निवडणुकीचा हंगाम सुरू झाला की नेत्यांच्या आधी त्यांचे ‘काटे-चमचे’च चमकायला लागतात. नेताजींच्या नजरेत आपण राहिलो तर आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल, यासाठी सारा खटाटोप सुरू असतो. याच हंगामात भवतालातील अनेक कीडे, पक्षी, प्राणी यांच्यातही उत्साह संचारतो असं कोणी सांगितलं तर खरं वाटेल? पण हे खरंय. कारण इतर कोणीही आपलं नाव काढण्यापेक्षा नेताजीकडून आपला उदोउदो झाला तर या पशू-पक्ष्यांनाही हवंच असतं. आपल्या नावाचा ‘जयजयकार’कधी होणार याची उत्सुकताच सगळ्या प्रजातींना लागून राहिली असते.
यात सगळ्यात आघाडीवर असतात ‘साप’ आणि ‘विंचू’. एखादा मोठा नेता ‘साप’ आहे आणि निवडणुकीच्या प्रचारात जोरदार बॅटिंग करतोय, हे सापाने ऐकल्यावर तो आनंदाने सरपटू लागतो. आपण सापाच्या जातीत जन्मल्याचा तो अभिमान बाळगतो. तीच अवस्था विंचवाची आहे. नेत्यांना एकमेकांची कुंडली चांगलीच माहीत असते. ते एकमेकांना ‘विंचू’ म्हणण्यात मग्न राहतात. यामुळे डंख मारण्याचे प्रोत्साहन खऱया विंचवाला मिळते.
काहींना ‘हुशार कोल्हे’ म्हटलं जातं तर काहींना ‘रंगीबेरंगी कोल्हे’ म्हणतात. आता जंगलात राहणारे आणि अधूनमधून दिसणारे हे बिचारे प्राणीही सुखावले असल्याची चर्चा शहरी भागात सुरू असते. दुसरीकडे, एखाद्या नेत्याचे समर्थक त्याला ‘सिंह’ म्हणत त्याचा गौरव करण्याचा प्रयत्न करतात. हे ऐकून सिंह जंगलात गर्जना करतो आणि त्याची गर्जना निवडणुकीच्या भागातही पोहोचावी असे वाटते. आता ज्या नेत्याला सिंह म्हटलं गेलं, तो सिंह सोडा, त्याच्यात ‘ग्रामसिंहा’सारखे तरी गुण आहेत की नाही, हेही ठामपणे सांगता येत नाही.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘गाढवा’ची उपमा एकदम फेमस होते. याने खरेखुरे गाढवही खूप खूश होतो आणि तो ‘घोडा’ आणि ‘खेचर’ यांच्यासमोर फुशारकी मारतो की, ‘बघा माझ्या नावाची किती चर्चा होतेय ते. तुम्हाला कोणी विचारतही नाही.’ घोडा-खेचरांना नैराश्य येतं.
निवडणुकीच्या या रणांगणात ‘बैल’ आणि ‘गाय’ लोकप्रिय आहेत. एक नेता दुसऱया नेत्याच्या पोरगांबद्दल म्हणतो की ‘बघा ते कसे बैलासारखा वागतोय. त्यांचा नेता जिंकला तर बघा ते जनतेचे काय करतात. हे पाहून आणि ऐकून खऱया बैलांना मजा वाटते आणि इकडे तिकडे पळू लागतात. काही पक्षांचे नेते मतदारांना ‘गरीब गाय’ मानतात.
या सगळ्या धामधुमीत ‘सरडा’ जामच भाव खाऊन जातो. त्यांच्या नामोल्लेखाशिवाय निवडणूक अपूर्ण मानली जाते. प्रत्येक नेता दुसऱयाला ‘सरडा’ म्हणतो. यामुळे सरड्याला त्याच्या महानतेची जाणीव होते. तो वर-खाली डोके हलवत नाचू लागतो.
‘मुंगीसारखे चिरडून टाकू’ हे वाक्यही अनेकजण अनेकदा वापरतात. पण यामुळे बिचारी मुंगी मात्र दुःखी होते. एखाद्या गिधाडाप्रमाणे नेत्यांची ‘गिधाड दृष्टी’ मतांवर असते. काही उपदेशक कुत्र्यासारखे भुंकतात. राजकारणाच्या क्षेत्रात घुबडाचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. जनतेला कसं ‘उल्लू’ बनवलं, या गोड समजात नेते पाच वर्षे असतात. पण कधीकधी जनताही नेत्यांना ‘उल्लू’ बनवून चांगलाच धडा शिकवू शकते, हेही नेत्यांनी लक्षात ठेवलेले बरे!
ः मनीष वाघ
छायाचित्र : alamy.com वरून साभार
Recent Posts
देवांनो ! तुम्ही सुद्धा!…
October 23, 2025
No Comments
पोलिस हुतात्मा दिन
October 21, 2025
No Comments
गोष्ट ॲक्वा लाईन ट्रेनची..
October 21, 2025
No Comments
एकल शिक्षकी शाळा : देशाच्या भविष्यापुढे प्रश्नचिन्ह
October 17, 2025
No Comments
डिएला : अल्बेनियाची पहिली एआय मंत्री
October 15, 2025
No Comments


