*अजब प्रेम कहाणी!*
‘शायद मेरे शादी का खयाल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है,’ असं गाणं सौतन चित्रपटात अभिनेता राजेश खन्ना आणि अभिनेत्री टीना मुनीम यांच्यावर चित्रित करण्यात आलंय. मी ज्या ज्यावेळी हे गाणं ऐकतो, पाहतो… तेव्हा चहाबद्दल मला हेवा वाटतो. म्हणजे, टीनाच्या शादीसाठी आईला पोहे करावेसे वाटले नाहीत, मेदूवडा, इडली सांभार, थालीपीठ करावंसं वाटलं नाही. थेट तिने चहाचं आमिष दाखवून राजेश खन्नाला आवतण दिलं, म्हणजे तिच्या आईच्या मनात ह्यांच्या शादीचे इरादे पक्के आहेत.
तरी बरं त्या काळी स्मार्ट फोन नव्हता. आणि समजा असता, तर थेट व्हिडिओ कॉलवरून टीनाच्या आईने राजेशशी संवाद साधला असता. त्याला डोळे भरून पाहिलं असतं. राजेशने मदहोश अंदाजात आईशी चारदोन संवाद म्हटले असते… तर पोरीऐवजी आईच राजेशशी शादी करायला राजी झाली असती. अग्गो बाई!
माझं चहाशी असलेलं नातं लडिवाळ आहे. लहानपणापासून चहा-चपाती खात खात मी तरुण झालो. शिकलो-सवरलो, पण तिथंही चहाशी गाठ पडली. ९० ते ९६ या काळात चहा आणि सिगरेट असा दोस्ताना होता. नाकातून धूर, तोंडातून धूर… सोबत चहाचा घोट… हाहाहाहा… असं वाटायचं, स्वर्ग दोन बोटं उरला. एकतर नाटकवाले चहा पिण्यात तरबेज. उधारी ठेवण्यातही वाकबगार. दादर, शिवाजी मंदिर समोर स्ट्रगलर जमत असत. त्याकाळी कटिंग चहा पित पित आपण मोठ्ठे कलावंत होणार, अशी स्वप्न बघणाऱ्यांमध्ये मी एक कलंदर होतो.
सिगरेटची लांबी आगीने कमी कमी होत, धूर धुसर होऊ लागतो. तसं माझं स्वप्न धुरांच्या वेटोळ्यात गर्रकन कुठे हरवलं ते आजही सापडलेलं नाहीए. किती संकटं आलं तरीही चहाची संगत काही सुटली नाही बरं. ढिगाच्या ढिगाने दोस्त बदलत गेले. ऑफिसेस बदलत गेली, पण चहाचा हात कधीच सुटला नाही.
पत्रकारितेत आलो तेव्हा तर पुन्हा चहा आणि मी… अशी पुन्हा प्रेमकहाणी सुरू झाली. टपरीवरचा चहा, हॉटेलचा चहा, रेल्वे कॅन्टीनचा चहा, एसटी स्टॅण्डवरचा चहा, आमदार निवासाच्या उपहारगृहातला चहा, राजकीय पक्षांच्या मुंबई कार्यालयानजीक मिळणारा चहा, रात्री सायकलवर मिळणारा चहा, दादरच्या पुलाखाली पत्रकार, चित्रकार, विचित्रकार असं काहीच्या बाही रात्री-बेरात्री चहा पिण्यात धन्यता मानतात. एवढंच नाही तर दादरच्या बबनचा चहा नाना पाटेकर प्यायला आहे, अशी सुरस कथासुद्धा हवेत धुरके मारत मारत पंटर (विद्वान मित्रांसाठी मुद्दाम वापरेला शब्द, भाईलोकांना उगाच राग यायचा) सांगतात.
नरिमन पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरची खाऊ गल्ली, कुठेही जा. चहाची तल्लफ सहज भागली म्हणून समजा. ठाण्यात साईकृपा नावाच्या हॉटेलात ३२ रुपये एक कप चहा मिळतो. त्या चहासाठी म्हणून लोक हॉटेलिंग करतात. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी कुल्हड चहा रेल्वेत सुरू केला होता. अशा प्रकारचा चहा पिणं हेसुद्धा स्वर्गसुख असतं. अमृततुल्य चहाची उद्योग-साखळी महाराष्ट्रात चांगलीच फोफावली. दिवसाकाठी नुसता चहावर पाच-पन्नास रुपये उडवणारी माणसं सर्रास आहेत.
कुणाशीही मीटिंग करायची असेल तर चहाच…. बरं, मीटिंग लांबली की पुन्हा चहाचा नवा कप हजर. माझा जुन्या ऑफिसचा बॉस, ढेरपोट्या. त्याच्या कॅबिनमध्ये एकदा बोलावलं त्याने. लेमन टी घेणार का? असं विचारलं त्याने. तोवर फक्त हा शब्द कानावर पडला होता. मी उत्साहित होत हो म्हणालो. आमची कामाविषयी चर्चा सुरू झाली. १५-२० मिनिटं. चर्चा संपल्यावर मी बाहेर आलो, जिभेवर लेमन टीचा नवा संस्कार रेंगाळत राहिला. ऑफिस सुटल्यावर रात्री घरी गेलो, तेव्हा अहंकारी स्त्रीने परवानगी न घेता चुंबन घ्यावं, अशी चव बेताल करून गेली.
सर्जनशील माणसाला चहाशिवाय कसं काय सुचेल. सणवाराला एकत्र आलो की, गप्पांचा फड जमण्यापूर्वी ‘जरा मला पण चहा टाक,’ अशी फर्माईश आपसूक येतेच की. चहाने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. तिला कितीतरी नावाने संबोधतात. प्रत्येक ठिकाणचा चहा, त्याची चव, मेकिंग सारं काही नावीन्यपूर्ण.
चहाचा एक ग्रेटनेस कायम आहे….
कुठेही जा, तुम्ही कुणीही असा…
तुमची सकाळ चहाशिवाय अपूर्ण आहे.
गुडमॉर्निंग शब्द उच्चारून पाहा… वाफाळता चहाचा कप नजरेसमोर हमखास येतो. –
– *राजेश दाभोळकर, पत्रकार*