
माजी खासदार आनंद परांजपे यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करत ‘स्वगृही परतलो’ अशी भावना व्यक्त केली. मात्र या पुनरागमनाकडे केवळ भावनिक नात्यांच्या चष्म्यातून पाहणे कठीण आहे. कारण गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून ज्या शिवसेनेपासून अंतर ठेवले गेले, त्याच पक्षात आता अचानक परतण्यामागे नेमके कोणते तत्त्व आहे, हा प्रश्न निर्माण होतो.
राजकारणात ‘स्वगृह’ हा शब्द आता विचारांपेक्षा सत्तेच्या जवळ जाण्यासाठी वापरला जातो का, अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. कालपर्यंत ज्या पक्षासोबत राजकीय संघर्ष केला, त्याच पक्षात आज ‘डीएनए शिवसेनेचाच आहे’ असे सांगणे म्हणजे मतदारांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेण्यासारखे आहे.
खरे तर, बाळासाहेब, आनंद दिघे यांची शिवसेना आता राहिली नाही. त्या शिवसेनेतील अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे निष्ठा टिकवून संघर्ष केला. सत्ता असो वा नसो, त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र निवडणुकीच्या समीकरणानुसार बाहेर गेलेले नेते पुन्हा परतले की त्यांचे मोठ्या थाटात स्वागत होते आणि निष्ठावान कार्यकर्ते मात्र बाजूलाच राहतात. त्यामुळे “स्वगृह” ही संकल्पना आता सामान्य कार्यकर्त्यांसाठी नसून राजकीय गरजेनुसार उघडणारी “गुहा” बनत चालली आहे का, असा सवाल उपस्थित होतो.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत असल्याचे चित्र उभे केले जात असले, तरी विचारधारा आणि निष्ठा यांचे स्थान दुय्यम होत चालल्याची भावना अधिक तीव्र होत आहे. आज पक्षांतर हे विचारांमुळे कमी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक होताना दिसते.
लोकशाहीत पक्ष बदलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; पण प्रत्येक बदलाला ‘भावनिक पुनरागमन’ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला, तर राजकारणातील वैचारिक प्रामाणिकपणाच संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. त्यामुळे हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जात आहे की हे खरेच स्वगृह आहे, की फक्त सत्तेच्या सुरक्षिततेसाठी शोधलेली राजकीय गुहा?
: मनीष चंद्रशेखर वाघ