वैचारिकदृष्ट्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस हा आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा पक्ष असल्याचे सांगत पुढच्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा कॉंग्रेस पक्षात विलीन होतील, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या स्वत शरद पवारांनी व्यक्त केले. अर्थात आपल्या पक्षासंदर्भात तसा कोणताही निर्णय झालेला नाही, तसा काही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्या पक्षातील सहकाऱयांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
अभिमन्यूप्रमाणे राजकारणाचे धडे आईच्या पोटातच घेतलेल्या शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. आपल्या आई-वडिलांचे नववे अपत्य शरद पवार जेव्हा आईच्या पोटात होते, तेव्हा त्यांच्या आई शारदाबाई पुण्याच्या लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. शरद पवारांच्या जन्माच्या तिसऱयाच दिवशी शारदाबाई स्थानिक मंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या नवजात बाळाला त्यांच्या मांडीवर घेऊन बारामती येथील त्यांच्या घरातून बसने पुण्याला पोहोचल्या. आजही पुण्याहून बारामतीला गाडीने जायला अडीच तास लागतात हे सगळेच जाणतात.म्हणजेच राजकारणाचे धडे शरद पवारांना त्यांच्या आईनेच दिले. त्यामुळेच शरद पवारांची प्रत्येक कृती, प्रत्येक मत हे राज्याच्याच नव्हे तर राष्ट्राच्या कारभारात महत्त्वाचे ठरते.
खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या स्थापनेपासूनच कॉंग्रेससोबत समन्वयाने काम करीत आहे. या पक्षाच्या स्थापनेनंतर झालेली विधानसभा निवडणूक दोन्ही कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढविली. परंतु नंतर सत्ता स्थापन करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यानंतर त्यांनी एकत्रितपणेच पुढच्या निवडणुका लढविल्या. शरद पवारांनी यापूर्वीदेखील काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता. पहिल्यांदा कॉंग्रेस सोडून शरद पवारांनी पुलोदची स्थापना केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली; परंतु पुढच्या काळात राजीव गांधींच्या उपस्थितीत त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्यानंतर 1999मध्ये त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. या सगळ्या कालखंडात आपला मतदारसंघ बारामती हा देशाच्या इतर खासदारांसाठी प्रेरणास्थान आणि शिकण्याचे ठिकाण ठरेल अशा पद्धतीने सजवला आहे. यामुळेच आजवर बारामतीतून शरद पवार अजिंक्य मानले जात होते.
नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे आमच्यासाठी केवळ अशक्य आहे. त्यामुळे यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधातच उभी असेल. फक्त ती स्वतंत्रपणे उभी असेल की हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल, याबाबत अजून स्पष्टता नाही. नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका नेत्याने या आधीदेखील शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा प्रस्तान कॉंग्रेसश्रेष्ठींसमोर ठेवला होता. परंतु त्यावेळी सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची प्रमुख करण्याची अट त्यांनी ठेवली होती. ती अट कॉंग्रेस श्रेष्ठींना मान्य नव्हती. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला, असे वक्तव्य केले आहे. त्या नेत्याच्या या दाव्यात तथ्य आहे. की नाही, हे सांगता येत नाही. परंतु अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक मोठा गट भाजपसोबत गेल्यानंतर आहे त्या परिस्थितीत पक्ष समोर घेऊन जायचा की पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून महाराष्ट्राची सूत्रे आपल्या लोकांच्या हाती सोपवायची यावर शरद पवार विचार करीत असावेत असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्याची पक्षाची ताकद पूर्ववत करण्याची शरद पवारांची जिद्द अजूनही कायम असली तरी शेवटी प्रकृतीची साथदेखील तितकीच महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीच्या दगदगीमुळे शेवटच्या दोन दिवसात त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. आपण थकलो तर आपले सहकारी पक्षाचा गाडा त्याच ताकदीने ओढ शकतात की नाही याबाबत कदाचित शरद पवारांच्या मनात शंक आली असावी, त्यामुळेही ही विलीनीकरणाची चर्चा त्यांनी सुरू केली असू शकते.
वास्तविक, विलीनीकरणाची चर्चा त्यांच्यासाठी नवी नाही. राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसने त्यांच्यासमोर पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी पवारांनी महाराष्ट्राची कमान सुप्रिया सुळेंच्या हाती देण्याची अट घातल्यामुळे बोलणी फिस्कटली. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे ते पुन्हा काँग्रेसला शरण जाऊ इच्छितात. परंतु, त्यांच्याप्रमाणे इतर सगळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय स्वीकारतील, हा दावा हास्यास्पदच. कारण, काँग्रेसकडे प्रादेशिक पक्षांचा ओढा असता, तर ‘इंडी’ आघाडी मजबूत झाली असती, पण चित्र विपरीत. कित्येक राज्यांत प्रादेशिक पक्ष भाजपसोबत किंवा स्वतंत्र लढताहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा आशावाद फोल ठरावा. निकालानंतर उरसीसुरली ‘इंडी’ आघाडी शाबूत राहील, असेही संभवत नाही.
शरद पवारांनी यावेळी अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेससोबत येतील किंवा कॉंग्रेसमध्ये विलीन होतील, असे म्हटले असले तरी सध्या कांग्रेससोबत असलेल्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण जवळपास अशक्य मानले जात आहे, कारण त्यांच्या राज्यात ते काँग्रेसच्या तुलनेत खूप सशक्त आहेत. महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात भाजपला आव्हान देण्याइतपत काँग्रेसची ताकद नक्कीच आहे. जे प्रादेशिक पक्ष सध्या कॉंग्रेस किना भाजपसोबत नाहीत ते निवडणुकीनंतर जो पक्ष सत्ता स्थापन करेल त्यासोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल तरच हे नवे पक्ष काँग्रेससोबत जुळतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मात्र अन्य पर्याय दिसत नाही. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे.
