*सहज सुचलं ते*
*आनंद*
काल संध्याकाळी गॅलरीत झोपाळ्यावर बसले होते.
इथून एका लहानश्या देवळाचा कळस आणि पलिकडे, दूर एक छान डोंगर दिसतो.
झोपाळ्यावर बसून तो डोंगर, त्यावरचं आकाश, रंगीबेरंगी ढग बघायला मला फार आवडतं.
पावसाळ्यात तर पाण्याने भरलेले काळे ढग बघायला फार मजा येते.
आकाशात लालिमा पसरत चालला होता.
सूर्य मला प्रत्यक्ष दिसत नव्हता.
आकाशात पसरत जाणारा लाल गुलाबी केशरी रंग विलक्षण आकर्षक दिसत होता.
मधून मधून पक्ष्यांचा एखाद् दुसरा थवा इकडून तिकडे उडत होता.
थोड्या वेळाने काही घारी आकाशात उंच जाऊन घिरट्या घालत असलेल्या दिसल्या.
त्यांचं पंख स्थिर ठेवून आकाशात मुक्त विहार करणं विलक्षण चित्ताकर्षक होतं.
इथून बघताना तरी त्या अगदी मुक्तपणे, स्वच्छंदपणे आकाशात भरारी मारत आहेत असं वाटत होतं.
उडत असताना त्यांचं लक्ष स्वतःच्या घरट्याकडे असेलच, शिवाय उडत असतानाही त्या काही खाद्य शोधत असतील, तसंच स्वतःच्या जीवाला काही धोका नाही ना ह्याकडेही त्यांना सतत लक्ष ठेवावे लागत असेल.
तरीसुद्धा मला क्षणभर त्यांचा हेवा वाटला.
असं मुक्त स्वच्छंद भराऱ्या मारणे माणसाला शक्य आहे का ?
बराच वेळ मी त्या घरींकडे बघत राहिले.
सहज खाली लक्ष गेलं. तिथे एका मोठ्याश्या झुडपावर लालबुंद फुलांचे झुबके हलत होते. फारसा वारा नसला तरी त्या झुबक्यांची थोडी मंद हालचाल होत होती.
मला दुरून कळ्या दिसत नव्हत्या. फुललेल्या फुलांचे गुच्छ दिसत होते. त्यांचा तो लालबुंद रंग मनाला आकर्षित करत होता. मनात आलं, त्या घारी गगनभरारी घेत आहेत पण ही फुलं मात्र एकाच जागी त्या झाडाच्या फांदीला धरून आहेत. त्यांना किंवा त्या झाडाला स्वतंत्र हालचाल करता येत नाही. सगळं आयुष्यभर ते जिथे उगवलं आहे तिथेच उभं रहाणार आहे. उलट जमेल तितकं जमिनीला मुळांद्वारे घट्ट पकडून रहाणार आहे. त्यावरच तर त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे.
छोट्या छोट्या अनेक पक्ष्यांचं रात्रीचं ते आश्रयस्थान आहे. नाजूक कळ्या आणि आकर्षक नाजूक फुलांची देणगी जगाला देण्याचे सामर्थ्य त्या झुडपात आहे. त्यावरची फुलं आनंदाने वाऱ्यावर डोलत आहेत. अगदी लहान बाळं जशी कुणाच्यातरी कडेवर बसून जगाकडे उत्सुकतेने पहात असतात तशीच ही फुलं त्या फांद्यांच्या कडेवर बसून भोवतालच्या जगाकडे बघून आनंदाने हसतायत.
त्या फुलांचं आयुष्य ते किती? तीन किंवा चार दिवसांचं. त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसेल. आपलं एकाच जागी जखडून असणं त्यांना दुःखदायक वाटत नाही.
ती फुलं स्वानंदात मग्न असतात. आनंद त्यांच्यात उपजतच असतो. त्यासाठी त्यांना बाहेर शोध घ्यावा लागत नाही.
मुग्धकळीचे रूप बदलून हळूच तिचं फुलात रूपांतर होतं. ते फूल जगाकडे आनंदाने, उत्साहाने बघत, स्वतःचा आनंद इतरांकडे संक्रमित करत, इतरांना आपल्या दर्शनाचा आनंद देत भरभरून जगतं. दोन-तीन दिवसात कोमेजून झाडावरून गळून पडतं..
ह्या एवढ्याशा जीवनात इतरांना आनंद देण्याची फार मोठी ताकद या फुलांमध्ये आहे.
निसर्गात कितीतरी आनंद भरून राहिलेला आहे.
आकाशात उडणारे पक्षी बघणं हे तर आनंददायी आहेच, पण एखाद्या फांदीवर बसलेला पक्षी बघितला तरी त्याच्या जागरूक, सावध हालचाली मनाला मोह घालतात.एक क्षणभरसुद्धा तो स्थिर नसतो. त्या मोहक, डौलदार हालचाली निरखण्याची दृष्टी मात्र आपल्यामध्ये हवी. एखादा उंदीर पळताना पाहिला तर मांजर जसं सावध होऊन हालचाल करत ती हालचाल आणि त्याचा सावध पवित्रा विलक्षण वेधक असतो.
कुठल्याही प्राण्याचं पिल्लू खूप गोड दिसतं. अगदी निष्पाप, आपल्या आईच्या मागून दुडुदुडु धावणारा, जगाशी जराही ओळख नसलेला, तो नाजूक कोवळा जीव असतो. त्याच्या डोळ्यातून त्याचा निरागसपणा आपल्या लक्षात येतो. एखाद्या कळीसारखा. हल्ली झालंय असं की हे सगळे आनंदाचे क्षण शहरी जीवनातसुद्धा सहजगत्या मिळणारे असले तरी असा आनंद
अनुभवायला आपल्याला वेळच नसतो किंवा वेळ असला तरीही तो आनंद मिळवण्याची सवय आपल्याला लागलेली नसते.
आमच्या इथे बागेत काही माकड येतात. ती घरात येऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी लागते.
कालच बागेत बसलेली असताना मी पाहिलं, एक माकड शेकटाच्या झाडावर बसलं होतं. तिथे बसून शेंगा तपासून त्यातल्या कोवळ्या शेंगा ते खात होतं. अगदी स्वस्थपणे त्याचं ते काम चालू होतं. ते झाड आमच्यापासून तसं लांब होतं. त्यामुळे आम्हीही स्वस्थपणे त्याला शेंगा खाताना बघत होतो.आमचा वेळ खूप आनंदात गेला
बाग फारशी मोठी नाही, तरी तिथे भारद्वाज येतो. काही वेळा पांढरे शुभ्र बगळे दिसतात. चिमण्या येतात.
पांढरा चाफा फुलतो तेव्हा त्याचा सुगंध मनाला मोहून टाकतो. लीलीची नाजूक पांढरी फुलं, त्यांचा तो मधुर वास,नाजूक स्पर्श मनाला आकर्षित करतो. रातराणीच्या झाडाजवळून संध्याकाळी जाताना तो सुगंध मनाला वेड लावतो.
संध्याकाळी त्या बागेत जाऊन बसणं आणि हा सगळा आनंद लुटणं ही एक वेगळीच मजा आहे.
हे सगळं बघायची मजा मला अनुभवता येत आहे त्याबद्दल मी परमेश्वराची ऋणी आहे.
निवेदिता रिसबूड.
३१/०३/२०२४
9769555758