पुरविले बालहट्ट सारे
जपले माझे बालपण
माया ममतेचा सागर
आहे उरात सुखाचे क्षण
प्रत्येक आई-वडील आपल्या लेकरांवर प्रेम करतातच किंवा मुलं माता-पित्यांवर प्रेम करून त्यांना जपणे नैसर्गिकच असते. मुलांना वाढवताना पालकांना प्रसंगी कठोरही बनावे लागते. मुलांच्यावर सुसंस्कार घडावेत म्हणून हातांचा मारही द्यावा लागतो. सद्गुण आणि चांगल्या कर्मासाठी कधी पाठीवर शाबासकीची थापही पडते. मुलांचे आई-बाबांकडून कोड कौतुक तर होतच असते, परंतु आजी आणि नातवंडांचे नाते हे फार जगावेगळे असते. आजीला मुलांना संस्कार किंवा वळण लावण्यासाठी ना मारावे लागत ना कठोर बोलावे लागत. किंवा त्यांच्या प्रगतीशी काही घेणेदेणे नसते. तिला एकच ठाऊक असते की नातवंडे दुधावरची साय आहेत आणि त्यांना जिव्हाळ्याने, प्रेमाने जपायचे आहे. खाऊ-पिऊ घालायचे आहे आणि हृदयातले सर्व प्रेम वाटून द्यायचे आहे. माझ्या आजीने तिच्या हृदयात हि वाचल्याची सर्व ओंजळ माझ्या ओटीत घालून मला फुलाप्रमाणे जपले आहे. तिने पर्यंत माझ्यावर आतापर्यंत जे काही प्रेम केले त्या प्रेमाला उपमाच नाही. माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात स्थान असलेली माझी आजी मला देवदूत किंवा स्वप्ननगरीतील परीच भासायची. ज्याप्रमाणे आपण मागितलेल्या गोष्टी आपणास गोष्टीतल्या परीकडून लगेच मिळतात. त्याप्रमाणे माझी आजी मला हव्या असलेल्या सर्व गोष्टी पुरवायची. तसे माझे बालपण फार काही श्रीमंत नव्हते तर सर्वसामान्य इतरांसारखे खाऊन-पिऊन सुखी. परंतु आम्हीं शहरात राहतो म्हणून गावाकडचे नैसर्गिक, घरी बनवलेले पदार्थ खाऊ घालण्यासाठी माझी आजी स्वतःची शपथ घालून आम्हास खायला भाग पाडत असे. घरच्या म्हैशीचे दूध, दही आम्हाला खाऊ घालत असे. तसेच संध्याकाळी शुभंकरोती म्हणून घेत असे.आम्ही सर्व बालगोपाल तिच्या सभोवती कोंडाळे करून बसत असू. कृष्णार्जुन, रामाच्या नि शिवाजीराजे, संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या कथा ती आम्हांला हावभाव करून सांगत असे. ‘असेल जीवनात भीती तर खुंटेल प्रगती’ असे तिचे पालुपद असे. ती रात्री लवकर झोपायची. सोबत साऱ्या नातवंडांनाही झोपवत असे. तिच्या कथा ऐकून आमच्यात युद्धासाठी स्फूर्ती यायची. आम्ही भावंडे भांडू लागलो की ती म्हणायची, “अरे,सुलतानी राज्यात यादवांच्या अनेक घरांचे नुकसान झाले, मराठ्यांच्या यादवीचा, आपसांतील दुफळीचा गैरफायदा घेतला गेला. जर कोणी तुमच्या वाटेला जायचे धाडस करणार नाही असे वाटत असेल आणि मर्दुमकी दाखवायची असेल तर सैन्यात भरती व्हा. आपल्या भारतमातेला अशा तडफदार सैनिकांची गरज आहे. दुश्मनाला आपल्या मातीत शिरकाव करू देऊ नका.” तरुणांचे रक्त सळसळायला लावणारे तिचे खडे बोल आमच्या कानात शिशाप्रमाणे भासायचे. ती निरक्षर होती परंतु जगातील व्यवहारज्ञान कोळून प्यायली होती.
रात्री लवकर झोपलेली आजी पहाटेला गोड गळ्याने जात्यावरच्या ओव्या म्हणायची तेव्हा आम्हाला जाग यायची. आम्ही डोळे चोळत तिच्या कुशीत जाऊन झोपत असू. आमच्या प्रेमावरच्या ओव्या तिने स्वतः बनवल्या होत्या. तिच्या कमरेच्या बटव्यात घरगुती औषधे असायची. “खोकला सर्दी झाली तर डॉक्टरकडे जायची वेळ येऊ देऊ नका. माझ्याकडच्या जडीबुटी तुम्हाला ठणठणीत आणि निरोगी ठेवतील” असे ती आम्हाला सांगायची. तिच्या औषधाच्या प्रभावाने आम्ही खरोखरच दोन दिवसात टवटवीत होत असू. आमची आजी वैद्य म्हणून फक्त घरापुरतीच नाही तर साऱ्या गावात प्रसिद्ध होती.
कोणाचे पापड, शेवया, सांडगे, लोणची करायची असतील तर आजीला साद घातली जायची आणि माझी आजी हसत मुखाने तिथे हजर व्हायची. तरुण पिढीला ती आदर्श वाटत असे. गावात काही ग्रामसुधारणा करायच्या असतील किंवा काही कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर तर माझ्या आजीचा सल्ला घेतला जाई. माझ्या आजीच्या गोड आवाजात भजन ऐकताना सर्व श्रोतृवृंद तल्लीन होऊन जायचा. त्यामुळे गावातील देवळात भजन, कीर्तन असेल तर माझ्या आजीला हमखास बोलावले जायचे. गावातील लेकरांच्या बारशाला पाळणा म्हणायला माझी आजी पुढे असे. अशी माझी निरक्षर असूनही उच्चशिक्षित वाटायची. जगाचे सर्व बाबतीतले ज्ञान कोळून पिलेली अशी ती आदर्श मूर्ती होती. तिला सर्व बाबतीत व्यवहारज्ञान ठाऊक असायचे ती हिशोबात देखील चोख असायची. शेतातल्या मजुरांना देखील ती आपल्या भावंडा, लेकराप्रमाणे वागवायची. त्यामुळे सर्वांना तिचा लळा लागलेला होता. ती एखाद्या गावाला गेली तरी गावातील लोकांना करमत नसायचे. कुणालाही मदत करायला माझी आजी नेहमी तत्पर असायची. कंटाळा हा शब्द तिच्या शब्दकोशातच नसायचा. आगंतुक पाहुणा जरी दारात आला तरी ती हसून स्वागत करायची आणि पदर बांधून स्वयंपाकाला लागायची. तिला कुणाच्या मदतीची कधीच गरज भासायची नाही इतकी ती कामात चपळ होती. माझ्या आजीने बालपणी खूप त्रास सहन केलेला होता. त्यामुळे तिच्या अंगाला कामाची नेहमीच सवय होती. तरीही तिला कुठलाही आजार शिवला नाही किंवा तिचे केसदेखील वृद्ध झाली तरी पांढरे झाले नव्हते. लांबसडक केसांचा अंबाडा तिला खूप शोभून दिसायचा. तिचा गव्हाळ रंग आणि नऊवारी साडी नेसलेली तिची हसतमुखी मूर्ती एखाद्या गौरीप्रमाणे भासायची.
आम्ही नातवंडे तिच्या भेटीसाठी सुटी लागायची खूप वाट पाहत असायचो. सुट्टीत आम्हाला सर्व पदार्थ करून घालायची जणू तिला आवड असायची. अविश्रांत कामाने थकून गेलेली आजी मी कधीही पाहिली नाही. तिच्या चेहर्यावरचे तेज, मुखावरचे हसू आणि कामाचा उरक हेच तिच्या निरोगी तब्येतीचे रहस्य असावे का? दिसायला जरी माझी आजी चारचौघींसारखी असली तरी तिच्या स्वभावामुळे तिने सर्वांना आपलेसे करून घेतले होते.
तिच्यासाठी माझ्या हृदयाचा कोपरा नेहमीच हळवा आणि संवेदनशील असतो. आज जरी आमची आजी आमच्यात नसली तरीसुद्धा तिच्या सर्व आठवणी माझ्या हृदयात जणू कोरलेल्या आहेत. माझी आजी निरक्षर होती तरीसुद्धा तिने आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले होते. स्वतः दुःखाचा वारा पिऊन माझी आजी दुसऱ्यांसाठी सुख वाटण्याचे ज्ञान शिकली होती. तिच्या जाण्याने आमच्या घरातच नव्हे तर आख्ख्या गावाला तिची कमतरता भासली होती. स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत दुसऱ्यासाठी झटण्याची तिची वृत्ती आजही मनाला उभारी देऊन जाते.
सौ. भारती सावंत