रुक जाना नहीं…

न जाने मिलेंगी कितनी रुकावटें
जीवन के सफर में,
तो क्या खलल से भयभीत हो,
चलना चलाना छोड़ दूँ?

जन्म आणि मृत्यू या दोन घटनांच्या मधला कालावधी म्हणजे आयुष्य. माणसांप्रमाणे पशू पक्ष्यांना ,झाडा-झुडूपांना देखील एक ठराविक आयुष्य असते आणि त्यांना शरीरही असते.पण मनुष्य प्राण्याला नुसते शरीर नसते, तर देहा बरोबर मन आणि बुद्धीही असते. जगण्याचा कालावधी संपला की आयुष्य संपते,जीवन संपते. माणसाला जन्म आणि मरणाच्या कालावधीत जगताना चांगले नि वाईट अनुभव येतात ,कधी संघर्ष करावा लागतो तर कधी त्याला विनासायास काही मिळून जाते. हे सारे जे घडते ते म्हणजे जीवन होय.
प्रत्येक विवक्षित जीवन उन्नत होऊ पाहात असते,वर वर जाण्यासाठी ते धडपडत असते. भौतिक सुखाची विरक्ती येऊन एकजात सारी मानवजात साधू, संत ,जोगी, बैरागी झाली असे कधी होऊ शकत नाही.माणसाचा भौतिक सुखासाठी झगडा सतत चालू असतो. कधी हा झगडा भौतिक सुखासाठी असतो,कधी ध्येयवादासाठी तर कधी समाजवाद वा राष्ट्रवादासाठी.जीवन म्हटलं की संघर्ष आलाच.मग तो प्रकृती विरुद्ध असेल, स्वतः विरुद्ध असेल किंवा परिस्थिती विरुद्ध असेल.
विविध प्रकारच्या घटनांना मानवाला दररोज सामोरे जावे लागते. जे सामोरे जायला कचरतात त्यांना जीवनात हार पत्करावी लागते. ब्रिटीश इतिहासकार , पत्रकार व कादंबरीकार एच. जी. वेल्स यांचे सुप्रसिद्ध सुभाषित आहे, “If you fell down yesterday, stand up today.” कालचा पराभव आजचे यश आहे.आपण अनेक यशस्वी व्यक्ती पाहिल्या आहेत त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले दिसून येते. ध्येयपूर्तीसाठी त्यांना अनेक अडचणी व समस्यांना झेलावे लागलेले असते.पण म्हणून त्या व्यक्ती भयभीत होऊन प्रगतीच्या मार्गावरील चालणे सोडत नाहीत.
ध्येयपूर्तीकडे जाताना अनेक वेळा त्यांना हार देखील पत्करावी लागलेली असते,तरीपण त्या व्यक्ती खचून जात नाहीत आणि निराशही होत नाहीत. आत्मपरीक्षण करून झालेल्या चुका दुरुस्त करतात. शांतपणे सारे सहन करतात व निर्धाराने आपल्या ध्येयाचा रस्ता मार्गक्रमण करत राहतात आणि सरतेशेवटी ते यशस्वी होतातच. “इम्तेहा” या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांच्या एका गाण्याच्या ओळी फार सुंदर आहेत, ते म्हणतात, “रुक जाना नहीं, तू कहीं हार के, काँटों पे चलके ,मिलेंगे साये बहार के ,ओ राही! ओ राही!.” ते सांगत आहेत,”काट्यांच्या रस्त्यावरून चालत असताना कच खाऊन थांबू नकोस,पुढे गेल्यावर आनंदाच्या सावल्यांचा बहर तुला नक्की भेटेल.
सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संघर्ष हे शक्ती आणि प्रगतीचे मूळ स्रोत आहेत . आपल्याला माहित असलेल्या महान व्यक्तींनी जीवनात दुःख,पराभव व फार मोठे नुकसान सोसलेले आहे. त्यानंतरच त्यांना यशाची शिखरे गाठता आलेली आहेत.

आले कितीही अडथळे
या जगण्याच्या वाटेवरी
कशास भयभीत व्हायचे
चालताना शिखरावरी

: मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?