मनाशी संवाद साधणारा कथासंग्रह

ओळख” हा प्रा. सौ. मानसी जोशी यांचा दुसरा कथासंग्रह. ९८ पानी या पुस्तकात सामाजिक, कौटुंबिक व काही गूढकथा आहेत. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी एक ओळख असते. आपल्याला मात्र ती ओळख अपरिचित असते. ती ओळख आपल्याला दुसरं कुणीतरी करून देतं. “ओळख” या कथासंग्रहात लेखिका अशाच काही व्यक्तींची निराळी ओळख आपल्याला करून देतात. या कथांद्वारे त्या त्या व्यक्तींचे भावविश्व, त्यांचा जीवनानुभव आपणही अनुभवतो.
साहित्यिका सौ. शुभांगी गान यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे कथा जास्त निवेदनपर असूनही मधून मधून येणारे संवाद आणि त्यातून उमलत गेलेल्या घटना, त्यांचे वास्तव आणि कथेचा प्रवास सुयोग्य दिशेने जातो.
लेखिकेने मनोगतात लिहिल्याप्रमाणे या कथांत मनाशी मनाचा संवाद साधण्याचा, ओळख पटवून नेमकं ध्येय, ध्येयाप्रत जाण्यासाठी केलेली धडपड आणि अशा वेळी मनात होणारी विचारांची उलथापालथ, हवे आणि नकोचा संघर्ष मांडण्याचा केलेला प्रयत्न बऱ्याच अंशी सफल झाला आहे.
“ओळख” या शीर्षक कथेतील “रमा” ही कणखर व अन्यायाविरुध्द आवाज उठवणारी व्यक्तिरेखा. मुलांकडून फसवल्या गेलेल्या सुधाताईंना रमा लुबाडले गेलेली प्रॉपर्टी परत मिळवून देते.
मोहिनी ही एका बुद्धिवान परंतु अति महत्वाकांक्षी व गर्विष्ठ, अहंकारी स्त्रीची कथा आहे. समाजात नावलौकिक मिळवण्यासाठी ती आपल्या एक वर्षाच्या मुलीला सोडून घराबाहेर पडते. ती लेखिका म्हणून खूप नाव कमावते, अनेक पुरस्कारही तिला मिळतात परंतु जेव्हा २० वर्षांनंतर तिची मुलगी तिच्यासमोर उभी राहते तेव्हा तिला आपण काय गमावले आहे याची जाणीव होते. तिच्या मनातील भावना, तिचे वागणे या सर्वांचा लेखाजोखा लेखिकेने अतिशय समर्पक शब्दांत वाचकांसमोर मांडला आहे. शेवटही उत्कंठापूर्ण केला आहे.
“रानातली गोष्ट” या कथेत गावात शेती करणाऱ्या आपल्या सासू सासऱ्यांबद्दल शहरात राहणाऱ्या सुनेच्या मनात असणारा आकस, अढी, ते अडाणी असलेला गैरसमज कसा दूर होतो हे खूप छान पद्धतीने दाखवून दिले आहे.
“कुठे चुकलं” या कथेतील मुलगा आपल्या वडिलांनी त्यांची संपत्ती आपल्या नावे करावी म्हणून मागे लागतो, त्याला त्याची बायकोही साथ देते पण ती अशी का वागते व वडील आपली संपत्ती सुनेच्या नावे का करतात याची उकल लेखिकेने कथेच्या शेवटी छान कलाटणी देत केली आहे. परंतु मुलगा लग्न होईपर्यंत चांगला वागत असतो. लग्न झाल्यानंतरच त्याला वडिलांच्या संपत्तीचा मोह का होतो याचा उलगडा होत नाही.
अतृप्त आत्मा, कल्पनातीत, मुक्ती या गूढकथाही लेखिकेने उत्कंठापूर्ण शब्दांत लिहिल्या आहेत. या कथा जरी काल्पनिक असल्या तरी त्या वाचताना आपण त्यात गुंतत जातो.कथांचा शेवट मात्र लवकर केल्यासारखा वाटतो.
गूढकथा वगळता इतर कथांमधील व्यक्तींचे प्रश्न, त्यांचे सामाजिक जीवन, त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे जरी भिन्न असले तरी या व्यक्ती त्या त्या प्रश्नांचा, परिस्थितीचा समर्थपणे सामना करतात.
लेखिकेची लेखनशैलीही चांगली आहे. त्यांनी साध्या, सोप्या शब्दांत व छोट्या छोट्या वाक्यांत कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे कथेतील आशय व त्या त्या व्यक्तींचे वैशिष्ट्य आपल्यापर्यंत सहज पोहोचते.
आपल्याशी संवाद साधणारा व आपल्या मनाला स्पर्श करणारा असा हा कथासंग्रह आहे व यातील कथा वाचनीय आहेत एवढे नक्की.

अजित महाडकर

Leave a Comment

× How can I help you?