
ठाणे प्रतिनिधी :
ठाणे शहरातील पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र अलीकडे ठळकपणे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘माझा तलाव’ मोहिमेअंतर्गत, ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सुनाबाई पिरोजशा गोदरेज फाउंडेशन’च्या सहकार्याने २ मे २०२६ रोजी घोसाळे तलाव परिसरात ‘खिळेमुक्त झाड’ अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून झाडांच्या संरक्षणाबरोबरच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘लेक सॅटर्डे’ उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. घोसाळे तलावाजवळ राहणारे ‘माझा तलाव’ स्वयंसेवक श्रीरंग दाते यांनी तेथील काही झाडांच्या खोडांवर खिळे ठोकले असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. झाडांवर ठोकलेले खिळे काढण्यासाठी माझा तलाव स्वयंसेवक व अंघोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते शनिवारी संध्याकाळी घोसाळे तलावावर जमले. खिळे बऱ्याच कालावधीपूर्वी ठोकले असल्याचे निदर्शनास आले. याची दखल ठाणे महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाने घेणे आवश्यक आहे.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘माझा तलाव’ अंतर्गत दर शनिवारी विविध तलावांना भेटी देण्याचे कार्यक्रम होत असतात. प्रत्येक तलावाला भेट देऊन येथील स्थानिक पर्यावरणीय प्रश्न सोडविण्याचे कार्य मोहिमेचे स्वयंसेवक करतात. झाडांच्या खोडांवर खिळे ठोकणे ही एक गंभीर गोष्ट या निमित्ताने समोर आली. अंघोळीची गोळी ही संस्था अशा अनेक पर्यावरणीय मुद्द्यांसाठी कार्यरत आहे.
लेक सॅटर्डे व खिळेमुक्त अभियानाच्या या कार्यक्रमासाठी पर्यावरण दक्षता मंडळाच्या सुरभि ठोसर, कविता भानुशाली, पल्लवी बांदोडकर, रत्ना जगताप, अनुराधा जोशी तसेच अंघोळीची गोळी संस्थेचे अविनाश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ‘माझा तलाव’ मोहिमेअंतर्गत होणाऱ्या उपक्रमांमध्ये सर्व नागरिक नक्कीच सहभागी होऊ शकतात. ( सहभागासाठी संपर्क : 84461 40189 )