प्राची तिच्या ‘लूक’मुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. दहावीच्या परीक्षेत सीतापूरच्या प्राची निगमने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. परीक्षेत यश मिळाल्याबद्दल, राज्यात पहिली आल्याबद्दल तिचे खरेतर कौतुक व्हायला हवे होते. पण तिच्या दिसण्याचीच लोक खिल्ली उडवू लागले. ‘अरे! तिच्या चेहऱयावर केस आहेत.’ ‘ती मुलासारखी दिसते’ ‘ किती कुरुप दिसते’… वगैरे वगैरे कमेंट्स सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले. या उपहासाच्या प्रवृत्तीला अनेकांनी विरोध केला असला, तरी कष्टातून मिळालेल्या यशाच्या आनंदात कुटुंबाला दुखावणारे प्रसंग का घडले, हाच मुख्य आणि मोठा प्रश्न आहे.
ज्या देशात आजही दुर्गम भागातील मुलींना शाळेत पोहोचणे सोपे नाही, अशा देशात मुलीचे यश अनेक कुटुंबांसाठी प्रेरणादायी ठरते. गंमत अशी की, एकीकडे तंत्रज्ञानामुळे मिळणाऱया सुविधा मुलींचा मार्ग सुकर करत आहेत, तर दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने दिलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील निरर्थक वादविवादांमुळे अनेक महिला आणि मुलींना स्वतपुरतेच मर्यादित राहण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच बोर्डाच्या परीक्षेत अव्वल आलेल्या प्राचीचे गुण आणि क्षमता पाहण्याऐवजी लोकांनी तिच्या दिसण्याबद्दल आभासी माध्यमांमध्ये चर्चा केली.
या चर्चेशी निगडीत चिंताजनक बाब म्हणजे ट्रोलर टोळीची ही विकृत मानसिकता वाढत्या वयातील मुलांना सौंदर्य आणि बाजारपेठेच्या जाळ्यात अडकवण्याच्या मार्गावर नेणार आहे. प्राचीबद्दलच्या अनावश्यक ट्रोलिंगनंतर अनेक मुले त्यांच्या लूकबाबत जागरूक होतील. प्रत्येक क्षण अनावश्यक मानसिक दडपण घेऊन जगू लागतील. त्यांची ऊर्जा शैक्षणिक सुधारणेऐवजी दिखाऊपणासाठी वाहून घेण्याच्या जाळ्यात अडकेल. सोशल मीडियाच्या ग्लॅमर आणि मार्केटिंग धोरणांमुळे खेळण्याच्या, वाचनाच्या आणि मोजण्याच्या वयात तयार व्यक्तिमत्व मिळवण्याच्या विचाराला अधिक चालना मिळेल.
‘एनसीईआरटी’ने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, देशातील 45 टक्के मुले त्यांच्या शरीराच्या रचनेबाबत खूश नाहीत. नवीन पिढीतील मोठ्या लोकसंख्येला त्यांचे वजन, दिसणे आणि उंची याविषयी न्यूनगंडाचा त्रास होतो. हे पालकांसाठी तसेच सामाजिक वातावरणासाठी चिंतेचे कारण आहे. त्याच वेळी, बाजाराची रणनीती देखील या टप्प्यावर मुलांना घेरते. सौंदर्यवर्धन, वजन कमी करणे आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या नावाखाली, विचित्र आहाराच्या सवयी लावून किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये मजबूत बनण्याशी संबंधित उत्पादनांचा वापर वाढतो. स्वतला सौंदर्याच्या एका निश्चित प्रतिमेत साचेबद्ध करण्याच्या प्रक्रियेत, मुले चुकीच्या दुष्ट वर्तुळात अडकत आहेत. त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल स्वतला कमी लेखण्याच्या वातावरणात, अनेक किशोरवयीन मुले आणि मुली बारीक होणे, गोरा रंग आणि अगदी चेहऱयाचे वैशिष्ट्य यासारख्या गोष्टींबद्दल अस्वस्थ पद्धतींचा अवलंब करतात. इतकेच नाही तर शारीरिक रचनेत इतरांच्या मागे राहिल्याचा भावही मत्सर आणि नैराश्यासारख्या नकारात्मक भावनांना जन्म देतो.
प्राचीच्या दिसण्यावरून ही वादग्रस्त चर्चा का झाली, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे दिसते की आता लोकांना ‘एडिट’ केलेले चेहरे पाहण्याची सवय झाली आहे. सोशल मीडियावर दररोज दिसणारे नवीन अवतार आणि बनावट मेकअपमुळे लोकांमध्ये खरे चेहरे पाहण्याची मान्यता नष्ट झाली आहे. छायाचित्रांच्या आभासी दुनियेत त्यांच्या प्रत्यक्ष रुपात दिसावे असे कोणालाही वाटत नाही. दुर्दैवाने, या मानसिकतेने सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सोयीस्कर होण्याऐवजी अस्वस्थ केले आहे. आभासी जगात शरीराच्या प्रतिमेबाबत एकमेकांशी स्पर्धा करण्याची आणि न्यूनगंडाची भावना वाढवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याशिवाय तंत्रज्ञानाने छायाचित्रांचा रंग आणि देखावा बदलण्याच्या अनेक सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक सुविधांच्या स्वरूपात दिलेले खोटे स्वरूप मानसिक ताणतणाव निर्माण करत असून, त्यामुळे मानसिक आजारांना बळी पडत आहेत. विशेषत: महिला या बनावट सजावटीच्या गर्तेत सर्वाधिक अडकत आहेत. अनियंत्रित सौंदर्य मानकांनुसार ते त्यांचे फोटो आभासी प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. बहुतेक वापरकर्त्यांना फिल्टर वापरून सुंदर तयार केलेल्या प्रतिमा पाहण्याची सवय झाली आहे. चेहऱयात काही दोष असू शकतो हे लोक विसरले आहेत. प्राचीशी संबंधित चर्चेत हे मनोवैज्ञानिकदृष्ट्या आजारी वर्तन समोर आले आहे, जे काही प्रमाणात लोकांना सौंदर्य प्रमोशनच्या मानसिक जाळ्यात अडकवणारे वर्तन आहे.
या सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर प्राचीने ठामपणे म्हटले आहे की, ‘ट्रोल करणाऱयांचे त्यांच्या विचाराबद्दल अभिनंदन. यश हीच माझी ओळख आहे. परीक्षेत चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय होते. म्हणूनच मी माझ्या दिसण्याकडे कधी लक्ष दिले नाही. शाळेपासून घरापर्यंत आणि मित्र-मैत्रिणी नेहमी फक्त अभ्यासावरच बोलत. खरे तर हे वय सौंदर्याचे नसून गुण वाढवण्याचे असते. देशाच्या प्रत्येक भागात राहणाऱया किशोरवयीन मुलांनी आपले सौंदर्य वाढवण्याऐवजी स्वतचे भविष्य सुधारण्याचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.’
मनीष वाघ