंगचित्राची आठवण जागवू या. या व्यंगचित्राचे शीर्षक होते ‘मराठी पाऊल पडते पुढे..’ त्यात एक सामान्य मराठी माणूस एका रस्त्याने चालताना दिसतो आहे. त्याच्या मार्गाच्या कडेला थोड्या थोड्या अंतरावर गावांच्या नावाच्या पाट्या आहेत. त्याच्या पाठीमागच्या रस्त्याच्या कडेला गिरगाव या नावाची पाटी आहे. त्यानंतर दादरची आणि  त्याच्या पावलाजवळ ठाणे ही पाटी आहे. त्या पुढील मार्गावर डोंबिवली, कल्याण, बदलापूर,…. अशा पाट्या दिसतात. आणि अशा प्रकारे गिरगावापासून मराठी माणसाचे पुढे पडणारे पाऊल नक्की कुठे पुढे पडत आहे हे बाळासाहेबांनी व्यंगचित्रातून दाखवून दिले होते. ते व्यंगचित्र आजही किती समर्पक आहे आणि विविध क्षेत्रातून मराठी माणूस कसा हद्दपार होत आहे यावरून दिसून येते.
शिवसेना ही संघटना मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झाली. १९७०-८०च्या दशकांत ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ (एसएलएस) मार्फत नोकरीत ८०% जागा स्थानिकांना मिळल्याच पाहिजेत, अशी मोहीम यशस्वीपणे राबवून शिवसेनेने हजारो मराठी बांधवांना रोजगार मिळवून दिले. त्यामुळे या पीढीतील सुस्थापित झालेला मराठी माणूस शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा राहिला. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ अशा घोषणा देऊन परप्रांतातील लोकांमध्ये भीती निर्माण केली गेली. शिवसेनेच्या या शक्तिमुळे, मराठी माणसाविरोधात ब्र काढायची देखील कोणाची हिम्मत होत नसे. आता तो सुस्थापित मराठी माणूस सेवानिवृत्त झालेला आहे. आज, त्याची मुले मात्र रोजगार शोधत आहेत.
त्या नंतर बाबरी मशीद पाडली गेली त्याच्या मागे-पुढे शिवसेनेने भाजप सोबत घरोबा करून  हिंदुत्व अंगीकारले आणि ‘मराठी माणसाचे हित’ साहजिकच मागे पडले. कारण, ‘लुंगी’वाले किंवा ‘भैये’ अर्थात दक्षिण आणि उत्तर भारतीय, हे परप्रांतीय असले तरी हिंदूच असल्याने त्यांना विरोध करणे म्हणजे हिंदुत्वाविरोधात जाणे ठरले असते. अन्य प्रांतात सामान्यतः स्थानिकांना प्राधान्य दिले जात असले तरी हिंदुत्वाने नखशिखांत पेटलेल्या आणि बाळासाहेबांच्या ‘आदेशा’ने बांधल्या गेलेल्या   मराठी माणसाला हा मुद्दाच नाइलाजाने का होईना  अनावश्यक वाटू लागला असावा.
गेल्या दशकात राम मंदिर निर्माण, धार्मिक विद्वेष पसरवून केले गेलेले ध्रुवीकरण, अयोध्येस जाण्यासाठि सोडल्या जाणार्‍या विशेष गाड्या अशा धार्मिक गुंगीत गेलेल्या मराठी माणसाला आपल्या हिताचे काही देणेघेणेच नाही अशी स्थिती दिसत आहे. ‘जय श्रीराम’च्या नार्‍यांच्या गोंगाटात ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ या घोषणा क्षीण झाल्या आहेत. ‘जय भवानी’वर तर आता निवडणूक आयोगानेच बंदी घातली आहे. ‘जय श्रीराम’ नाही म्हटले आणि मराठी माणसाचा मुद्दा पुढे आणला तर आपण अहिंदू, पाकिस्तानी वगैरे होऊ की काय ही भीती मराठी माणसाच्या मनात खोलवर रुतून बसली असावी  अशी शंका येत आहे.
महाराष्ट्राकडे येणारे काही प्रकल्प गुजरातेत गेले म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष जेव्हा टीका करू लागले तेव्हा तेव्हा ‘गुजरात हा पाकिस्तान नाही’, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि डिफॅक्टो मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस (हे मराठी माणूसच असावेत, असा समज आहे.) म्हणाले होते. याच धर्तीवर, ‘मुंबईत अमराठी लोकांना भरती केले तर काय झाले, ते लोक काही पाकिस्तानी नाहीत’ असा कुण्या एचआरने सोयिस्कर अर्थ काढला तर त्याला/तिला दोष कसा देता येईल?
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सूरतेची लूट, १०५ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई, ‘एसएलएस’मुळे हुकलेल्या संधी अशा विविध कारणांमुळे नाहक दुखावलेले विशिष्ट परप्रांतीय या सर्वांचा बदला घेण्याची संधि शोधत असतात. मांसाहारास मनाई, मांसाहारी लोकांना घर भाड्याने किंवा विकत देणार नाही, ‘मराठी लोकांना इथे स्थान नाही’ अशा बाबी या मराठी माणूस किती झोपेत आहे हे तपासण्यासाठी ‘लिटमस’ टेस्ट म्हणून अधून मधून वापरल्या जात असतात. सोबत मराठी माणसाविषयी असलेली मळमळ देखील बाहेर काढता येते. ती व्यक्त झाल्यावर नंतर माफी देखील मागता येते. लाथ मारून पाया पडण्याचाच हा प्रकार. विशेष म्हणजे, अशा टेस्ट्समध्ये मोठ्या मनाचा मराठी माणूस नापास होऊ लागला आहे असे दिसून येते. काही अपवादा‍त्मक आवाज उठतात. पण ते क्षीणच असतात.
आता तर मराठी माणसाचे हित जपणारी शिवसेनाच दुभंगली असून, असली-नकली शिवसेना, खरे-खोटे हिंदुत्व, या गोंधळात हे गट आपले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहेत. एक छोटासा मराठी माणसाचा खळ-खट्याक असा आवाज उरला होता तोही आता ‘बिनशर्त’ मौनात गेला आहे.  या गदारोळात ‘मराठी माणसाचे हित’ हे शब्द प्रांतवादी-हिंदूद्रोही-देशद्रोही  ठरतील की काय अशी भीती मराठी माणसाला आणि नेत्यांना वाटू लागली आहे असा संशय यायला वाव आहे. त्यामुळे अशा लिटमस टेस्ट्स अधून मधून होत राहतील आणि मराठी माणसाचे पाणी  जोखले जाईल. याची सवय हळूहळू मराठी माणसाला होऊन जाईल.
‘हे असे आहे परंतु हे असे असणार नाही’ असे काहीसे मराठी माणसाला खरोखरच मनापासून वाटत असेल तर त्याने मराठी माणसाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा पक्षीय निष्ठा बाजूला ठेवल्या पाहिजेत. फडणवीस जेव्हा ‘गुजरात पाकिस्तानात नाही’ असे जेव्हा म्हणत होते तेव्हा ‘महाराष्ट्र सुद्धा पाकिस्तानात नाही’ आणि महाराष्ट्रावर अन्याय करून गुजरातचे भले केलेले सहन करणार नाही असा मराठी बाणा भाजपमाथील कथित मराठी माणसांनी दाखवायला हवा होता. तसे झाले नाही. आता सुद्धा ‘मराठी लोकांचे इथे स्वागत नाही’ हे मानणार्‍या एचआरची जात, धर्म, पक्षीय बांधिलकी कळली आणि ती भाजपसोबत असल्याचे लक्षात आले तर आता जो असंतोष उसळला आहे तो देखील लवकरच थंड होऊन जाईल, अशीच पुढची जाहिरात येईपर्यंत.
उत्तम जोगदंड, कल्याण

Leave a Comment

× How can I help you?