मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाटना आणि बनारसमध्ये रोड शो झाला. अगदी अप्रतिम आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेला शोभेल असाच धुमधडाक्याचा दिखावा होता. आपणच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तरीही कुठेतरी आतल्या आत त्यांना मताधिक्क्याची ‘गॅरंटी’ वाटत नव्हती. मग ‘नमों’नी आपले ठेवणीतले ‘मुस्लीम कार्ड’ बाहेर काढले. अगदी बालपणापासून आपण मुस्लीम कुटुंबात कसे वाढलो याच्या सुरस कथा भर सभेत सांगितल्या.
ईदनिमित्त त्यांच्या घरात अन्न शिजवले गेले नाही. मुस्लिम शेजाऱ्यांकडून त्यांच्या घरी जेवण यायचे आणि ते जेवायचे. मोहरमलाही मोदी ताजिया करायचे. साहजिकच नरेंद्र मोदींनी इतकं सांगितलं याचा अर्थ पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुस्लिम मतांची बेगमी ते करत असावेत.
मोदींच्या बनारस शोमधून बरंच काही उघड झालं. सर्व चंपू चॅनल आणि ऑनलाईन पत्रकार हाताशी होतेच. त्यांच्याकरवी स्वत:वर स्तुतीसुमनांचा वर्षाव करून घेतला. सगळे वातावरण ‘फिल गुड’ केले. आपल्या मावळणाऱ्याआशांना मुस्लीम मतांचा दिलासा मिळेल, या आशेवर मोदी आतल्याआत खुश होत होते. पण असे खरेच होईल का?
मोदींना असे वाटते का, की शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये उरलेली सगळी मुस्लीम मते त्यांच्याच पारड्यात पडतील? शेवटी, मुस्लिमांच्या घरातून येणारे जेवण, ईद आणि ताजिया साजरे करण्याबद्दलचे संवाद जरी खोटे असले तरी सामान्य नाहीत. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पोशाख धारण करून बनारसमध्ये नरेंद्र मोदींनी दिलेला ‘दे, दे अल्लाह’चा संदेश अनपेक्षित आहे. या घडामोडींमुळे मोदींची निवडणुकीतील मुस्लीमविषयक वास्तविकता समोर आली.
दुसरीकडे मोदींच्या ‘मुस्लीम कार्ड’मुळे आता आपला बेडा चारसौ पार नक्की पोहोचणार याची त्यांना खात्री पटली आहे. आपण चार सौ पार गेलो तर यात मुस्लीम मतांचा मोठा वाटा असेल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे हा आकडा चारशेच्या पुढे गेल्यास सौदीच्या राजाची विशेष परवानगी घेऊन हज यात्रा करू, असे मोदी-शहा यांना जाहीर करावे लागले.
होय, मोदींचे बनारस आणि सौदीचे राजे सलमान यांचा काबा यांच्यातील सांस्कृतिक सामायिकरण तयार करणे हे मोदींसाठी ‘बाये हात का खेल’आहे. मतांसाठी मोदींना सर्व काही शक्य आहे. इस्लाममधील जागतिक नेता म्हणूनही ते स्वत:ला प्रस्थापित करू शकतात. मुस्लिमांनी मतदानाचे आश्वासन दिले तर ते संघाच्या शाखांमध्ये कुराणाचे आयते शिकवू शकतात. मोहन भागवत टीव्हीवर येऊन सांगतील की, आतापासून कुराणातील शांततापूर्ण आयती शाखांमध्ये वाचल्या जातील.
मोदी मतांसाठी काहीही करतील. त्यामुळे थोडक्यात मोदींची यूपीबद्दलची चिंता दिसून येते. प्रत्येक राज्यात भाजपच्या जागा कमी होतील, असे मतदानाच्या पहिल्या टप्प्यापासून स्पष्ट झाले आहेच. 2019ची अजिबात पुनरावृत्ती नाही. भाजपच्या जागा वाढू शकतील असे कोणतेही राज्य नाही.
नरेंद्र मोदींनी पाटणा आणि वाराणसीमध्ये ज्या प्रकारे रोड शो केला, पूर्ण पूजेसह उमेदवारी अर्ज भरण्याचे थेट प्रक्षेपण केले त्यावरून मोदींचा आपल्या हिंदू भक्तांवरचा विश्वास उडाला आहे, हेच जाणवते. कारण मतदार पूर्वीसारखे मतदानासाठी बाहेर पडले नाहीत हे उघड आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील सुमारे 40 जागांवर काही अकल्पनीय लढत होताना दिसत आहे. राम मंदिराच्या भावनेच्या गाभाऱ्यातही लोक मंदिराऐवजी इतर प्रश्न, उमेदवाराचे चारित्र्य आणि जातीय गणित यातच अडकलेले दिसतात. म्हणूनच मोंदींना आता ‘मुस्लीम कार्डा’ शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
: मनीष वाघ