दिलीप कुमार यांच्या ‘गोपी’ या चित्रपटातलं ‘रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलियुग आएगा’ हे गाणं सगळ्यांनाच आठवत असेल. गाण्यात ‘हंस चुभेगा दाना, कौव्वा मोती खाएगा’ ही ओळ सद्यस्थितीतील राजकारणाला तंतोतंत लागू पडते. अर्थात राजकारणात हंसासारखे शुभ्र कोणी नसले तरी काही प्रमाणात निष्ठावान जरुर आहेत. निवडणुकीच्या तिकीटवाटपात असे निष्ठावान बाजूला पडले आणि नको त्यांना तिकीट मिळाले.
केंद्रातले एक प्रभावशाली मंत्री नुकतेच आपल्या भाषणात सांगत होते की, घोड्यांना गवत मिळत नाही आणि तर गाढवे च्यवनप्राश खातात ही विचित्र परिस्थिती आहे. तो स्वतला घोडा म्हणवून घेत होता हे निश्चित. पण तो ज्या गाढवांकडे बोट दाखवत होता ते मात्र सत्तेचा पुरेपूर उपभोग घेत आहेत. भविष्य पुराणात गाढव आणि घोड्यांचा किंवा 21व्या शतकाचा उल्लेख नाही. सत्तेचे चारित्र्य प्रत्येक युगात सारखेच राहिले आहे आणि सामान्य माणसाच्या नशिबीही तेच आहे. कलियुगातील ज्या लक्षणांबद्दल श्रीरामांनी सीतेला सांगितले होते ते इथे नक्कीच नमूद करावेसे वाटते.
पंचवटीत पावसाळ्याचा आनंद घेत झोपडीत बसलेल्या भगवान श्रीरामांना सीतेने कलियुगाच्या लक्षणांबद्दल विचारले तेव्हा भगवान म्हणाले की, कलियुगात धर्म किंवा कर्म दोन्ही टिकणार नाहीत. अशा स्थितीत लाजिरवाणं होणं किंवा लाज वाटणं ही भावनाच संपुष्टात येईल. राजा आणि प्रजा दोघेही नैतिकतेने नग्न होऊन फिरतील. लोकशाही फक्त बोलण्यापुरतीच उरेल. असेल. लोकांना त्यांचा राजा निवडण्याचा अधिकार असेल. परंतु निवडलेला राजा सर्व प्रकारच्या दुष्कृत्यांकडे डोळेझाक करून दुष्कर्म करणाऱया त्याच्या सरदारांना अभयदान देईल.
बलात्काऱयांना राजयोग घडेल. पकडले जाण्याची शक्यता वाटल्यास ते राजाच्याच मदतीने परदेशात पळून जातील. महसूल चोरणारे जर राजाकडे गेले तर त्यांना ‘इम्युनिटी’ तर मिळेलच पण सरंजामशाहीचे अधिकारही मिळतील. आपली कृत्ये लपवण्यासाठी राजा माझ्या नावाने मते मागणार आहे. राजासमवेत जहागीरदार माझे पोवाडे गातील. स्वतच्या फायद्यासाठी, राजा प्रजेला फासावर लटकवायलाही कमी करणार नाही. मानसिकदृष्ट्या फसवून अशा प्रकारे गोंधळात टाकेल की प्रजेला त्यांच्या विचारांवर आणि स्वतच्या क्षमतेवर शंका येऊ लागेल. प्रजेच्या पोटात वळवळणारे किडे त्याच्या डोक्यात शिरतील. राजाला आत्ममग्नतेचे इतके व्यसन लागलेले असेल की, त्याचेच फोटो असलेले होर्डिंग्ज, फ्लेक्स, जाहिराती सर्वत्र लावले जातील. राजाने देशभर बांधलेल्या लाखो सार्वजनिक शौचालयातही त्याचा फोटो दारावर आणि बाहेर टॉयलेट पेपरवर चिकटवला जाईल. आपली प्रतिमा उभी करण्यासाठी तो इतका खोटारडेपणा करेल की खोटेदेखील ‘त्राहिमाम त्राहिमाम’ चा गजर करतील. आपली प्रतिमा उजळण्यासाठी राजा सरकारी यंत्रणेमार्पत एवढा प्रचार करेल की कालांतराने या मोहिमेचे प्रचारात रूपांतर होईल. मात्र यामध्ये जनताही तितकीच भागीदार असेल.
विष फुकट वाटले तरी कधीतरी त्याचा उपयोग होईल या विचाराने लोक ते विकत घेण्यासाठी रांगा लावतील. इतरांच्या मुलींशी व्यभिचार करून भ्रष्ट लोकांना सभागृहात पाठवणारे उद्या आपल्यासोबतही असेच घडू शकते याचा विचारही करणार नाही. परिणामी, संपूर्ण देशात अराजकता निर्माण होईल. कोणत्याही साथीच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी राजाकडून लोकांना देण्यात येणाऱया लसींमध्ये पाणी भरले जाईल. असे असूनही, या लसींमुळेच ते पूर्णपणे निरोगी असल्याचा दावा अंध भक्त करतील आणि राजा साम-दाम-दंड-भेद सुत्राचा वापर करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी झपाटेल…
